कुरूप: किन्नराच्या देहात ताटकळलेला माणूस

International Transgender Day Special: दरवर्षी 31 मार्चला साजऱ्या होणाऱ्या 'इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर डे ऑफ व्हिजिबलीटी' निमित्त कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्ती दिशा पिंकी शेख यांच्या 'कुरूप' कवितासंग्रहाचा हा परिचय.

कुरूप: किन्नराच्या देहात ताटकळलेला माणूस
कुरुप या कविता संग्रहाचं मुखपृष्ठ आणि सोबत कवियीत्री दिशा शेख
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 8:48 AM

किन्नर, तृतीयपंथी किंवा ट्रान्सपर्सन (Transperson). या नावानं ओळखल्या जाणाऱ्यांना आपण पाहिलेलं असतं ते आठवडी बाजारात, रेल्वेत, टोलनाक्यांवर मागताना. बहुतेकांच्या मनामेंदूत त्यांच्या याच प्रतिमा फिट्ट बसलेल्या असतात. दिशा पिंकी शेख (Disha Pinki Shaikh) नावाची ट्रान्सवुमन (Transwoman) या प्रतिमांना धक्का देते. हे ती करते कविता लिहून. ‘शब्द प्रकाशना’ने प्रकाशित केलेला दिशाचा ‘कुरूप’ कवितासंग्रह स्वत:तच एक राजकीय विधान आहे. लिहिणाऱ्याचं, प्रकाशित करणाऱ्याचं आणि अर्थातच वाचणाऱ्यांचंही.

शीर्षकाविषयी…

शीर्षकाविषयी सांगायचं, तर पायात रुतलेले काटे तिथेच राहिल्याने ठसठसणारं जे काही उमटतं, ते असतं कुरूप. हा शब्द आजही ग्रामजीवनात वापरतात. स्वत:च्या कवितेला दिशा ‘कुरूप’ म्हणते ते अनेकार्थानं खरं असल्याचं संग्रहभर जाणवतं. ‘पर्सनल इज पॉलिटिकल’ हे शाश्वत सत्य दिशाची कविता अधोरेखित करते. स्वत:च्या लैंगिक ओळखीला इथली कुटुंबसंस्था, विवाहसंस्था आणि समाजाच्या साच्यात फिट बसवता न आल्यानं होणारी घुसमट, या साच्यांच्या समावेशक नसण्याची रोकडी चिकित्सा आणि अशा साच्यांमधून बाहेर फेकल्या गेलेल्या विविध समूहांच्या विशाल दु:खाचं दर्शन घडवत त्यांच्या मुक्तीचं मागणं, असे तीन मुख्य पदर या कवितेला आहेत. ‘माझ्या समुदायातील ज्या मैत्रीणींना त्यांच्या व्यथा शब्दांत मांडता आल्या नाहीत त्या सगळ्याजणींना…’ ही संग्रहाची अर्पणपत्रिका. रियेश पाटील यांनी केलेलं मुखपृष्ठही आशयघन, प्रतिकात्मक.

एरवीच्या कवितांचे रूढ निकष लावून या कवितेला जोखता येणार नाही. कारण मुळात या कवयित्रीचं जगणं-भोगणंच रूढ नाही. ट्रान्सवुमन ही ओळख मिळण्याआधी पुरूषदेहात घुसमटलेली, बाजार मागताना ताई-माई-अक्का-भाऊ म्हणत हजरजबाबी सवाल-जवाब करणारी, तिच्यासोबत बाजारात फिरताना एकजण मला छेडतो तेव्हा रौद्ररूप दाखवत ठेवणीतल्या शिव्या देणारी, लांबसडक बोटांच्या खोबणीत अडकवलेल्या नोटा चहा पित मोजणारी… ही दिशाची पारंपरिक, प्रेडिक्टेबल रुपं. मात्र खचाखच भरलेल्या काळी-पिवळीतून आठवडी बाजारात जातानाच्या प्रवासात मोबाईलवर पाक्षिक कॉलमचा लेख लिहिणारी, विद्यापीठं आणि सामाजिक संस्थांच्या सेशन्समध्ये जेंडर सेन्सिटीव्हीटीवर बोलणारी, ‘वंचित बहुजन आघाडी’ची प्रवक्ता बनून सभा गाजवणारी… अशी दिशाची कितीतरी नवी, अनप्रेडिक्टेबल रुपंही आता अनेकांच्या ओळखीची झालीत. कवितांमध्ये दिशाचा एक ट्रान्सवुमन म्हणूनचा हा जुन्यापासून नव्या रुपांपर्यंतचा प्रवासही सापडत जातो.

कवितांमध्ये प्रतिबिंब

दिशाला भेटल्या-बोलल्यावर तिची सामाजिक-सांस्कृतिक-लिंगभाव प्रगल्भता लगोलग जाणवते. कवितांमध्येही त्याचं दमदार प्रतिबिंब उमटलंय. भारतासारख्या देशात लिंगभावविषयक विषमतेतून आलेल्या प्रश्नांचं आकलन कधीच सुट्या पद्धतीनं करता येत नाही. जात, धर्म, वर्ग यांच्या अस्मिता नेहमीच या प्रश्नांमध्ये मिसळून त्यांचं एक जास्तच दाहक संयुग बनलेलं असतं. इथं जगणारा हरेकजण कमी-आधिक तीव्रतेनं ते जन्मभर अनुभवत राहतो. दिशाच्या कवितांमध्ये खालच्या म्हणवल्या गेलेल्या जातीतून आलेला एक ट्रान्सपर्सन त्याच्या जेंडरसोबतच जात आणि वर्गाचेही चटके कसे सोसतो ते कमालीच्या बोलक्या प्रतिमा-प्रतिकांमधून ठळक होतं. अगदी प्रेमासारखा हवाहवासा अनुभवही कसा नकोशा सामाजिक-सांस्कृतिक-लैंगिक धारणांचे वर्ख लपेटून तिच्यासमोर पेश केला जातो हे वाचताना मानवी प्रेम आणि नातेसंबंधांचीच नव्यानं मांडणी केली जावी असं वाटत राहतं. या कवितांमध्ये येणारी स्त्री हासुद्धा एक खास विषय आहे. स्त्रीसमूह समाजाच्या उतरंडीत शोषित असताना ट्रान्ससमूहांसाठी त्या कळत-नकळत शोषक कशा बनतात हेही कविता सांगते. सोबतच स्त्रियांच्या शोषणाचा, सोसण्याचाही पट दिशा ताकदीनं मांडते.

ही कविता भारतीय जनजीवनाच्या गुंतागुंतीचा, स्त्री-पुरूष नात्यातल्या गुंतागुंतीचाही एक अनोखा पट समोर ठेवते. पोलिस, राजकीय व्यवस्था आणि पितृसत्तेकडून केलं जाणारं दृश्यादृश्य पद्धतीचं भयंकर दमन अनेक कवितांमध्ये दिसतं. हे वाचणाऱ्याची समज वाढवतानाच त्याची कॉलर धरून अवघड प्रश्न विचारतं, त्याला स्वत:च्या आत पहायला भाग पाडतं. जगासकट स्वत:लाही सतत केवळ काळ्या आणि पांढऱ्या या दोनच रंगात पाहण्याची सवय लागलेल्या सगळ्यांना ही कविता असंख्य ग्रे शेड्स पाहण्याची सवय लावते. दोनच टोकांच्या बायनरीजची सोपी आणि फसवी उत्तरं टाळून पुढची वाट तुडवली तर किती अथांग प्रश्न रस्ता अडवून उभे आहेत ते सांगते. हे शेड्स, हे प्रश्न लिंगभावाचे आहेत तसे ते जातीयवाद, धार्मिक मूलतत्ववाद, विविध वैयक्तिक, सामूहिक उग्र अस्मितांचेही आहेत.

‘रॉ’ असण्यातच सौंदर्य

ट्रान्ससमूहाच्या ओठांवर रुळलेली भाषा मराठीहून हिंदीच जास्त आहे. ही हिंदीही पुन्हा लोकजीवनातली प्रवाही, रस्त्यावरची हिंदी आहे. संग्रहात काही मोजक्या कविता हिंदीतही आहेत. भाषा, अभिव्यक्ती, शैली यामध्ये ‘रॉ’ असणं हेच या कवितांचं सौंदर्य. ट्रान्सवुमन ही लैंगिक ओळख वागवताना वाट्याला आलेले बहुतांश अनुभव अनवट, ओबडधोबड आणि क्रूर. साहजिकच त्यातून जन्मलेलं चिंतन अपारंपरिक आणि भेदक आहे. एरवीच्या लोकप्रिय आणि सिविलाइज्ड भाषेला ते पेलणंही शक्य नाही हे कविता वाचताना जाणवत राहतं. मराठीनं तिच्या असण्याला दिलेल्या ‘तृतीयपंथी’ या शब्दावरही दिशा कायम प्रश्न उभा करते. ‘पुरुषाचा पहिला, स्त्रीचा दुसरा आणि मग आमचा तिसरा पंथ’ हेच मान्य नसल्याचं बोलत राहते. मुख्य प्रवाहातल्या समूहांमध्ये रुळलेल्या धारणा, संकेत आणि नियम सोडाच पण भाषाही परिघाबाहेरच्या समूहांसाठी किती टोचणारी, वगळलेपण देणारी असू शकते हे दिशा सांगते. एकूणच न्याय, संवेदनशीलता, विवेक, करूणा, प्रेम या आपण मिरवत असलेल्या मुल्यांच्या सीमारेषा माणूस म्हणून इतर अनेक माणसांसाठी आपण अजून किती-केवढ्या मोठ्या करण्याची गरज आहे हे भान दिशाची कविता देते.

दु:ख भोगणाऱ्या समूहांचा लक्षवेधी उद्गार

दिशाच्या व्यक्त होण्यात स्वत:चं, समूहाचं असं एक अपरिहार्य, सनातन दु:ख आहेच आहे. मात्र दिशाची कविता केवळ स्वत:च्या आणि समूहाच्या नाकारलेपणाविषयी बोलून थांबत नाही. ती भवतालातल्या अनेकरंगी दु:ख भोगणाऱ्या विविध समूहांचा लक्षवेधी उद्गार बनते. कन्फेशन्स देणं, संवादी राहणं, प्रश्न-प्रतिप्रश्न करणं, उत्तरं मागणं असा एक प्रवाह सगळ्या कवितांमध्ये वाहता आहे. ट्रान्सपर्सन म्हणून दिशा आणि तिच्या समूहाला आपल्याकडून दिली जाणारी ‘स्पेस’ साधारण अशी असते – टाळ्या, समोरच्यानं पैसे द्यावीत यासाठीची आग्रही आर्जवं, क्वचित शिव्या आणि पैसे मिळाले की तोंडातून बाहेर पडणारी दुवा. समोरून येतात त्या त्या कुतूहल, शारीर मोह, हेटाळणी, भिती, नकार असं कायकाय मिसळलेल्या नजरा. यापलिकडचा ‘संवाद’ ‘स्ट्रेट’ म्हणवल्या जाणाऱ्या समूहांशी या ट्रान्स समूहांचा होताना दिसत नाही. दिशाची कविता यापलिकडच्या संवादासाठी पुढे केलेला आत्मविश्वासाचा हात आहे. ‘सहानुभूती नकोय, समंजस स्वीकार द्या’ असं ठाम विधान कवितेच्या आतून झुळझुळत राहतं. ही कविता आपण जिथे जगतो त्याहून अधिक निरोगी, अर्थपूर्ण आणि मानवी जगाची मागणी करते. त्यासाठीचे काही रस्तेही दाखवते. म्हणूनच या कवितेचं मोल कवितेहूनही खूप जास्त आहे.

कवितासंग्रहातील एका कवितेचा निवडक भाग

कोल्हापुरातील लक्ष्मीपुऱ्यात,

कप्पाळावर रुपयाएव्हडं कुक्कू लावून,तोंडात पान चघळत,

लिपिष्टिक लावून,

अंबा बसते रात्रीची बंद झालेल्या दुकानासमोर

आल्या गेलेल्याना हाका देत…

लोक येतात तिच्याजवळ शेपाचशे देऊन

इच्छापूर्ती करायला,

झाला कुणी जरा जास्तच खूश तर घेतो तिला पातळ एखादं,

चोळीचा गळा मोठा शिव बरं का असं सांगत…

अंबा लाजण्याचं नाटक करत मिश्किल हसते

आणि परत बसते वट्यावर,

काकड आरतीची वेळ होवूस्तर,

रंगलेल्या विड्याकडे पर्समधल्या भिंगात पाहाते,

पुढच्या वेळी चांगली सर्व्हिस दिली तर, बक्षीस देईल

असं प्रत्येक वेळी म्हणणारा तो आठवला की…

अंबा पचकन पिचकारी मारते पानाची

अंबाबाईच्या देवळाकडे जाणाऱ्या वाटेवर…

(लेखिका मुक्तपत्रकार आहेत.)

संबंधित बातम्या :

औरंगाबादेत लसीकरण जनजागृतीसाठी लवकरच तृतीयपंथीयांची नेमणूक, स्मार्ट सिटीचा निर्णय

तृतीयपंथी सपनाशी बाळूची लगीनगाठ, बीडमध्ये अनोख्या लग्नाचा थाटमाट

Transgenders च्या खांद्यावर रक्षणाची जबाबदारी, पोलीस दलात 1 टक्के आरक्षण

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....