राजनाथ सिंह यांची विनंती ममता बॅनर्जी मान्य करणार? काँग्रेसला देणार झटका?
लोकसभा अध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावर पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये एकमत झाले नाही. यातूनच अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. या निवडणुकीत पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. 18 व्या लोकसभेचे नवे अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपने ओम बिर्ला यांना पुन्हा अध्यक्षपदी बसविण्याचा निर्णय घेतला. तर, सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेसनेही के. सुरेश यांना उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यामुळे लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रसच्या ममता बॅनर्जीं यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कॉंग्रेसच्या या निर्णयावर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेसने एकतर्फी निर्णय घेतला अशी टीका केली.
भारतीय जनता पक्षाकडे यावेळी लोकसभेत पूर्ण बहुमत आले नाही. त्यामुळे भाजपची मदर मित्रपक्षांवर अवलंबून असणार आहे. मित्रपक्षांच्या सहाय्याने भाजपचे सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केले. छोट्या पक्षांव्यतिरिक्त नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) यांच्या मदतीने सत्तेवर आले आहेत. तर, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये कॉंग्रेस हा सर्वात जास्त जागा मिळवून मोठा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ 29 जागा मिळवून तृणमूल कॉंग्रेस हा चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
इंडिया आघाडी यांच्याशी फारकत घेऊन तृणमूल कॉंग्रसने पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवली. मात्र, त्यांनी इंडिया आघाडीला बाहेरून पाठींबा दिला आहे. मात्र, लोकसभेत अध्यक्षपदासाठी उमेदवार देताना कॉंग्रेसने चर्चा केली नाही यामुळे तृणमूल कॉंग्रसचे नेते नाराज झाले आहेत.डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ‘लोकसभा अध्यक्षपदाचा उमेदवार उभा करण्यापूर्वी काँग्रेस पक्षाची टीएमसीशी कोणतीही चर्चा नाही. काँग्रेसने याप्रकरणी एकतर्फी निर्णय घेतला हे दुर्दैवी आहे अशी नाराजी व्यक्त केली.
तृणमूल खासदारांच्या या नाराजीनंतर भाजप नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. एनडीएचे अध्यक्षपदाचे उमेदवार ओम बिर्ला यांच्यासाठी राजनाथ सिंग यांनी तृणमूल कॉंग्रस खासदारांचा पाठींबा मागितला आहे. राजनाथ सिंह यांनी मागितलेल्या पाठींब्यावर ममतादीदी यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे 26 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत तृणमूल खासदार कुणाला मतदान करणार याची चर्चा होत आहे.