देहराडून – आपल्याकडे कोण काय करेल, कसं वागेल हे सांगता येत नाही. असाच एक प्रकार उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) घडला आहे. एक महिला थेट भारत-चीन (China–India) सीमा परिसरात प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन बसली आहे, आणि ही महिला स्वत: पार्वतीचा अवतार असल्याचे सांगत आहे. कैलास पर्वतावर असलेल्या भगवान शंकराशी लग्न करीन, असे ती सांगते आहे. उत्तराखंडमध्ये कैलास-मानसरोवर रस्त्यावर असलेल्या पिथौरगडमध्ये (Pithoragarh) हा प्रकार घडला आहे. या महिलेला त्या ठिकाणाहून जाण्यास सांगितले असता, ती तिची जागा सोडण्यास तयार नाही. या महिलेचे नाव हरमिंदर कौर असे आहे.
पथौरगड येथील गुंजी हा अंतर्गत भाग आहे, तिथे जाण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. धारचुला इथल्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन हरमिंदर 15 दिवसांची परवानगी काढून तिच्या आईसोबत गुंजी या परिसरात गेली आहे. 25 मे रोजी तिची परवानगी संपली आहे, तरीही ती परतायचे नाव घेत नाहीये.
तिला या प्रतिबंधित क्षेत्रातून हटवण्यासाठी एक पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले होते, मात्र तिने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.
आता तिला धारचुलाला परत आणण्यासाठी मोठी पोलिसांची टीम पाठवण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.