BLOG: भारतात पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येहून जास्त युवा, त्यांचा विकास कसा होणार?
भारताची 22 टक्के लोकसंख्या ही ‘युवा’ (वय 18 – 29 वर्षे) या गटात आहे. आवाका समजून घ्यायचा तर भारताचे हे 26 कोटी युवा हे आख्या पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येहून जास्त आहेत.
भारताची 22 टक्के लोकसंख्या ही ‘युवा’ (वय 18 – 29 वर्षे) या गटात आहे. आवाका समजून घ्यायचा तर भारताचे हे 26 कोटी युवा हे आख्या पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येहून जास्त आहेत. या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाला (डेमोग्राफिक डिव्हिडेंड) पाया समजून त्यावर मजबूत उभारणी करणे हे अत्यावश्यक आहे, कारण हा युवा वर्गच देशाचा चेहरा, ताकद आणि भविष्य असणार आहे (Amrut Bang write on Youth development of India and Nirman framework of Youth Flourishing).
दुर्दैवाने आपल्याकडे युवांच्या विकसनासाठी फारसे काही केले जात नाही. शासन आणि खासगी क्षेत्राचा युवांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा निव्वळ मतदार वा संभाव्य ग्राहक यापुरता सीमित असतो. सामाजिक क्षेत्रात देखील बहुतांश वेळा ‘युथ डेव्हलपमेंट’ हा तुलनेने गौण महत्त्वाचा विषय मानला जातो. युवांच्या विकासासाठी आपल्याकडे फारसे जोमदार उपक्रम तर नाहीतच, पण अत्यंत महत्त्वाची एक समस्या म्हणजे यासाठीचे कुठलेही सिद्धांतन वा प्रारूप देखील भारतात नाही. त्यामुळे एखाद्या युवाचा सुयोग्य विकास म्हणजे नेमकं काय, तो होतो आहे किंवा नाही, त्याची विविधांगी सक्षम जडणघडण होते आहे की नाही, हे कसे ओळखायचे याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात व अस्पष्टता राहते.
या संदिग्धतेचा परिणाम असा होतो की मग निव्वळ सहजरीत्या दृष्यमान (दर्शनीय!) आणि विनासायास मोजता येण्यासारखे असे जे विकासाचे मापक असतात उदा. परीक्षेतील मार्क्स, नोकरी असणे, पगार, घर वा गाडी असणे, इत्यादी त्यांनाच प्राधान्य मिळते. जणु याच बाबी म्हणजे युवा विकासाचे मापदंड व मानदंड आहेत, असा समज प्रस्थापित होतो. त्यांचेदेखील काही महत्त्व आहे हे निर्लक्षून चालणार नाही, पण ही मानके म्हणजेच परिपूर्ण असे देखील मानता येणार नाही.
मग असे इतर काय घटक, लक्षणे, वैशिष्ट्ये असू शकतात ज्यावरून याची कल्पना येईल की एखाद्या युवाचे जीवनात खरोखर छान सुरु आहे, तो किंवा ती “फ्लरिश” होत आहे, युवा विविधांगाने बहरताहेत आणि विकासाच्या / वाढीच्या मार्गावर इष्टतम स्थितीत आहेत? यासाठीचे काही बुद्धीगम्य आणि सैध्दांतिक प्रारूप नसेल, तर सखोल समज देखील शक्य नाही आणि परिणामकारक उपक्रमांची कल्पना सुचणे वा ते प्रत्यक्षात आणणे हे देखील अवघड!
युवांच्या विकासासंबंधीचा आपल्याकडील बहुतांश संवाद व चर्चा ही आत्महत्या, बेरोजगारी, अपघात, लैंगिक अत्याचार, मादक पदार्थांचे व्यसन याभोवतीच घोळते. यापलीकडे जाऊन निर्माणने भारतातील युवांसाठी प्रथमच असे एक “निर्माण युथ फ्लरीशिंग फ्रेमवर्क” तयार केले आहे. हे प्रारूप गेल्या 14 वर्षात हजारो युवकांसोबत केलेल्या निर्माणच्या कामातून आणि अनुभवातून झालेल्या निरीक्षणांवर तसेच या विषयाबाबतच्या नवीनतम विज्ञानावर आधारलेले असे आहे. या फ्रेमवर्कची व्याप्ती ही व्यापक असून त्यात 7 मुख्य विभाग आणि त्यामध्ये एकूण 50 विविध घटक अशी विभागणी केलेली आहे.
यातील 7 मुख्य विभाग खालीलप्रमाणे आहेत:
- शारीरिक स्वास्थ्य (Physical Health)
- मानसिक स्वास्थ्य (Psychological Well-Being)
- चारित्र्य विकास (Character Development)
- नातेसंबंध (Social Relationships)
- व्यावसायिक विकास (Professional Development)
- जीवन कौशल्ये (Life Skills)
- सामाजिक योगदान (Social Contribution)
या फ्रेमवर्कचा ज्यांना उपयोग होईल असे 4 श्रोतृगट निर्माणच्या नजरेसमोर आहेत.
1. युवा स्वत: याचा वापर करून स्वत:च्या बहुआयामी विकासाची सद्यस्थिती काय, पुढील उद्दिष्ट्य काय, त्यासाठीचे मार्ग काय आणि त्यावर सुरुवात कशी करता येईल याचा विचार करू शकतात. स्वत:च्या फ्लरीशिंगची जबाबदारी स्वत: घेऊन त्याबाबतीत स्वयंपूर्ण बनू शकतात.
2. युवा-विकसनामध्ये ज्यांना रस आहे आणि ते काम करणारे असे जे कार्यकर्ते आहेत ते स्वत:च्या कामाला या फ्रेमवर्कच्या आधारे जोखू शकतात, कामात नेमकेपणा आणू शकतात आणि सोबतच ज्यावर अजून काम झालेलं नाही अशा मुद्द्यांवर नवीन काम सुरु करू शकतात.
3. संशोधक आणि धोरणकर्ते या फ्रेमवर्कमधील विविध घटकांवर चर्चा, त्यांचे विष्लेषण, नवीन संशोधन, भारतासाठी उपयुक्त अशी ज्ञाननिर्मिती, शिफारसी आणि धोरणे इत्यादीवर काम करू शकतात. या कामातून उद्या काही नवीन घटकांचा समावेश देखील या फ्रेमवर्कमध्ये होऊ शकतो.
4. युवांसोबत संबंध येणारा असा इतर कुठलाही सुजाण भारतीय नागरिक, मग तो पालक, नातेवाईक, भावंड, शिक्षक, सल्लागार, गट प्रमुख, कंपनीतील बॉस वा वरिष्ठ सहकारी, मित्र, जोडीदार, कोणी का असेना, या फ्रेमवर्कचा उपयोग करू शकतो आणि त्याच्या/तिच्या संपर्कात येणाऱ्या सर्व युवांच्या विकासात हातभार लावू शकतो.
निर्माण हा युवा उपक्रम म्हणून आम्ही असे भविष्य बघू इच्छितो, जिथे भारतातील तरुणाईची वाढ, प्रगती व उत्कर्ष यांची संकल्पना, त्यांच्या व इतरांच्या विचारात देखील परीक्षेचे मार्क्स, पॅकेजचे आकडे, मालकीच्या गाड्यांची संख्या अथवा मालमत्तेचा चौरस फुटामधील आकार या पलीकडे जाते आणि वैविध्यपूर्ण स्वरूप घेते.
मानसिक वा शारीरिक आजारांचा निव्वळ अभाव म्हणजे आपोआप निकोप व निरोगी वाढ असा अर्थ होत नाही. त्यातून फक्त इतकेच कळते की आपण अक्षाच्या ऋण बाजूला नाही आहोत तर शून्य बिंदूवर आहोत. अक्षाच्या धन बाजूला, सकारात्मक वाढीसाठीच्या अगणित शक्यता आहेत. त्या शक्यतांना वास्तवात आणणे ही युवा पिढी म्हणून आपणा सर्वांची जाबाबदारी आहे. या रोमांचकारी प्रवासामध्ये हे फ्रेमवर्क उपयुक्त मार्गदर्शक ठरेल अशी आम्हाला आशा आहे. फ्लरीशिंग युवा हे फ्लरीशिंग भारताची खरी ओळख असेल आणि देशाच्या भरभराटीचे इंजिन होईल!
– अमृत बंग (प्रकल्प संचालक – निर्माण) www.nirman.mkcl.org
टीप – लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.
Amrut Bang write on Youth development of India and Nirman framework of Youth Flourishing