पंढरपूरमध्ये हरले पण देगलूरमध्ये जिंकले, वाचा, आघाडीच्या विजयाची पाच कारणं
काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूर बिलोली पोटनिडणुकी नांदेडचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि भाजपच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
नांदेड: काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूर बिलोली पोटनिडणुकी नांदेडचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि भाजपच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अशोक चव्हाण यांनी प्रचारासाठी नांदेडमध्ये तळ ठोकला होता. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील भाजप नेत्यांची फौज देगलूरमध्ये उतरवली होती. मात्र, काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी भाजपच्या सुभाष साबणेंना पराभूत करत विधानसभेत एंट्री केली आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भारत भालके यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर भाजपनं समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगिरथ भालके यांचा पराभव करत विजय मिळवला होता. भाजप नेत्यांनी पंढरपूरची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्यानं देगलूरची निवडणूक लढली. मात्र, महाविकास आघाडीनं विजय मिळवतं भाजपला धूळ चारली आहे.
सहानुभुतीचा फायदा
रावसाहेब अंतापूरकर यांचं एप्रिल महिन्यात कोरोना विषाणू संसर्गामुळं निधन झालं होतं. 2019 मध्ये रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणे यांचा पराभव केला होता. मात्र, दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होण्या अगोदरच रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळं सहानुभुतीचा फायदा निश्चितच जितेश अंतापूरकर यांना झाला आहे.
अशोक चव्हाणांनी देगलूरमध्ये तळ ठोकला
पंढरपूरमध्ये भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगिरथ भालकेंना पराभूत केल्यानंतर त्यांनी देगलूरमध्ये त्याची पुनरावृत्ती करणार असल्याचं म्हटलं होतं. भाजप नेत्यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणे यांना फोडून पक्षात घेत उमेदवारी दिली. देगलूर निवडणुकीच्या निमित्तानं पालकमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अशोक चव्हाण यांनी पंढरपूरच्या पराभावाचा धडा घेत महिनाभरापासून नांदेड आणि देगलूरमध्ये तळ ठोकला होता. अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ म्हणजे जितेश अंतापूरकर यांचा विजय हे आहे.
भावजी मेहुणे जोडीचं यश
अशोक चव्हाण यांनी गेल्या सहा वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेले मेहुणे भास्कर राव पाटील खतगांवकर यांना स्वगृही परत आणण्यात यश मिळवलं. भास्कर राव पाटील खतगांवकर यांनी या मतदारसंघातून यापूर्वी प्रतिनिधीत्त्व केलं होतं. भास्कर राव पाटील खतगांवकर यांच्या पक्षात परत येण्यानं काँग्रेसच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. भास्कर राव पाटील खतगांवकर यांच्या पक्ष सोडण्यामुळं निकालावर परिणाम होईल, अशी शक्यता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.
शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची भक्कम साथ
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. सुभाष साबणे यांनी शिवसेनेकडून 2019 मध्ये निवडणूक लढवली होती. 2014 ला ते शिवसेनेकडून निवडून आले होते. सुभाष साबणेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. शिवसेना नेतृत्त्वानं दिलेल्या आदेशानुसार देगलूरमधील शिवसैनिकांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याची भूमिका घेतली. शिवसैनिकांनी जितेश अंतापूरकर यांच्यासाठी काम केल्याचं निवडणुकीच्या आकडेवारीतून दिसून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील प्रचारात सहभाग घेतला होता.
अशोक चव्हाणांचं परफेक्ट प्लॅनिंग करेक्ट कार्यक्रम
काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचं संपूर्ण प्लॅनिंग अशोक चव्हाण यांनी केलं होतं. अशोक चव्हाण यांनी नांदेड आणि देगलूरमध्ये तळ ठोकला. राज्यातील विविध काँग्रेस नेते प्रचारासाठी देगलूरला आले. काँग्रेस नेत्यांनी देगलूरच्या विकासाऐवजी इतर मुद्यांना प्राधान्य दिलं नाही. देगलूरमध्ये तळ ठोकत काँग्रेसची जागा निवडून आणत जितेश अंतापूरकर यांच्या निमित्तानं नवा आमदार विधानसभेत पाठवला आहे.
इतर बातम्या:
Maharashtra Deglur by polls won by Congress candidate Jitesh Antapurkar five reasons MVA victory