रॉयल एन्फिल्ड बुलेटचं मंदिर आणि त्यामागची रंजक कहाणी
पुन्हा दिवस उगवतो तो पोलीसांना चक्रावून टाकण्यासाठी, पुन्हा बुलेट गायब झालेली असते, आता मात्र पोलीस शोधाशोध न करता थेट ओम बना यांच्या अपघातस्थळी जातात आणि अवाक होतात. गाडी तिथेच उभी असते.
आपल्या देशात श्रध्दे-अंधश्रध्देचे इतके किस्से आहेत की सांगायला गेलो तर आयुष्य कमी पडावं. देशात विविध जाती-धर्माची हजारो-लाखो मंदिरं आहेत, मग भगवान शंकर, विष्णू, गणपती, तिरुपती-बालाजी, सूर्य मंदिर, अगदी रेअर असलेलं कार्तिक स्वामी मंदिरही. एक ना अनेक प्रत्येक ठिकाणी अशी मंदिरं आपल्याला दिसतात. पण देशभरात एक असं मंदिर आहे जे त्रिकालात नाही.
आणि ते मंदिर आहे एका व्यक्तीच्या रॉयल एन्फिल्ड बुलेटचं (Royal Enfield temple)….रॉयल एन्फिल्ड बुलेटचं….?? हो हो तुम्ही तेच ऐकलंय, जे मी म्हणालो ते एका व्यक्तिच्या रॉयल एन्फिल्ड बलेटचंच मंदिर आहे ते. ही घटना आहे सुमारे तीस वर्षांपूर्वीची म्हणजे 1988 सालची.
राजस्थानातल्या जोधपुरपासून सुमारे 50 किलोमीटरवर चोटीला नावाचं गाव आहे. या गावात ओम सिंग राठोड राहात असत. ओम सिंग यांना मोटारसायकलचा छंद होता म्हणून त्यांनी त्यावेळची रॉयल एन्फिल्ड बुलेट खरेदी केली.
दररोज बुलेटची सफारी करणं हे नित्याचंच झालं होतं. एक दिवस ओम सिंग उर्फ ओम बना बांगडी गावापासून चोटीला या आपल्या गावी जायला निघतात. पाली जोधपूर हायवेवर त्यांची बुलेट सुसाट धावत असते अचानक ओम बना यांचा गाडीवरचा ताबा सुटतो आणि गाडी हायवेवरच्या एका झाडाला धडकते. या दुर्घटनेत ओम बना यांचा जागेवरच मृत्यू होतो.
घटनास्थळी पोलीस येतात पंचनामा होतो, डेड बडी नातेवाईकांकडे सोपवली जाते आणि पोलिस बुलेट मात्र पोलीस स्टेशनला घेऊन जातात. पोलीस स्टेशनच्या बाहेर बुलेट उभी केली जाते, सकाळी पोलीस पाहतात तर बुलेट गायब झालेली असते. पोलीस शोध घेतात तेव्हा ती बुलेट काल अपघात झालेल्या ठिकाणी मिळून येते.
एखाद्या चोरानं बुलेट पळाली असावी असं पोलीसांना वाटतं, पोलीस पुन्हा बुलेट पोलीस स्टेशनला घेऊन येतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बुलेट पोलीस स्टेशनसमोरुन गायब होते. पुन्हा शोध घेतल्यावर त्याच अपघातस्थळी सापडते. पुन्हा पोलीस गाडी पोलीस स्टेशनला आणतात आता मात्र साखळदंडानं गाडी बांधली जाते गाडीतलं पेट्रोल काढून टाकलं जातं.
पुन्हा दिवस उगवतो तो पोलीसांना चक्रावून टाकण्यासाठी, पुन्हा बुलेट गायब झालेली असते, आता मात्र पोलीस शोधाशोध न करता थेट ओम बना यांच्या अपघातस्थळी जातात आणि अवाक होतात. गाडी तिथेच उभी असते. आता मात्र पोलीस आणि आसपासचे गावकरी हा काही तरी वेगळा प्रकार आहे हे जाणतात आणि गाडी तिथून हलवत नाहीत.
पोलीस स्टेशनला जेरबंद केलेली, पेट्रोल नसलेली ती बुलेट खुद्द ओम बना यांनीच पुन्हा पुन्हा अपघातस्थळी आणली अशी त्या भागातल्या गावकऱ्यांची भावना आहे. नंतर गावकऱ्यांनी एका चौथऱ्यावर गाडी ठेवली. आज त्या भागातून प्रवास करणारे कित्येक प्रवासी ओम बना आणि त्यांच्या बुलेटचं दर्शन करुन पुढे जातात. असं म्हणतात जे लोक दर्शन करुन पुढे जातात त्यांच्या गाडीला अपघात होत नाही.
काही लोक रात्रीच्या वेळी ओम बना यांनी प्रवाशांना गाडी थांबवून हळू जाण्याची सूचना केल्याचं सांगतात. आजही या ठिकाणी अफाट गर्दी पाहायला मिळते. ओम बना यांचा फोटो आता बुलेट शेजारी गावकऱ्यांनी ठेवलेला आहे. त्याची हार, फुले चढवून पूजा केली जाते.
बाकी काहीही असो, पण पोलीस स्टेशनला लावलेली बुलेट दोन-दोन, तीन-तीन वेळेस पुन्हा अपघातस्थळी कशी आली हा मोठा प्रश्न आहे. का हे निर्माण केलं गेलेलं रहस्य आहे, कोण जाणे….?? वैचारिक विविधतेनं नटलेल्या या देशात काय घडेल काही सांगता येत नाही.
ते काहीही असो आज त्या गावात ओम बना यांच्या रॉयल एन्फिल्डचं मंदिर मात्र नक्की उभं आहे, एकदा कधी तरी नक्की पाहायला जा.
संबंधित ब्लॉग
कुलधरा, एक शापित गाव, जिथे संध्याकाळी 6 नंतर कुणीही राहू शकत नाही!