2022 चा तो भयंकर क्षण देश विसरू शकणार नाही, ऐन संध्याकाळची वेळ, मोरबीतला गजबजाट…!
दिवस होता 30 ऑक्टोबर 2022. गुजरातमधील मोरबी शहरात माच्छू नदीवर बांधलेला जूना पूल दुरूस्ती झाल्यानंतर पुन्हा सुरु करण्यात आला होता.
नवी दिल्लीः कॅलेंडरचं (Calender) पान उलटावं अन् नव्या महिन्याचा (New Month) प्रवास सुरु करावा… नव्या वर्षाची (New Year) सुरुवात करताना हे थोडं कठीण जातं. 12 महिने… चढ-उतारावरील घटनांचे क्षण झराझरा बाहेर निघतात. चहुबाजूंनी फेर धरून नाचू लागतात. काही चांगले, काही वाईट.. आशादायी घटना सुखावतात. बोचरे क्षण अधिक टोचतात. 2022 मधून 2023 मध्ये जाताना काही घटना स्पष्ट दिसतात.
असंख्य सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतरांनी भरलेल्या या वर्षातला ऑक्टोबर महिन्यातला एक दिवस. गुजरातमधील मोरबी पुलावरील भयंकर दुर्घटना. आठवली की लोकांनी खचाखच भरलेला झुलता पूल कोसळण्याची ती दृश्य आठवतात अन् पोटात खड्डाच पडतो.
दिवस होता 30 ऑक्टोबर 2022. गुजरातमधील मोरबी शहरात माच्छू नदीवर बांधलेला जूना पूल दुरूस्ती झाल्यानंतर पुन्हा सुरु करण्यात आला होता.
संध्याकाळचं नदीचं सौंदर्य अनुभवण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी हा पूल खचाखच भरला होता. संध्याकाळी 6.40 ची वेळ. पूलावर माणसांची संख्या जास्त झाली अन् क्षणात त्याचा दोर तुटला.
Last few seconds of #Morbi bridge of Gujarat ?
So unfortunate! pic.twitter.com/SMkivO0gAc
— Shashank Shekhar Jha (@shashank_ssj) October 31, 2022
किडे मुंग्यांसारखी माणसं नदीत कोसळली. जीवाच्या आकांताने माणसं ओरडू लागली. बचावकार्य सुरु झालं. स्थानिक प्रशासन, आपत्कालीन विभाग, लष्कराच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु झाले. अनेक मृतदेह नदीबाहेर काढले गेले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु झाले. रात्रभर मदत कार्य सुरु होतं.
Ex-BJP MLA Kantilal Amrutiya who jumped into the Machchhu river & saved several lives after the Morbi bridge collapse has been given a ticket by the BJP to contest elections from Morbi.
As a karyakarta, it makes me very proud to campaign for his candidature. Truly well deserved! pic.twitter.com/Ny8XIoPQ3e
— Priti Gandhi – प्रीति गांधी (@MrsGandhi) November 10, 2022
आपली माणसं शोधणाऱ्या त्या नजरा…
आपला माणूस मिळेल नाही तर त्याचा मृतदेह तरी मिळेल, या आशेनं माणसं सैरभैर झाली होती. नदीतून बाहेर पडणाऱ्या मृतदेहांवरून शोधक नजरा फिरत होत्या.. प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेली ही घटना यापेक्षाही विदारक होती.
या घटनेत 141 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. पूलावर 125 जणच मावू शकतात. पण ही मर्यादा त्या दिवशी ओलांडली होती. त्या दिवशी 500 पेक्षा जास्त पर्यटक होते.
ही पूल दुर्घटना नेमकी का झाली, याची चौकशी झाली. न्यायालयीन सुनावणीदरम्यान धक्कादायक बाब उघडकीस आली…
कोणती चूक भोवली?
पूलावर माणसांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त तर झालीच होती. नुकतंच पुलाची दुरूस्ती झाली होती. पूलाचं फ्लोरिंग बदललं होतं. मात्र ज्या केबलवर तो उभारण्यात आला होता, त्या केबल्स जुन्याच ठेवण्यात आल्या होत्या.
तज्ज्ञांच्या मते, हा पूल नव्या फरशांचा भार सहन करू शकला नाही आणि त्याचे केबल तुटले.
केंद्र सरकार आणि गुजरात सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना अनुक्रमे २ लाख आणि ४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली. जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा झाली. 2 नोव्हेंबर 2022रोजी गुजरात सरकारने राजकीय दुखवटा पाठला. या दिवशी सर्व सरकारी कार्यालयांवरील ध्वज अर्धाच फडकवण्यात आला. सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.
इतिहास काय?
मोरबीचे राजे वाघजी ठाकोर यांनी जवळपास दीडशे वर्षांपूर्वी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हा पूल बांधला होता. 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांनी ब्रिजचं उद्घाटन केलं होतं. पुलाच्या बांधकामासाठी इंग्लंडहून साहित्य आणलं होतं.
झुलत्या पुलाच्या आकर्षणामुळे मोरबी हे एक पर्यटन स्थळ बनलं होतं. कलात्मकतेचा आविष्कार पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे येत.
2001 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या भुकंपामुळे या पुलाला धक्का बसला होता.