‘ तुम्ही दिल्लीच्या मुख्यमंत्री असाल का?’ मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबाबत काय म्हणाल्या आतिशी
Delhi CM Atishi : दिल्लीचे मुख्यमंत्री तुरुंगाबाहेर येताच दिल्लीच्या राजकारणात नवीन नाटकाचा अंक सुरू झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून देशाच्या राजधानीत खलबतं सुरू झाली आहे. आप नेत्या आतिशी या सर्व प्रकारावर काय म्हणाल्या?
दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून बाहेर येताच राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यामुळे आम आदमी पक्षात एकच खळबळ उडाली आहे. आता पुढचा मुख्यमंत्री कोण असेल यावरून देशाच्या राजधानीत एकच खलबतं करण्यात येत आहे. आतिशी पण या स्पर्धेत आहेत. त्यांना याविषयावर प्रश्न विचारला असता त्यांनी जिलेबीसारखं गोलगोल उत्तर दिलं. इतर पक्षांना आपमध्ये फुट पडल्याचं दाखवायचं आहे. पण तसं नाही. विश्वासचा अर्थ काय असतो, हे खऱ्या अर्थाने आपने दाखवल्याचे त्या म्हणाल्या.
आतिशीचे उत्तर तरी काय?
तुम्ही दिल्लीच्या पुढच्या मुख्यमंत्री असाल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. आजतक या वाहिनीशी त्या बोलत होत्या. त्यावेळी उत्तर देताना, तुम्ही अशा एका पक्षाच्या नेत्याशी बोलत आहात, ज्याने इमानदारीची एक नवीन उदाहरण घालून दिल्याचे त्या म्हणाल्या. कोणत्या नेत्यात अशी हिंमत आहे की तो जनतेत जाईल आणि म्हणेल की मला मत द्या, असे आतिशी म्हणाल्या.
मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होईल, हे महत्वपूर्ण नाही. अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षाचे सरकार एक आठवडा अथवा एक महिना चालले, हे महत्वाचे आहे. पण आप सरकार जनतेसाठी काम करत राहिल. पुढील मुख्यमंत्री कोण असेल हे आमदारांच्या बैठकीत निश्चित होईल. पण दिल्लीतील जनता आप सरकारच्या पाठीमागे आहे. कारण त्यांच्या मुलाने, अरविंद केजरीवाल यांनी हे सिद्ध करुन दाखवलं आहे, असे आतिशी म्हणाल्या.
आप तोडण्याचे षडयंत्र
आमचा पक्ष तोडण्याचे षडयंत्र करण्यात आले. आमच्या पक्षातील नेत्यात दुरावा आणण्याचा, त्यांच्या संभ्रम निर्माण करण्याचा, एकमेकांविरोधात भडकविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पण तरीही आमचा पक्ष मजबुतीने समोर आला. आम आदमी पक्षाची ही एकता कायम राहिल. आमच्या या ऐकीने आणि इमानदारीने दिल्लीच्या जनतेचा विश्वास कमावला आहे, असा विश्वास आतिशी यांनी व्यक्त केला.