नवी दिल्ली: राजस्थानच्या उदयपूरमध्ये काँग्रेसचं (Congress) तीन दिवसाचं नव संकल्प चिंतन शिबीर (nav sankalp shivir) पार पडलं. या शिबीराला काँग्रेसचे देशभरातील नेते उपस्थित होते. पाच राज्यातील निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर हे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचं आणि देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचं या शिबीराकडे लक्ष लागलं होतं. या शिबिरात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. काही प्रस्तावही मंजूर करण्यात आले. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांना कार्यक्रमही देण्यात आले आहेत. यावेळी काँग्रेसने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे एक व्यक्ती एक पद. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला तिकीट द्यायचं असेल तर त्याने पक्षात पाच वर्ष काम केलं पाहिजे, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. पण या बैठकीला काही दिवसच होत नाहीत तोच राज्यसभेच्या निवडणुकीत (rajya sabha election) काँग्रेसने आपला हा निर्णय गुंडाळल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेले होते. यावेळी त्यांना तामिळनाडूतून तिकिट देण्यात आलं आहे. तर प्रमोद तिवारी यांना राजस्थानातून राज्यसभेचं तिकीट दिलं आहे. या दोन्ही नेत्यांना तिकीट देऊन काँग्रेसने एक कुटुंब एक पद या घोषणेलाच तिलांजली दिली आहे. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ति चिदंबरम हे लोकसभेतील खासदार आहे. असं असताना एकाच घरात काँग्रेसने तिकीट देऊन आपलाच नियम मोडित काढला आहे.
काँग्रेसचे दुसरे नेते प्रमोद तिवारी यांनाही काँग्रेसने राज्यसभेचं तिकीट दिलं आहे. मात्र, त्यांची मुलगी अराधना मिश्रा या सुद्धा आमदार आहेत. तरीही एकाच घरात दोघांना काँग्रेसने पद दिलं आहे. त्यामुळे बड्या नेत्यांना एक कुटुंब एक पद हा नियम अपवाद आहे का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. तसेच ठरावीक नेत्यांसाठी नियम मोडले जात असतील तर पक्ष नेमका कसा वाढेल? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
16 मे रोजी काँग्रेसचं उदयपूरमध्ये नव संकल्प चिंतन शिबीर पार पडलं. या शिबिराला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कोणत्याही व्यक्तीला केवळ एकच पद दिलं जाईल. तसेच कुटुंबातील एकाच व्यक्तीला निवडणुकीचं तिकीट दिलं जाईल. काँग्रेससाठी पाच वर्ष काम केलं तरच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तिला तिकीट देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
विशेष म्हणजे काँग्रेसने पडलेल्या उमेदवारांनाच थेट राज्यसभेत पाठवलं आहे. इमरान प्रतापगढी हे उत्तर प्रदेशातून लोकसभेच्या निवडणुकीत पडले होते. तब्बल 6 लाख मतांनी त्यांचा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. एवढ्या मोठ्या फरकाने पडलेल्या उमेदवाराला काँग्रेसने राज्यसभेचं तिकीट दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात काँग्रेसचे फक्त दोनच आमदार आहेत. तरीही प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्येही खदखद व्यक्त केली जात आहे. काँग्रेस नेत्या नगमा यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तर आशिष देशमुख यांनी महासचिवपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे.