जपानच्या बुलेट ट्रेनला ‘देशी बुलेट ट्रेन’ टाकणार मागे? महत्वांकाक्षी हायस्पीड प्रकल्पाचा आतापर्यंतचा प्रवास
भारताची पहिली सेमी हायस्पीड 'वंदेभारत भारत एक्सप्रेस' चेन्नईच्या आयसीएफ रेल फॅक्टरीत तयार करण्यात आली होती. तिच्या यशानंतर अनेक देशांनी तिची तारीफ केली आणि ऑर्डरही नोंदविली. मुंबई ते अहमदाबाद हा जपानी बुलेट ट्रेन प्रकल्प प्रचंड महागडा ठरल्याने आता देशातील इंजिनियर्स 'मेक इन इंडिया' अंतर्गत देशी बुलेट ट्रेन बनविण्याच्या मागे लागले आहेत. काय आहे ही नेमकी योजना, देशात आणखी कुठे कुठे बुलेट ट्रेन धावणार आहेत पाहा..
एकीकडे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. तर दुसरीकडे देशात विविध मार्गांवर येत्या काही वर्षांत बुलेट ट्रेनचे विविध प्रकल्प सुरु होणार आहेत. जपानच्या सहकार्याने तयार होणाऱ्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पाचा अंदाजित खर्च एक लाख दहा हजार कोटी रुपयांचा आहे. आता या प्रकल्पाचे बजेटही वाढणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला एकीकडे पांढरा हत्ती म्हटले जात आहे. त्यातच आता देशातीलच तंत्रज्ञान वापरुन देशी बुलेट ट्रेन तयार केली जात आहे. आणि देशातील विविध मार्गांवर बुलेट ट्रेनचे जाळे विणले जाणार आहे. आता वंदेभारत ट्रेनच्या धर्तीवर देशातच 250 किमीच्या वेगाने धावणारी देशी बुलेट ट्रेन बनविली जाणार आहे. काय आहे बुलेट ट्रेनचा आतापर्यंतचा प्रवास, देशात कुठे-कुठे धावणार बुलेट ट्रेन पाहा…
भारताच्या विकासात रेल्वेचा सर्वात मोठा वाटा आहे. रेल्वेच्या विकासाबाबत एकेकाळी भारताच्याही मागे असणारा आपला शेजारी चीन नव्वदच्या दशकानंतर खूपच पुढे गेला आहे. आज जगात सर्वात वेगवान धावणारी ट्रेनची कोणत्याही युरोपीयन देशात नव्हे तर चीनमध्ये धावत ( Shanghai Maglev ) असून तिचा वेग दरताशी 460 किमी इतका प्रचंड आहे. भारताचे रेल्वे नेटवर्क जगातील तिसऱ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क असून भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठा रोजगार देणाऱ्यापैकी एक आहे. परंतू एवढ्या मोठ्या रेल्वे नेटवर्कनंतर भारताकडे एकही हायस्पीड रेल कॉरीडॉर नव्हता. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची संकल्पना 2013 मध्ये भारत आणि जपान यांच्या सहकार्याने करण्यात आली. 508 किमी लांबीचा या मार्गावर दर ताशी 320 ते 350 किमी वेगाने ट्रेन चालवून हे अंतर दोन तास 56 मिनिटांत कापण्याची योजना आहे.
हाय स्पीड रेल्वे वीजेवर धावत असल्याने कच्च्या तेलाच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी होणार आहे. विमान प्रवासाला पर्याय म्हणून बुलेट ट्रेनकडे पाहीले जाते. विमाने 600 किमी अंतरासाठी प्रति व्यक्ती 93 किलो, तर कार 67.4 किलो आणि रेल्वे केवळ 8.1 किलो कार्बन उत्सर्जन करते असा इंटरनॅशनल युनियन ऑफ रेल्वेचा अभ्यास आहे. तसेच विमान प्रवासात तपासणी आणि इतर कारणांमुळे दोन तास वाया जातात. बुलेट ट्रेनच्या बाबतीत तो त्रास वाचणार आहे. मुंबई ते अहमदाबाद हा ट्रेनने 7 तासांचा ( रस्ते मार्गे 10 तासांचा ) प्रवास बुलेट ट्रेनने दोन तासांत ( नॉनस्टॉप ट्रेन ) संपणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची रखडपट्टी
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार 2019 मध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महाराष्ट्राला काहीही फायदा नसल्याचा आरोप करीत विरोध केला होता. त्याच कोरोनाकाळातील निर्बंध आणि राज्य सरकारचा असहकार या दोन्ही कारणांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे महाराष्ट्रातील जमीन संपादनाचे काम प्रचंड रखडले. त्यानंतर दोन वर्षांनी सत्तापालट झाल्यानंतर महाराष्ट्रातील जमीन संपादनाला वेग आला. त्यानंतर अखेर या प्रकल्पाचे 100 टक्के जमीन संपादनाचे काम पूर्ण झाले आहे.
एलिवेटेड बुलेट ट्रेन
पश्चिम रेल्वेच्या सध्याच्या मुंबई सेंट्रल ते दिल्ली रेल्वे मार्ग मालगाड्यांसाठीच्या ( DFC ) डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर पेक्षाही बुलेट ट्रेनचा मार्ग वेगळा असून बीकेसी, ठाणे, विरार, बोयसर ही चार स्थानके महाराष्ट्रात तर साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरुच, सुरत, बिलीमोरा, वापी ही आठ स्थानके गुजरातमध्ये असणार आहेत. जनावरे, गुरांचा त्रास तसेच शेतकरी आणि नागरिकांच्या वहिवाटीला त्रास होऊ नये म्हणून भारतात मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग एलिवेटेड आहे. बीकेसी येथे सुरुवातीचे स्थानक अंडरग्राऊंड असणार आहे. नंतर ठाण्यात खाडीखाली 21 किमीचा बोगदा जाणार आहे. तर उर्वरित स्थानके एलिवेटेड( उन्नत ) असणार आहेत. बुलेट ट्रेनसाठी कर्ज आणि तंत्रज्ञान पुरविणार्या जपानच्या शिंकानसेन E – 5 मालिकेतील डबे भारतात आणले जाणार आहेत. 20 टक्के तंत्रज्ञान जपानचे राहणार असून तर 80 टक्के कामासाठी जागतिक निविदा काढण्यात येणार आहेत.
किती प्रवासी आणि तिकीट दर ?
पिकअवरमध्ये दर तासाला तीन ट्रेन तर नॉन पिकअवरमध्ये दर तासाला दोन बुलेट ट्रेन चालविण्याचा प्रस्ताव आहे. पहिल्या टप्प्यात दहा डब्यांच्या ट्रेन चालविण्यात येणार आहेत. एका ट्रेनची प्रवाशी क्षमता 750 इतकी असणार आहे. नंतर 16 डब्यांची ट्रेन चालविण्यात येणार असून त्यांची क्षमता 1250 प्रवासी इतकी असणार आहे. फर्स्ट क्लास एसी तिकीटाचे दीड पट बुलेट ट्रेनचे भाडे असणार आहे. साध्या ट्रेनच्या एसी फर्स्ट क्लासचे भाडे जर दोन हजार असेल तर बुलेट ट्रेनचे भाडे तीन हजार असणार आहे. परंतू हे भाडे ट्रेनच्या फेऱ्या वाढवून कमी करता येऊ शकते असे रेल्वेमंत्र्यांनी मागे एका मुलाखती सांगितले होते.
बुलेट ट्रेनमध्ये काय सुविधा
या ट्रेनमध्ये एक बिझनेस क्लास असणार असून बाकीचे स्टँर्डड क्लास असणार आहे. गाडीमध्ये टॉयलेट आणि वॉश रूम स्वतंत्र असणार आहेत. गाडीत सात टॉयलेट असणार असून पाच कॉमन, एक लेडीज आणि एक अपंगासाठी असणार आहे. टॉयलेट इलेक्ट्रीक पद्धतीने चालणार आहे. गाडीत ट्रेनच्या बिझनेस क्लासच्या सीट विमानाप्रमाणे असणार आहेत. तसेच या गाडीला रोटेड सिट बसविण्यात येणार असून 70 सेकंदात हव्या त्या दिशेला त्या वळविता येऊ शकतात. या गाडीत एक मल्टी पर्पज रेस्ट रूमही असणार असून तेथे आजारी प्रवाशांना आराम करण्यासाठी किंवा महिला मातांना होणार आहे.
मुंबईतून आणखीन दोन बुलेट ट्रेन धावणार
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरु असतानाच आता मुंबईतून आणखी दोन बुलेट ट्रेन धावणार आहेत. मुंबई-नाशिक-नागपूर आणि मुंबई-हैदराबाद या मार्गांवर या बुलेट ट्रेन चालविण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक या मार्गांवर बुलेट ट्रेन चालविण्यासंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. देशात 4100 किमीचे हाय स्पीड रेल कॉरिडॉर उभारण्याचे लक्ष्य आहे.
नागपूर बुलेट ट्रेनला 12 स्थानके
मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक 741 किमी लांबीच्या बुलेट ट्रेनची योजना असून मुंबई, नाशिक, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या महत्वाच्या शहरांसह एकूण 12 स्थानके या मार्गावर असणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या शेजारून हा बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार आहे. या मार्गावर शहापूर, इगतपुरी, नाशिक, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, जालना, मेहकर, मालेगाव जहागिर, करंजा लाड, पुलगांव, वर्धा आणि नागपूर अशी 12 स्थानके असणार आहेत. या मार्गिकेचा डीपीआर काढण्याचे काम सुरु आहे.
बुलेट ट्रेनचे नवीन मार्ग
1 ) दिल्ली-अमृतसर
2) हावडा-वाराणसी-पाटणा
3) दिल्ली-आग्रा-लखनऊ-वाराणसी
4) दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद
5) मुंबई-नाशिक-नागपूर
6) मुंबई-हैदराबाद
देशी बुलेट ट्रेनचे स्वप्न काय ?
भारत आता आपली स्वत:चे तंत्रज्ञान असलेली देशी बुलेट ट्रेन विकसित करणार आहे. या देशी बुलेट ट्रेनचा वेग दरताशी 250 किमी इतका असणार आहे. देशातील सध्या धावत असलेल्या कोणत्याही ट्रेनपेक्षा या ट्रेनचा वेग जास्त असणार आहे. वंदेभारत एक्सप्रेसच्या धर्तीवर ही ट्रेन असणार आहे. वंदेभारत ट्रेनची सध्याची नवीन आवृत्ती दरताशी 220 किमी वेग असणारी आहे. सध्या नव्या देशी बुलेट ट्रेनच्या डिझाईनचे काम चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीत सुरु असल्याचे इकॉनॉमिक्स टाईम्सच्या बातमीत म्हटले आहे. सध्या जगात हायस्पीड ट्रेनचा सरासरी वेग प्रति तास 250 किमी इतका आहे. यात फ्रान्सची बुलेट ट्रेन आणि जपानची शिंकानसेन सरासरी प्रति तास 250 किमी वेगाने धावते. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर जपानच्या शिंकानसेनचा कमाल वेग प्रति तास 320 किमी असणार आहे. सध्या वंदेभारत 0 ते 100 किमीचा वेग अवघ्या 52 सेंकदात पकडते. तर बुलेट ट्रेनला हाच वेग पकडण्यासाठी 54 सेंकदांचा वेळ लागतो अशी माहीती एका अधिकाऱ्याने दिली आहे. वंदेभारत या सेमी हायस्पीडची निर्मिती चेन्नईच्या आयसीएफमध्ये झाली होती. आता उत्तर, दक्षिण आणि पूर्वेत कॉरीडॉर तयार करण्यात येणार असून यावर देशी तंत्रज्ञानाची वंदेभारत बुलेट ट्रेन चालविण्याची सरकारची योजना आहे.
आणंद स्थानकाचे काम पूर्ण
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन (NHSRCL) च्या वतीने सुरु असलेल्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे, 300 किमीच्या पिअर ( खांब ) उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर वायडक्ट तयार करण्याचे काम 160 किमीपर्यंत पूर्ण झाले आहे. जानेवारी महिन्यात या प्रकल्पाचे शंभर टक्के जमीन संपादन पूर्ण झाले होते. तर 12 स्थानकांची तसेच डेपोंची कामे विविध टप्प्यावर आहेत. गुजरातमधील सात नद्यांवरील पुलांचे काम झाले आहे. तर नर्मदा, ताप्ती, माही आणि साबरमती नदीवरील पुलांचे काम सुरु आहेत. या मार्गावर 54 ते 57 उड्डाणपूल असणार असून त्यातील 27 उड्डाण पुल महाराष्ट्रात असणार आहेत. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचा 21 किमीचा बोगदा असणार असून 7 किमीचा बोगदा ठाणे खाडीच्या खालून जाणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशल लिमिटेड मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची गुजरातच्या हद्दीत बिलीमोरा ते सुरत मार्गावर साल 2026 मध्ये चाचणी करणार आहे. बुलेट ट्रेनच्या गुजरात येथील आणंद स्थानकाचे कॉनकोर्स स्लॅब, ट्रॅक स्लॅब आणि स्ट्रक्चरल स्टीलचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. स्थानकासाठी पायलिंगचे काम डिसेंबर 2021 मध्ये सुरू करण्यात आले होते.
गेमचेंजर वंदेभारत स्लीपर कोच
अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विना इंजिनाच्या वंदेभारत एक्सप्रेसची संख्या आता 100 झाली आहे. या सर्व वंदेभारत चेअरकारवाल्या आहेत. परंतू आता वंदेभारतचा स्लिपर कोच तयार होत आहे. वंदेभारतच्या स्लीपर कोच आवृत्तीला BEML तयार करीत आहे. वंदेभारत एक्सप्रेस तयार करणारे चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यातील तंत्रज्ञ यासाठी BEML ला मदत करणार आहेत. ही स्लीपर कोच भारतीय रेल्वेची गेमचेंजर ट्रेन ठरणार असून ती रात्रीच्या लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरणार आहे.