Womens Reservation Bill : लोकसभेत बुधवारी ऐतिहासिक अशा घटनेची नोंद झाली. महिला आरक्षण विधेयक समंत झाले. पण या विधेयकाच्या विरोधात फक्त 2 मते पडले. महिलांना आरक्षण देणारे विधेयक ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ 454 मतांच्या बहुमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाचे कौतुक करत होत असताना ज्या दोन खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले त्याची देखील चर्चा होत आहे. रिपोर्ट्सनुसार एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले. कारण एआयएमआयएमचा या विधेयकाला विरोध होता. विधेयक मंजूर झाल्यानंतर आपण विरोधात मतदान केल्याचेही ओवेसी यांनी म्हटले होते.
महिला आरक्षण विधेयकाला लोकसभेतून मंजुरी मिळाल्यानंतर आता संसदेच्या कनिष्ठ सभागृहात आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. आठ तास या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर लोकसभेत ते 2 विरुद्ध 454 मतांनी मंजुर झाले. काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुक, तृणमूल काँग्रेससह सभागृहातील सर्व विरोधी पक्षांनी विधेयकाला पाठिंबा दिला. मात्र, असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनने (एआयएमआयएम) या विधेयकाला विरोध केला.
एआयएमआयएमचे सभागृहात ओवेसी यांच्यासह दोन सदस्य आहेत. विधेयक मंजूर झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित होते. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात केली. या विधेयकावरील चर्चेत राहुल गांधी, गृहमंत्री अमित शहा, महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासह एकूण ६० सदस्यांनी भाग घेतला. यामध्ये 27 महिला सदस्यांचा समावेश आहे
असदुद्दीन ओवेसी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष आहेत. ते हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. सलग तिसऱ्यांदा ते येथून निवडून आले आहेत. 1994 मध्ये आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतून राजकीय पदार्पण केले.
सय्यद इम्तियाज जलील हे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे सदस्य आहेत. 2014 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट दिले. जलील यांनी 2019 मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातूनही विजय मिळवला होता.