BLOG : डॉक्टरी पेशाला जागणारा ‘देवमाणूस’, भव्य निरोप समारंभ आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर
एकीकडे लोकांनी आपल्याला दिलेलं देवपण, नैतिकता आणि इमान बाजूला ठेवून करण्यात येणारी डॉक्टरकी आणि दुसरीकडे आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून रुग्णांना अत्यंत माफक दरात दिली जाणारी सेवा, असंही चित्र पाहायला मिळतं.
उस्मानाबाद : डॉक्टरला देवाची उपमा दिली जाते. हा मानवरुपी देव एखाद्या रुग्णाला मरणाच्या दारातून खेचून आणतो. त्यामुळे तो देवमाणूस म्हणवतो. वडीलधारी मंडळी कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात. पण हल्ली हे वाक्य दवाखान्याबाबतही बोललं जात आहे. कारणही तसंच आहे म्हणा. एखाद्या रुग्णाला साधी सर्दी, ताप, खोकला असा छोटासा आजार झाला तरी हजारो रुपये दवाखान्याला घालवावे लागतात. एखादा मोठा आजार असेल तर मग थेट सावकार किंवा एखाद एकर जमीन विकायला काढायची वेळ गावखेड्यातील सर्वसामान्य माणसावर येते. हल्ली मजल्यावर मजले चढवलेले दवाखाने पाहिल्यावर अभिनेता अक्षय कुमारचा ‘गब्बर इज बॅक’ या चित्रपटातील एक सीन आठवतो. अनेक मोठ्या रुग्णालयांनी कशाप्रकारे सर्वसामान्य रुग्णांची लूट चालवली आहे, याचं उत्तम चित्रण त्या चित्रपटात केलं गेलं आहे.(A doctor providing low cost patient care in Khamaswadi village in a backward district like Osmanabad)
एकीकडे लोकांनी आपल्याला दिलेलं देवपण, नैतिकता आणि इमान बाजूला ठेवून करण्यात येणारी डॉक्टरकी आणि दुसरीकडे आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून रुग्णांना अत्यंत माफक दरात दिली जाणारी सेवा, असंही चित्र पाहायला मिळतं. हेच दुसरं चित्र मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, कळंबसारख्या मागास असलेल्या भागातील खामसवाडी आणि पंचक्रोशीनं अनुभवलं आहे.
डॉ. आर. यू. खाबिया, यवतमाळ जिल्ह्यातल्या माणिकवाडा गावातील एक तरुण डॉक्टर. घरची स्थिती उत्तम. शेतीवाडी चांगली. कमी असं काहीच नव्हतं. पण डॉक्टरी शिकलो आहोत म्हणल्यावर प्रॅक्टिस करायला हवी होती. तेव्हा खामसवाडी गावातील विष्णूदास तापडिया आणि लातूर जिल्ह्यातील मुरुडचे डॉ. छल्लानी यांच्या माध्यमातून डॉ. खाबिया खामसवाडीमध्ये आले. ते साल होतं 1973. तसं पाहायला गेलं तर खामसवाडी हे कळंब तालुक्यातील बरंच मोठं गाव. पण गावात डॉक्टर नसल्यामुळे प्रत्येक रुग्णाला छोट्या-मोठ्या दुखण्यासाठी तालुका गाठावा लागायचा. अशावेळी डॉ. खाबियांचं गावात येणं लोकांना मोठा दिलासा ठरला. साध्या सर्दी, खोकल्यासाठी तालुक्याला जावं लागणारे लोक आता गावातच उपचार घेत त्याच दिवशी रानात कामालाही जाऊ लागले.
खेडेगावातील रुग्णांचा मोठा आधार
डॉ. खाबिया हे व्यक्तिमत्व खामसवाडीकरांचा चांगलंच भावलं. त्यांची अमोघ वाणी, आपलंसं करुन घेणारे शब्द आणि डॉक्टर म्हणून रुग्णांना दिला जाणारा धीर, यामुळे ते कमी वेळात लोकप्रिय बनले. एखादी म्हातारी किंवा म्हातारा ‘आता माझं काही खरं नाही’ म्हणून यायचा तेव्हा डॉ. खाबिया त्याला असं काही बोलणार की, तो म्हातारा किंवा म्हातारी जागेवरच अर्धीअधिक बरी व्हायची. मग डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्यानंतर ती व्यक्ती दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी डॉक्टरांना रामराम ठोकत कामाला निघालेली पाहायला मिळायची. सर्वसाधारणपणे लहान मुलं ही डॉक्टरांना आणि खास करुन त्यांच्या इंजेक्शनला घाबरतात. पण डॉ. खाबिया यांच्याजवळ गेलेला लहान मुलगाही त्यांनी चॉकलेटसाठी दिलेल्या रुपया दोन रुपयांनी खूश होत इंजेक्शन टोचवून घ्यायचा.
डॉ. खाबिया यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सेवाभावी वृत्ती. एखादा गरीब रुग्ण आला, त्याच्याकडे औषध-गोळ्या सोडा, साधी डॉक्टरांची फीस द्यायला जरी पैसे नसले तरी हा माणूस स्वत:च्या खिशातून पैसे द्यायचा. हा अनुभव अर्ध्याअधिक खामसवाडीकरांनी नक्कीच घेतलेला आहे. महत्वाची बाब म्हणजे आज खेडेगावात डॉक्टर लोकांनी आपली फी शंभर, दीडशे रुपयांवर नेली आहे. तिथे हा माणूस चालू वर्षापर्यंत अवघे 10 रुपये घेतोय. त्यामुळेच खामसवाडीकरांनीही त्यांना आपलं मानलं आणि मूळचे यवतमाळचे असणारे डॉ. खाबिया खामसवाडीचे कधी होऊन गेले कळालंच नाही.
पंचक्रोशीतील रुग्णांची सेवा
डॉ. खाबिया हे खामसवाडीसह आसपासच्या 20 पेक्षा अधिक खेड्यांमध्ये सेवा देत असत. त्यांचं दिवसभराचं शेड्यूलही ठरलेलं असे. त्यांची जुनी एचडी गाडी हीच त्यांची खरी ओळख. पहाटे स्नान-संध्या आटोपून डॉक्टर 5 वाजता गाडीला किक मारायचे. त्यांच्या गाडीचा येणारा तो आवाज अनेकांसाठी अलार्म होता. सकाळी 9 वाजेपर्यंत आसपासची 2-4 खेडेगावं करायची. 9 वाजता खामसवाडीतील दवाखाना उघडायचा. दुपारी 12 पर्यंत पेशंट करायचे. जेवणानंतर थोडा आराम. पुन्हा दुपारी साडे तीन किंवा 4 वाजता गाडीला किक. पुन्हा तोच आवाज. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खामसवाडी शेजारील अन्य 2-4 गावातील पेशंटला तपासून, औषध उपचार करुन खामसवाडी गाठणे, रात्री 9 पर्यंत गावातील रुग्ण पाहणे, हा त्यांचा नित्यक्रम असायचा.
डॉक्टरांची लक्ष्मी त्यांची ‘एचडी’
डॉक्टरांची जुनी एचडी गाडी हिच त्यांची ओळख का? तर दूरवरुन येणारा त्यांच्या गाडीचा आवाज ऐकून आजूबाजूच्या खेडेगावातील लोक डॉक्टर आले म्हणून ठरलेल्या जागी जमायचे. डॉक्टर गाडीवरुनच गावाला एक चक्कर मारुन तिथे येणार आणि उपचार सुरु होणार. खामसवाडी नजिकच्या जवळपास 20 खेड्यापाड्यात आलटून पालटून हेच चित्र पाहायला मिळायचं. त्यामुळे अख्या तालुक्यात डॉ. खाबिया आणि त्यांची एचडी ही चांगलीच फेमस होती. डॉ. खाबिया यांच्यासह त्यांच्या एचडी गाडीचंही खास वैशिष्ट्यं होतं. गाडी कितीही जुनी झाली असेल पण तिच आपली लक्ष्मी असल्याचं डॉक्टर सांगायचे.
आता मात्र सर्व खामसवाडीकर आणि पंचक्रोशीतील नागरिक या अनुभवाला मुकणार आहेत. कारण 1973 ते 2021 अशी तब्बल 47 वर्षे निस्वार्थ भावनेने, आपल्या पेशाला जागून डॉक्टरी सेवा देणारे डॉ. खाबिया गावाचा निरोप घेत आपल्या मुलाबाळांकडे परतणार आहेत. 2015 मध्ये डॉक्टर साहेबांच्या पत्नी आणि खामसवाडीकरांच्या डॉक्टरीन भाभी यांचं दु:खद निधन झालं. तेव्हापासूनच डॉक्टरसाहेब मनाने खचल्याचं अनेकजण सांगतात. तरीही त्यांनी खामसवाडीकरांप्रती असलेल्या आस्थेतून आपली सेवा सुरुच ठेवली. पण कोरोना संकटाच्या काळात त्यांची तब्येत बिघडली. हाताला मोठी दुखापत झाली. त्यामुळे मुलाबाळांनी डॉक्टरांना आता त्यांच्याजवळ ठेवण्याचा निर्णय घेतला. अशावेळी वाढतं वय आणि वयानुसार शरीराच्या हालचाली मंदावल्यामुळे डॉक्टरांचाही नाईलाज झाला. मुलांच्या सांगण्यानुसार त्यांनी खामसवाडीचा निरोप घ्यायचं ठरवलं.(A doctor providing low cost patient care in Khamaswadi village in a backward district like Osmanabad)
गावकऱ्यांना अश्रू अनावर
डॉ. खाबिया आता त्यांच्या मूळ गावी परतणार आहेत, असं कळताच गावातील अनेक बायाबापड्या, वयोवृद्ध नागरिक आपसांत चर्चा करु लागले. अनेकांना अश्रू अनावर झाले. खामसवाडीतील काही वयोवृद्ध लोकांना विचारलं असता, ‘हा माणूस साधा डॉक्टर नाही तर देवमाणूस होता. आजच्या काळातही तो आमच्याकडून फक्त 10 रुपये घ्यायचा. कधी आमच्याकडे पैसै नसतील तर स्वत:च्या खिशातील पैसे द्यायचा. ते परत द्यायला गेलं तर घेत नसायचा. आज तोच माणूस गाव सोडून जातोय तर आम्हाला रडू येतंय’, असं सांगत होती. सीताराम पाटूळे नावाचे आजोबा म्हणाले, ‘मला तर ह्या माणसानं मेलेलं जितं केलंय. अक्षरश: माझी ताटी बांधली होती. पण खाबिया डॉक्टरमुळं मी आज जिता हाय’.
गावकऱ्यांकडून मोठ्या निरोप समारंभाचं आयोजन
गावाची एवढी सेवा केलेला माणूस त्याच्या मूळ गावी जात आहे, तर आपणही त्यांचं काही देणं लागतो म्हणून गावातील काही होतकरु मंडळी आणि तरुणांनी त्यांना निरोप देण्याचं ठरवलं. शनिवारी संध्याकाळी डॉ. खाबिया यांचा नागरी सत्कार आणि निरोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. निरोप समारंभाच्या कार्यक्रमात डॉक्टरांचं खामसवाडीप्रती असलेलं प्रेम आणि खामसवाडीकरांची डॉक्टरांप्रति असलेली आपुलकी पाहायला मिळाली. गावातील चौकात जिथे अनेक राजकीय सभा ओस पडल्या आहेत. त्याच चौकात डॉक्टरांच्या निरोप समारंभाला लोकांनी मोठी गर्दी केली होती. खामसवाडीसह आजूबाजूच्या मोहा, नागझरवाडी, बोर्डा, एकुरका, धानोरा, गोविंदपूर, गौरगाव, बोरगाव, जवळा अशा अनेक गावातील लोकांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि आपल्या गावाच्या वतीनं डॉक्टरांचा सत्कार केला.
अखेर डॉक्टरसाहेब आपल्या कर्मभूमीचा निरोप घेत आपल्या मुलांकडे परतत आहे. तेव्हा त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, “बेकार वाटतंय, खामसवाडी सोडून जाऊ वाटत नाही. पण आता हात काम करत नाही. मुलंही ऐकायला तयार नाहीत. त्यामुळं नाईलाज आहे. आता जावं लागेल”, अशा मोजक्या शब्दात त्यांनी आपलं मन मोकळं केलं. हे बोलत असतानाही त्यांनी आवंढा गिळला होता.
आमदार महोदयांकडून आभार
कळंब-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनीही डॉक्टरांबद्दल आभार व्यक्त केले आहेत. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टरांबद्दलचा एक छान अनुभवही व्यक्त केलाय. तसंच उस्मानाबादेतील एका नामांकीत संस्थेकडून माजी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते त्यांना डॉ. बाबा आमटे सेवा पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.
डॉ. खाबियांची उणीव आणि गरज नेहमी भासणार
खामसवाडी हे जवळपास 15 हजार लोकसंख्येचं गाव, ग्रामपंचायत सदस्य संख्या 15, गावात एक मोठी कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीही आहे. पण चांगली आरोग्यसुविधा मात्र या गावात नाही. नावाला एक आरोग्य उपकेंद्र आहे, पण त्यात कुणावर उपचार होऊ शकतील का? असा प्रश्न पडतो. याला कारणीभूत गावातील पुढारीमंडळीच आहेत. पुढाऱ्यांची अनास्था, इच्छाशक्तीची कमतरता यामुळे या मोठ्या गावाला चांगलं आरोग्य केंद्रही नाही. सध्या गावात अन्य एक-दोन डॉक्टर आहेत. पण त्यांची फी सर्वसामान्यांना, रोजंदारीवर जाणाऱ्या लोकांना परवडणारी नाही. त्यात दुपारच्या वेळेत जेव्हा डॉक्टर मंडळी गावात नसतात. तेव्हा कुणाला साधी कोच किंवा डॉक्टरांची गरज भासली तर बाहेरगावी जाण्याशिवाय पर्याय उरत नाही.
हे ही वाचा :
BLOG : बिनविरोध सरपंच निवडणूक का गरजेची?
BLOG : धनंजय की पंकजा? गोपीनाथरावांनी धर्मसंकट कसं सोडवलं?
A doctor providing low cost patient care in Khamaswadi village in a backward district like Osmanabad