बोगद्यात अडकलेल्या मजूरांची सुटका दृष्टीक्षेपात, योजनेप्रमाणे काम झाले तर उद्या होऊ शकते सुटका
सिलक्यारा बोगद्यात 10 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजूरांचे व्हिडीओ फूटेज मंगळवारी प्रथमच जगासमोर आले आहेत. त्यात हे मजूर सुरक्षित असल्याचे उघडकीस आल्याने दिलासा मिळाला आहे. पाईपमधून पाठविण्यात आलेल्या एंडोस्कोपिक कॅमेऱ्यामुळे या मजूरांची अवस्था जगाला प्रथमच समजण्यात मदत झाली आहे.
उत्तराखंड | 22 नोव्हेंबर 2023 : उत्तराखंड येथील बोगद्यात भूस्खलन झाल्याने गेल्या दहा दिवसांपासून अडकून पडलेल्या 41 मजूरांची सूटका सुटका उद्यापर्यंत होऊ शकते असे म्हटले जात आहे. जर सर्व काही सुरळीत झाले तर या मजूरांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश मिळेल असे म्हटले जात आहे. चारधाम योजनेचा एक भाग असलेल्या उत्तरकाशी आणि यमुनोत्रीला जोडणाऱ्या प्रस्तावित महामार्गावरील उत्तराखंडातील सिलक्यारा आणि डंडालगांव दरम्यानच्या बोगद्यात 12 नोव्हेंबर रोजी भूस्खलन होऊन 41 मजूर अडकले आहेत.
सिलक्यारा बोगद्यात 10 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजूरांचे व्हिडीओ फूटेज मंगळवारी प्रथमच जगासमोर आले आहेत. त्यात हे मजूर सुरक्षित असल्याचे उघडकीस आल्याने दिलासा मिळाला आहे. पाईपमधून पाठविण्यात आलेल्या एंडोस्कोपिक कॅमेऱ्यामुळे या मजूरांची अवस्था जगाला प्रथमच समजण्यात मदत झाली आहे. पांढऱ्या रंगाचे हॅल्मेट घातलेले हे मजूर सुरक्षित असल्याचे उघडकीस आले आहे. या मजूरांना गेले दहा दिवस पाईपमधून अन्न आणि पाणी पुरविले जात आहे. पाईपद्वारे औषधे आणि कापलेले सफरचंद, केळी, भाजी, पुलाव असे पदार्थ पाठविण्यात यश आले आहे.
बोगद्याचा ढीगारा कोसळल्याने बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याने मजूर आत अडकले आहेत. बचाव मोहीमेत 900 मिमीचा पाईप आत टाकला जात आहे. त्यातून 800 मिमीचा पाईप टेलीस्कोपिक तंत्राने आत टाकण्यात आला आहे. अमेरिकन ऑगर मशिनद्वारे ड्रीलिंगचे काम सुरु करण्यात आला आहे. याची ड्रील स्पीड 5 मीटर प्रति तास इतकी आहे. परंतू अनेक अडचणींमुळे या वेगाने काम करणे अशक्य झाले आहे. तरीही गुरुवारी या मजूरांना बाहेर काढण्यात यश येईल असे म्हटले जात आहे. या बोगद्यात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील 41 मजूर अडकलेले आहेत.
पंतप्रधानांचे आदेश
बोगद्याचे छत आणि मधल्या जागेत निरीक्षणासाठी रोबोटची मदतही घेतली जात आहे. बोगद्याच्या दुसऱ्या बडकोट येथील बाजूनेही खोदकाम सुरु केले आहे. परंतू तेथून मजूरांपर्यंत पोहचण्यास 325 मीटर ड्रील करावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बचाव मोहीमेवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी वारंवार कामाचा आढावा घेतला आहे. मजूरांना कोणत्याही परिस्थिती बाहेर काढण्यास प्राधान्य असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.