Video: शिधापत्रिकेत ‘दत्ता’ ऐवजी लिहिले ‘कुत्ता’, त्याने अधिकाऱ्यासमोर भुंकून केले आंदोलन
सरकारी कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार भारतात नवीन नाही, मात्र या व्यक्तीने जे आंदोलन केले ते खरंच अनोखे आहे.
बांकुरा, सरकारी कागदपत्रांमध्ये चुका होणे हे भारतात नवीन नाही. आधार कार्ड, रेशनकार्ड आणि मतदार ओळखपत्रात नाव किंवा पत्ता चुकीचा असल्याचा प्रकार अनेकदा समोर आला आहे. सरकारी कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे सामान्य माणसाला संबंधित कार्यालयाच्या वाऱ्या कराव्या लागतात. यानंतरही तुमचे काम होईल याची कुठलीच शास्वती नसते. कर्मचाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे महत्त्वाचे काम तर रखडतेच शिवाय मनस्ताप होतो तो वेगळा! असाच एक प्रकार पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाला. शिधा पत्रिकेत एकदा नाही तर तीनदा चुकीचे नाव छापल्याने (Wrong Name Printed on Reshan Card) पीडित व्यक्तीने अनोखे आंदोलन केले. त्याने एका सरकारी अधिकाऱ्याला रस्त्याच्या मधोमध थांबवले आणि कुत्र्यासारखे भुंकायला सुरुवात केली.(Men Bark Like Dog)
भुंकण्यामागे हे आहे कारण
पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे शिधावाटप विभागाने श्रीकांत दत्ता यांच्या आडनावाच्या जागी ‘कुत्ता’ असे लिहिले आहे. यानंतर त्या व्यक्तीने आपल्या योग्य नावाचे कागदपत्र घेऊन ते दुरुस्त करण्यासाठी सरकारी कार्यालय गाठले आणि कर्मचाऱ्यांना ते दुरुस्त करण्यास सांगितले. मात्र तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी चेष्टेने त्याला टाळले. श्रीकांत दत्ता यांनी निषेधाचा अनोखा मार्ग निवडला आणि रस्त्याच्या मधोमध सरकारी अधिकाऱ्याच्या गाडीला घेराव घालून कुत्र्यासारखे भुंकायला सुरुवात केली.
श्रीकांत दत्ता यांनी भुंकून अधिकाऱ्याकडे तक्रार दिली. प्रथम शासकीय अधिकाऱ्याला काही समजले नाही, मात्र नंतर प्रकरण समजल्यानंतर त्यांनी श्रीकांत दत्ता यांचा अर्ज त्यांच्याकडे ठेवला व चूक सुधारण्याचे आश्वासन दिले. यादरम्यान कोणीतरी गाडीला घेरले आणि भुंकण्याचा व्हिडिओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
क्या गज़ब का प्रोटेस्ट है!
राशन कार्ड में सरनेम ‘दत्ता’ (Dutta) की जगह ‘कुत्ता’ (Kutta) लिख दिया तो दत्ता साहब ने कुत्ते की आवाज़ निकाल कर अधिकारी को घेरा! ?
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) November 19, 2022
बांकुरा-2 ब्लॉकच्या बिक्ना पंचायतीचे रहिवासी श्रीकांत दत्ता यांनी या घटनेबाबत सांगितले की, “मी रेशनकार्डसाठी अर्ज केला होता. कार्ड आल्यावर त्यावर श्रीकांत दत्ताऐवजी श्रीकांत मंडल असे लिहिले होते. मी दुरुस्तीसाठी अर्ज केला होता. यावेळी शिधापत्रिकेवर श्रीकांत दत्ता ऐवजी श्रीकांती कुमार कुत्ता असे लिहिले होते. ‘शिधावाटप विभागाने मला माणसातून कुत्रा बनवले आहे. याचा मला मनस्ताप होत असल्याचे ते म्हणाले.’
श्रीकांत दत्ता यांनी याला ‘सामाजिक अपमान’ म्हटले आहे. अशा कृत्यासाठी सरकारी कर्मचाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यूजर्सही त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. हे पाहून काही लोक हसत आहेत, तर अनेक यूजर्स श्रीकांत दत्ता यांच्या अनोख्या आंदोलनाचे समर्थन करीत आहेत.