WITT | पंतप्रधान पदासाठी दावेदारी? हा प्रश्न मल्लिकार्जुन खरगे यांनी असा टोलावला
WITT Satta Sammelan | पंतप्रधान पदासाठी तुमचं नाव स्पर्धेत आहे, असा थेट प्रश्नावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तो चेंडू तसाच वाया जाऊ दिला नाही. त्यांनी समोर येऊन फटकेबाजी केली. देशातील सर्वात मोठे टीव्ही नेटवर्क, TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनात काय उत्तर दिले खरगे यांनी?
नवी दिल्ली | 28 February 2024 : पंतप्रधान पदासाठी तुम्ही दावेदार आहात का? या थेट प्रश्नाला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बगल दिली नाही. त्यांनी हा यॉर्कर व्यवस्थित टोलावला. त्यांची विकेट पण पडली नाही आणि चेंडू पण वाया जाऊ दिला नाही. देशातील सर्वात मोठे टीव्ही नेटवर्क, TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनात काँग्रेस अध्यक्षांनी त्यांच्या जीवन प्रवास उलगडला. त्यांची संघर्ष गाथा मांडली. देशाच्या राजकारणाचा कल सांगितला. विरोधकांवर सध्या काय संकट ओढावले हे अगदी मोजक्याच पण प्रभावी शब्दात मांडले. त्यांनी जर-तरच्या गोष्टींना सुद्धा सध्या थारा नसल्याचे सांगत काँग्रेस आता विजय खेचून आणत नाही, तोपर्यंत लढा देणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. सत्ता संमेलनात प्रत्येक राजकीय नेत्याने त्यांची बाजू प्रभावीपणे मांडली. अनेक फिरक्यांवर त्यांनी विकेट पडू दिली नाही. खरगे यांनी पण मुरब्बीपणा टिकवला.
जर तर वर चर्चा नको
आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आघाडी संदर्भात वक्तव्य केले. बराच उशीर झाल्याचे ते म्हटले होते. त्यावर खरगे यांनी प्रतिक्रिया दिली. काय मागे राहिले, कोण काय म्हणाले, त्यामागील कारणं काय याची मोजदाद करण्याची ही वेळ नसल्याचे खरगे म्हणाले. आता कोणाला पाडण्यासाठी नाही तर सोबत घेऊन आता लढुयात. काही न्यून असेल तर आमचे असेल, असे गृहीत धरुन चालुयात. आता या जर-तरला काही अर्थ उरला नसल्याचे ते म्हणाले.
श्रद्धा आणि राजकारणाची गल्लत नको
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी एकवेळ भाजपसोबत लढू, पण प्रभू श्रीरामासोबत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावरही काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी उत्तर दिले. त्यांनी दोघांच्या मैत्रीच्या काळाला उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, त्यांचे नरसिंह राव चांगले मित्र होते. हैदराबाद आणि गुलबर्गा येथे त्यांच्ये येणे जाणे होते. दोघांनी एकमेकांचा उभरता काळ पाहिला आहे. पण श्रद्धा आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. नरसिंह राव जर श्रीरामाला भजत असतील तर मी भगवान शंकराचा भक्त आहे. कोणी शिख धर्म मानतो, कोणी इस्लाम, ती त्याची व्यक्तिगत श्रद्धा आहे. श्रद्धा आणि राजकारण यांची गल्लत होता कामा नये, असे ते म्हणाले. या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत. तुमच्या आयडियोलॉजी राजकारणात आणू नये, या मताचा मी आहे. सध्याचे सरकार तेच करत असल्याचा घणाघात त्यांनी घातला.
पंतप्रधान होणार का?
या प्रश्नाला त्यांनी बगल दिली नाही. ते फ्रंटवर येऊन खेळले. मीडियाच्या या प्रश्नावर माझा प्रतिप्रश्न आहे, आकडे तर आणा. जर आकडेच नसतील, तर पंतप्रधान पद, या हवेतीलच गोष्टी ठरतात. मी असे उलटे बोलले की लोक नाराज होतात, असे ते म्हणाले. जोपर्यंत पंतप्रधान पदासाठी आकडे नाहीत, तोपर्यंत हे प्रश्न निरर्थक असल्याचे ते म्हणाले.