वर्ल्ड हेरीटेज कालका-सिमला टॉय ट्रेनचा प्रवास आता अधिक आरामदायी, शंभर वर्षांनंतर डब्यांचे डीझाईन बदलले
या डब्यांची निर्मिती करताना प्रवाशांना आरामदायी प्रवास होईल अशी रचना केली आहे. शंभर वर्षे जुन्या डब्यांचा काही रेकॉर्ड नव्हता, त्यामुळे या डब्यांची निर्मिती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
दिल्ली : भारतीय रेल्वेने आता कात टाकायला सुरूवात केली आहे. कालका-सिमला या हेरीटेज टॉय ट्रेनच्या डब्ब्यांचे डीझाईन सुमारे शंभर वर्षांनी बदलण्यात आले आहे. रेल्वेच्या कपूरथला रेल्वे कोच फॅक्टरीत हे डब्बे डीझाईन करण्यात आले आहेत. या डब्यांचे अनावरण नुकतेच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक अशेष अग्रवाल यांनी केले आहेत. आता ट्रायलसाठी हे डब्बे कालका-सिमला सेक्शनमध्ये नेण्यात येणार आहेत. लवकरच पर्यटकांना कालका-सिमला येथील निर्सगाचा आणि पर्वतांच्या सौदर्याचा अधिक चांगल्या पद्धतीने आनंद घेता येणार आहे.
कालका-सिमला मिनी ट्रेन ही देशातील हेरीटेज नॅरोगेज ट्रेन आहे. या ट्रेनच्या डब्यांचे डीझाईन शंभर वर्षांनंतर बदलण्यात आले आहे. संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने हे नवे डब्बे तयार केले असून त्यासाठी एक कोटी रूपयांचा खर्च आला आहे. हे डब्बे सर्व अत्याधुनिक सुविधांनी संपन्न असून यात बायोटॉयलेटसह इतर सोयी असल्याचे कपुरथळा कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक अशेष अग्रवाल यांनी सांगितले. या मिनीट्रेनचे डब्बे अधिक आरामदायी करण्यात आले आहेत. या डब्यात आसनांच्या पुढे खानपान व्यवस्थेसाठी टेबल देण्यात आले आहे. फर्स्ट एसी कोचमध्ये एकूण 12 आसनांची व्यवस्था आहे. डब्यातील खिडक्यांना पॅनारोमिक लूक देण्यात आला आहे.
शंभर वर्षांचे डीझाईन बदलले
या डब्यांची निर्मिती करताना प्रवाशांना आरामदायी प्रवास होईल अशी रचना केली आहे. या डब्यांची निर्मिती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारण सध्याचे डब्बे सन 1908 दरम्यानच्या डीझाईनचे होते. त्यांचा कोणताही डेटा उपलब्ध नव्हता. स्पेसिफिकेशन आणि टेक्निकल डाटा उपलब्ध नव्हता. हा मार्ग 7,062 एम.एम. नॅरोगेजचा असल्याने नविन डब्बे तयार करताना खूप अभ्यास करावा लागल्याचे महाव्यवस्थपकांनी सांगितले. कालका-सिमलासाठी 42 डब्यांची ऑर्डर मिळाली असून याशिवाय आणखी 26 डब्यांची ऑर्डर मिळाली आहे.
पॅनारोमिकमधून पर्वतांचे सौदर्य पाहा
पॅनारोमिक कोचेसमधून सिमलातील पर्वतांचे सौदर्य न्याहाळता येणार आहे. नॅरोगेज मार्गावर हे डब्बे दर ताशी 25 किमी वेगाने धावू शकणार आहेत. लवकरच कालका-सिमला मार्गावर त्यांची चाचणी घेतली जाणार आहे. या डब्यांची निर्मिती ‘मेक इन इंडीया’ मोहीमेअंतर्गत करण्यात आली आहे.