नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : सीमा हैदरचे (Seema Haider) प्रकरण देशातच नाही तर पाकिस्तानमध्ये अजूनही गाजत आहे. असेच एक प्रकरण सध्या देशात गाजत आहे. शेजारील बांगलादेशातील सोनिया अख्तर सध्या भारत दौऱ्यावर आली आहे. एक महिन्यापेक्षा पण अधिक काळापासून ती पोलीस यंत्रणेकडे फेऱ्या मारत आहे. ती सध्या पतीवर नाराज आहे. त्याचे कान टोचावे यासाठी ती भारतातच तळ ठोकून आहे. तिने यापूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (PM Shaikh Hasina) यांच्याकडे फिर्याद केली होती. सध्या दिल्लीत दोन दिवसांपासून G20 Summit चा डंका आहे. याच दरम्यान सोनियाने तिचे वकील ए. पी. सिंह यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. त्यात तिची कैफियत तिने मांडली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी मदतीचे आवाहन केले आहे.
पतीचे टोचा कान
सोनिया अख्तर यांचे वकील ए. पी. सिंह यांनी अगोदर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे धाव घेतली होती. त्यासाठी बांगलादेश उच्चायुक्ताकडे हसीना यांना भेटण्यासाठी वेळ मागण्यात आली. हसीना सध्या जी-20 संमेलनासाठी भारतात आलेल्या आहेत. उच्चायुक्तांनी त्यांना भारताच्या पंतप्रधानांकडे दाद मागण्याचे अपील केले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाद मागण्यात आली आहे. मोदींना एक पत्र लिहिण्यात आले आहे. त्यात सोनियाने तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती दिली आहे. तिला पतीने कसा धोका दिला, याची माहिती देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील सौरभ कांत तिवारी सध्या ग्रेटर नोएड्यातील एका कंपनीत नोकरी करत आहे. सोनिया अख्तर हिच्या दाव्यानुसार, तिवारीला कंपनीने बांगलादेशात पाठवले होते. यादरम्यान दोघांची ओळख झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे सौरभने मुस्लीम धर्म स्वीकारुन तिच्याशी निकाह केला. त्यांना एक मुलगा पण आहे. नंतर कंपनीने त्याला भारतात बोलावून घेतले.
पती विसरला
सोनियाच्या दाव्यानुसार, सौरभने देश सोडताना तिला काही दिवसातच भारतात नेण्याचे आश्वासन दिले. पण अनेक दिवस झाले तरी सौरभ तिवारीने तिला संपर्क केला नाही. त्यामुळे तिच त्याच्या शोधासाठी भारतात आली आहे. सोबत मुलाला पण ती घेऊन आली आहे. तिने पतीला शोधून काढले आहे. पण तो आता तिला ओळख दाखवत नसल्याचा तिचा आरोप आहे. त्यानाराजीने तिने नोएडा पोलिसांशी संपर्क साधला. नंतर तक्रार दिली. पोलिसांनी पती-पत्नीला एकमेकांसमोर ठेऊन विचारपूस केली आहे. पण त्यातून सोनियाच्या पदरात काहीच पडले नाही. त्यानाराजीने तिने थेट पंतप्रधानांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनाच याप्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली आहे.