फिरोजाबाद : देशातील बहुतांश भागात उन्हाचा कडाका वाढला असून, गरमीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उष्माघात आणि ट्रेनमधील गर्दीमुळे एका महिलेचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना शिकोहाबाद रेल्वे स्थानकात घडली आहे. गीता देवी असे मयत महिलेचे नाव असून, ती प्रयागराज येथे संगम स्नानासाठी चालली होती. मात्र संगम स्नान करण्याआधीच रेल्वे प्रवासात तिला मृत्यूने गाठले. महिला कालका एक्सप्रेसने जनरल कोचमधून प्रवास करत होती. उष्माघाताने महिलेचा बळी घेतला आहे.
प्रयागराजला जाण्यासाठी महिला कालका एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात घुसली. मात्र जनरल डब्यातील भयंकर गर्दी त्यात उन्हाचा कडाका यामुळे महिलेचा श्वास गुदमरु लागला. तिची तब्येत खालावत चालल्यामुळे तिला शिकोहाबाद रेल्वे स्थानकावर उतरण्यात आले. महिलेला तात्काळ शिकोहाबाद जिल्हा संयुक्त चिकित्सालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. महिलेच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रयागराजला स्नान करण्याची महिलेची इच्छा अधुरीच राहिली.
मुंबईमध्येही दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आज 36 अंश सेल्सिअस इतके तापमान असून, काल हेच तापमान 43 अंश सेल्सिअस इतके होते. मुंबईकरांनी आता या उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, छत्र्यांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरांनी देखील या स्वतःचे उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे.