शून्य, शून्य आणि शून्यच राहणार, राज ठाकरे यांच्या ‘त्या’ हातमिळवणीवर ठाकरे गटाच्या खासदाराचा हल्लाबोल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज ठाकरे लवकरच NDA मध्ये सामील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीवरून ठाकरे गटाच्या खासदाराने झोंबरी टीका केलीय.
नवी दिल्ली | 19 मार्च 2024 : राजकारणात काहीही अशक्य नसते असे म्हटले जाते. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या स्थापनेपासून ‘एकला चलो रे!’ ची भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. महाराष्ट्रात दरारा आणि दबदबा असणारा हा नेता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर दिल्लीवारीवरून टीका करणाऱ्या या नेत्याने लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच स्वतःच दिल्लीवारी केली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राज ठाकरे लवकरच NDA मध्ये सामील होणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र, याच भेटीवरून उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी खरमरीत टीका केलीय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली. दिल्लीतील या भेटीमुळे निवडणुकीचा पारा आणखीनच वाढला आहे. याच दरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया समोर आलीय. या भेटीमधून भाजपला कोणताही फायदा होणार नाही. भाजपचा महाराष्ट्रात भरवसा नाही, अशी टीका त्यांनी केलीय.
एकीकडे भारतीय जनता पक्ष ‘अब की बार, 400 पार’ चा नारा देत होता. पण, आता 200 चा आकडा पार करण्याइतकाही आत्मविश्वास राहिलेला नाही. महाराष्ट्रात तुम्ही दोन पक्ष फोडले तरी जनतेच पाठींबा मिळत नाही हे त्यांना कळून चुकले आहे. तुम्ही सत्तेत नक्कीच आहात, पण तुम्ही केवळ सत्तेचा उपभोग घेत आहात. जनतेसाठी कोणतेही काम करत नाही, अशी टीकाही प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, “भाजपला वाटत होतं की ठाकरे घराण्याचा पक्ष आहे. ठाकरे आडनाव घेतात. त्यामुळे ठाकरे यांना लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पण त्याचा काहीही फायदा होणार नाही. महाराष्ट्रातील जनतेसमोर भारतीय जनता पक्ष शून्य आहे, असे सुरुवातीपासून म्हणत आले आहे. शिवसेना फोडण्याचे काम केले आणि गद्दार सेना निर्माण केली. त्यांच्याकडे शून्य मते आहेत. राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना घेतले. त्यांचीही मते शून्य आहे. राज ठाकरे हे ही शून्य आहे. त्यामुळे भाजपकडे शून्य, शून्य, शून्य आणि शून्यच राहणार, अशी झोंबरी टीका त्यांनी केली.
रामदास आठवले मात्र यात उगाच गोंधळ घालत आहेत. त्यांनी कितीही, काहीही केले तरी महाराष्ट्रातील जनतेने खोटे बोलणाऱ्या सरकारला रस्ता दाखवायचा आहे असे ठरवले आहे. त्यांना हद्दपार करायचे आहे. लोकांचे प्रेम आणि पाठिंबा आमच्या पाठीशी आहे. त्याच आत्मविश्वासाने आम्ही लोकांमध्ये जाऊ आणि विजयी होऊ, असेही त्या म्हणाल्या.