नवी दिल्ली: येणारी 2024ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्षाने आपआपले फासे टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, खरोखरच 2024मध्ये भाजपला पराभूत करता येईल का? भाजपला हरविण्याचा फॉर्म्युला काय आहे? विरोधी पक्ष म्हणजे केवळ काँग्रेसच आहे का? यावर प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाष्य केलं आहे.
प्रशांत किशोर यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. विरोधी पक्ष म्हणजे केवळ काँग्रेस नाही. दुसरे पक्षही आहेत. त्यामुळे नेता कोण असेल हे सर्व पक्षांनी एकत्र येऊन ठरवलं पाहिजे, असं रोखठोक मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं.
काँग्रेस गेल्या 10 वर्षात 50 हून अधिक निवडणुकीत पराभूत झाली आहे. नाही म्हणायला 2012मध्ये कर्नाटक, 2017मध्ये पंजाब, 2018मध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. ज्या पद्धतीने काँग्रेस नेते जनतेत जातात, त्यांच्यात मिसळतात, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यात काही गडबड आहे. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण व्हावं याचा सल्ला मी देणार नाही. पण विरोधी पक्ष म्हणजे केवळ काँग्रेस नाही. इतरही पक्ष आहेत. त्यामुळे अध्यक्ष कोण असेल हे काँग्रेसने ठरवावं, असं प्रशांत किशोर म्हणाले. 1984 नंतर काँग्रेसने कोणतीही सार्वजनिक निवडणूक जिंकलेली नाही. त्यांनी भलेही त्यानंतर 15 वर्ष सत्ता उपभोगली असेल. पण, 1989मध्ये काँग्रेसला 198 जागा मिलाल्या होता. तरीही सरकार बनलं नाही. 2004मध्ये तर केवळ 145 जागा मिळाल्या होत्या. त्यांनी आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन केलं. एक पक्ष म्हणून काँग्रेसचा ग्राफ पडत आहे हे यातून दिसून येतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एक पक्ष म्हणून काँग्रेसने त्यांची संरचना बदलली पाहिजे. त्यांनी निर्णय घेण्याची पद्धत बदलली पाहिजे. काँग्रेस पक्षाला गेल्या तीन वर्षापासून हंगामी अध्यक्ष आहे. हे योग्य आहे का? त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रशांत किशोरच्या सल्ल्याची गरज नाही. तुम्ही कुणालाही अध्यक्ष बनवा. पण तो फुल टाईम अध्यक्ष असायला हवा, असंही त्यांनी सांगितलं.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यूपीएच्या अस्तित्वावर सवाल केला. त्यांनी हे विधान का केलं हे त्याच सांगू शकतील. 2004मध्ये सरकार चालवण्यासाठी यूपीए अस्तित्वात आला होता. सत्ता गेल्यानंतरही एकत्र राहिलं पाहिजे हे त्यावेळी ठरलेलं नव्हतं. जर सत्तेसाठी आणि सत्ता नसतानाही यूपीए कायम ठेवण्याचं ठरलं असेल तर यूपीएच्या काम करण्याच्या पद्धतीवर विचार केला पाहिजे. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. जे पूर्वी यूपीएत होते, ते आता यूपीएत नाहीये. जे यूपीएत नव्हते, ते यूपीएकडे येत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
जेव्हा तुम्ही विजयी होता, तेव्हा त्या विजयाचं सर्व श्रेय स्वत:कडे घेता. जेव्हा पराभूत होता, तेव्हा मात्र दुसऱ्यावर त्याचं खापर फोडता हे गैर आहे. तुम्हाला जेवढी संधी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. मात्र, संधी देऊनही काम होत नसेल तर तुम्ही तात्काळ दूर झालं पाहिजे. इतरांना संधी दिली पाहिजे. मी राहुल गांधींबाबत हे विधान करत नाहीये. ज्या नेतृत्वाच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात निवडणुका लढवल्या गेल्या आणि 90 टक्के निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला, त्याबाबत मी बोलत आहे. नैतिकता आणि रणनीतीची भावना एकच आहे, ती म्हणजे तुम्ही बाजूला व्हावं आणि दुसऱ्यांना संधी द्यावी, असं ते म्हणाले.
पंतप्रधान गेल्या 50 वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात आहेत. त्यातील 15 वर्ष ते आरएसएसचे प्रचारक होते. त्यामुळे त्यांनी लोकांशी संवाद साधणं, त्यांना समजून घेणं या गोष्टी आत्मसात केल्या आहेत. त्यानंतर त्यांनी 10 ते 15 वर्ष भाजपचे संघटक म्हणून काम पाहिलं आहे. तिथेच त्यांना राजकीय व्यवस्थेची माहिती घेता आली. त्यानंतर पुन्हा 13 वर्ष मुख्यमंत्री आणि आता सात वर्ष पंतप्रधान आहेत. गेल्या 45 वर्षाचा त्यांचा अनुभव अद्वितीय असाच आहे. त्यामुळेच लोकांना काय हवं आहे त्यांना समजू शकतं. ते एक चांगले श्रोतेही आहेत. कोणत्याही मुद्द्यावर अनेक लोकांकडून माहिती जाणून घेण्याचा त्यांचा गुण आहे, असंही त्यांनी सांगितलं.
2022मध्ये उत्तर प्रदेशात निवडणुका होत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात जो निकाल येईल तोच 2024च्या लोकसभा निवडणुकीतही कायम असेल असं नाही. यूपीत जे होईल तेच लोकसभेला होईल अशी अनेकांची धारणा असून ती चुकीची आहे. परंतु, 2012मध्ये भाजप उत्तर प्रदेशात तिसऱ्या आणि चौथ्या नंबरची पार्टी होती. समाजवादी पार्टीचं सरकार आलं होतं. मात्र, 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा परिणाम झाला नाही. त्यामुळेच उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक 2024ची सेमीफायनल नाहीये. 2024च्या पूर्वी अनेक राज्यात निवडणुका होणार आहेत, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.
यावेळी प्रशांत किशोर यांनी भाजपला पराभूत करण्याचा फॉर्म्युलाही स्पष्ट केला. भाजपला पराभूत करायचे असेल तर भाजपच्या विरोधात सर्वच पक्षांनी एकत्र येण्याची गरज नाही. आसाममध्ये यावेळी विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी महाआघाडी तयार करण्यात आली होती. मात्र, या आघाडीचा पराभव झाला. उत्तर प्रदेशातही असच घडलं होतं. 2017मध्ये सपा आणि बसपासह इतर पक्षही एकत्र आले होते. त्याचं काय झालं हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे भूतकाळात जे झालं. ते पाहून काही धडे घेतले पाहिजे.
केवळ सर्व पक्षांनी भाजपच्या विरोधात एकत्रं येणं हा काही रामबाण उपाय नाही. त्यासाठी तुम्हाला एक चेहरा हवा. एक विचार हवा. आकडा असावा आणि प्रचारासाठी राबणारी मशिनरी असावी. तुमच्याजवळ या गोष्टी असतील तर तुम्ही भाजपच्या विरोधात आव्हान उभं करू शकता.
तुमच्याकडे अजूनही दोन वर्ष आहेत. हा काही कमी कालावधी नाही. तुमच्याकडे पुढच्या 7 ते 10 वर्षाचं व्हिजन असलं पाहिजे. तुम्ही भाजपला हरवू शकता. पण मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या मासमध्ये वर्क झाल्या पाहिजे, असंही ते म्हणाले.
भाजपची राजकीय ताकद संपवणं कठिण आहे. भाजपला इथवर कोणी आणलंय हे तुम्ही पाहिलं पाहिजे. एक संघटना म्हणून 50 ते 60 वर्ष त्यांनी काम केलं. जनसंघ आणि त्याही आधीपासून ते कार्यरत आहेत. 60-70 वर्षाच्या लढाईनंतर त्यांनी 30 ते 35 टक्के मते मिळवली आहेत. त्यांनी एकापेक्षा अधिक निवडणुका गमावल्या असू शकतात. मात्र, 30 टक्के मते घेणाऱ्या संघटनेला तुम्ही संपवू शकत नाही.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 December 2021 pic.twitter.com/GkzmEpizpv
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 12, 2021
संबंधित बातम्या:
Rip bipin rawat : बिपीन रावत यांनी मृत्युआधी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ, सैन्याला दिला खास संदेश
बिन लग्नाचं राहू नका, जे राहिले त्यांनी देश वेठीस धरला; ओवेसींचा जोरदार हल्ला