BLOG: साहेब, तुमचं काय ते सांगा?
Raj Thackeray and MNS Analysis : दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी प्यायचं सोडून राज यांनी स्वतःचं राजकारण करावं. स्वतःचं काय ते सांगावं आणि त्यावर ठाम रहावं. अन्यथा 13 आमदारांवरून एकवर घसरलेल्या मनसेला भविष्यात भोपळाही फोडता येणार नाही.
अकरा वर्षांपूर्वी जगनमोहन रेड्डी (Jagmohan Reddy) या तरुणाने वाय. एस. आर. काँग्रेसची स्थापना केली. वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाय. एस. आर. रेड्डी यांच्या अपघाती निधनानंतर या तरुणाकडे लोकांची सहानुभूती तर होती, पण काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिलं नाही. काँग्रेसमध्ये (Congress) पद न मिळाल्याने त्याने स्वतःचा पक्ष स्थापला. आठ वर्षं प्रचंड मेहनत घेतली. लोकांचे प्रश्न लावून धरले. प्रसंगी तुरुंगवासही भोगला. त्याचं फळ त्याला मिळणारच होतं. आठ वर्षांनी, म्हणजे 2019 मध्ये हा तरुण आंध्रप्रदेशचा मुख्यमंत्री (Andhra Pradesh CM) झाला.
केजरीवालांचा उदय
2010 – 11 च्या सुमारास भारतीय राजकारण नवं वळण घेत होतं. अण्णा हजारेंच्या आंदोलनाने देश ढवळून निघाला होता. सव्वा शतकांच्या काँग्रेसचे एक एक बुरूज ढासळत होते. अशा वेळी अरविंद केजरीवाल हा नवा चेहरा भारताच्या राजकीय पटलावर उदयास येत होता. एक दोनदा नव्हे, तर चक्क तीन वेळा हा तरुण दिल्लीचा मुख्यमंत्री झाला. तरी त्याच्या क्षमतेवर शंका होतीच. कारण दिल्ली हे निव्वळ एक शहर आहे. त्याला पूर्ण राज्याचा दर्जादेखील नाही. त्यामुळे केजरीवाल यांच्या राजकीय क्षमतेवर प्रश्नचिन्ह होतेच. पण नुकतेच आम आदमी पार्टीने पंजाब काबीज केले आणि टीकाकारांना योग्य उत्तर दिले.
तेजस्वी वाटचाल
तिथे बिहारमध्ये तेजस्वी यादव निवडणूक हरला जरी असला, तरी त्या एकट्याने भाजप – जनता दल युनायटेड आघाडीला घाम फोडला. आघाडीसमोर तेजस्वी आत्मविश्वासाने उभा राहिला आणि अभूतपूर्व असं यश संपादित केलं.
मनसे कुठंय?
या तिन्ही नेत्यांमधील समान गुण म्हणजे चिकाटी, मेहनत आणि स्वतःचं राजकारण करण्याची धमक. महाराष्ट्रात 16 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्ता तर दूरच, पण आहे तेदेखील राखता आलेलं नाही. प्रत्येक निवडणुकीत अधिकाधिक क्षीण होत जाणारा देशात कोणता पक्ष असेल, तर तो राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना. याचं कारणच की, राजना सोळा वर्षांत कधीही स्वतःचं राजकारण करणं जमलेलं नाही. ते सदैव कुणाची तरी बी टीम म्हणून काम करत आलेत. मेहनत, जनतेचे खरे प्रश्न, लोकांमध्ये जाणं या सगळ्याचा राज यांच्या राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नाही. निवडणुका आल्या की चार भाषणं झाडायची, एखाद्या ज्ञानी ऋषीप्रमाणे विद्वत्तेचा आव आणून इतरांना उपदेशाचे डोस पाजायचे आणि पुन्हा एकांतवासात जायचे असे राज यांचे सोळा वर्षांचे राजकारण.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित ‘गुढीपाडवा मेळाव्या’त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी उसळलेला प्रचंड जनसमुदाय.#गुढीपाडवा_मेळावा #MNSAdhikrut pic.twitter.com/6uExnfKeur
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 2, 2022
जेमतेम यश
राज यांच्या मनसे स्थापनेच्या पहिल्या सभेस प्रस्तुत लेखक उपस्थित होता. त्यावेळी आक्रमक राज ठाकरे यांचे अनपेक्षित उदार राजकारण अनुभवायला मिळाले होते. मनसेचा झेंडाच मुळी त्याचं निदर्शक होता. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असा राज यांचा सूर होता. त्यानंतर वर्षभराने झालेल्या पालिका निवडणुकीत मनसेला जेमतेम यश मिळालं. मुंबईत मनसेला अवघ्या सात जागा मिळाल्या. सर्वसमावेशकतेचं राजकारण यश मिळवून देत नाही हे लक्षात येताच राज यांनी आपलं आक्रमक राजकारण सुरू केलं. मराठीच्या नावाने हिंसक राजकारण करून राज यांनी “स्थापनेवेळीचा तो मी नव्हेच” असा संदेश दिला. 2009च्या विधानसभा निवडणुकीत याचा मोठा प्रभाव दिसला. मनसेला या निवडणुकीत केवळ 13 जागा मिळाल्या असल्या तरी युतीच्या किमान दुप्पट जागा त्यामुळे पडल्या होत्या. 2009 ला राज ठाकरे नसते, तर ती निवडणूक काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीसाठी केक वॉल्क ठरली नसती. या निवडणुकीत राज यांनी सेना भाजपचं भयंकर नुकसान केलं. त्यावेळी राज यांचा बोलविता धनी काँग्रेस आहे असा आरोप केला जायचा. राज यांचा एकूणच राजकीय प्रवास पाहता हा आरोप खोडून काढता येणार नाही.
2012 च्या पालिका निवडणुकीत मनसेने मुसंडी मारली. मुंबईत 27 नगरसेवक निवडून आले. पुणे, ठाण्यात समाधानकारक कामगिरी केली. भाजपच्या साथीने नाशिक पालिकेवर झेंडा फडकावला. पण, 2014 येईपर्यंत मोदी हे खूपच मोठे बनले होते. त्यांच्यापुढे आपला निभाव लागणार नाही, हे राज यांनी अचूक हेरलं होतं. भाजपशी पंगा नको या विचाराने त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपच्या कलेने लढली. जिथे शिवसेनेचा उमेदवार तिथेच मनसेने उमेदवार दिला, पण जिथे भाजपचा उमेदवार असेल तिथे मनसेने निवडणूकच लढली नाही. 2014 च्या विधानसभेत राज यांच्या मनसेचा एकच आमदार निवडून आला, तर राज्यात पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या एमआयएमला दोन जागा मिळाल्या होत्या. राज यांचा मनसे अस्तित्वासाठी संघर्ष करत होता.
सपाटून मार
2017च्या पालिका निवडणुकीआधी मनसेने शिवसेनेकडे युतीसाठी प्रस्ताव पाठवला. पण शिवसेनेने तो धुडकावून लावला. मुंबईत आमच्या जेवढ्या जिंकलेल्या जागा आहेत, फक्त त्याच जागा आम्हाला द्या, असा केविलवाणा प्रस्ताव मनसेने दिला होता. तोही शिवसेनेने साफ नाकारला. या निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले. त्यातील सहा नंतर शिवसेनेत दाखल झाले. नाशिक पालिका हातातून गेली. राज्यात इतरत्रही सपाटून मार खाल्ला.
महाराष्ट्राच्या राजकारणातून आपण बाहेर तर फेकलो जाणार नाही ना, ह्या भीतीने ऐन 2019च्या लोकसभा निवडणुकीआधी राज पवारमय झाले. पवार म्हणतील ती पूर्व दिशा असं त्यांचं राजकारण राहिलं. इतकंच नव्हे, तर त्यांनी पक्षाचा उमेदवार नसतानाही मोदींविरोधात प्रचार केला. विधानसभेत मनसेचा एकमेव आमदार निवडून आला. तो राज यांच्या सुदैवाने अजूनही मनसेत आहे.
भाजपसमोरचा पर्याय?
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एकट्या पडलेल्या भाजपला शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी एका साथीदाराची गरज आहे. याकामी राज ठाकरे तुरुपचा एक्का सिद्ध होतील, असा भाजपचा कयास आहे. भाजपच्या राजकारणाला काहीशा मर्यादा आहेत. ते हिंसेच, द्वेषाचं उग्र राजकारण स्वतः करू इच्छित नाहीत. राज हे त्यांना त्यादृष्टीने उत्तम पर्याय वाटतात.
“मला असाच झेंडा हवा होता, पण काही सहकाऱ्यांच्या सूचनेमुळे मी तेव्हा तो झेंडा निवडला होता”, असं बाळबोध स्पष्टीकरण नव्या झेंड्याच्या अनावरणप्रसंगी राज यांनी दिलं होतं. या झेंड्याच्या माध्यमातून त्यांनी आगामी राजकारणाची दिशाच स्पष्ट केली होती. त्यांचं हिंदुत्वाचं राजकारण किती उग्र आणि हिंसक असेल, याची चुणूक त्यांनी गुढीपाडव्याच्या भाषणाप्रसंगी दाखवून दिली. मशिदीसमोर हनुमान चालीसा पठण करा, असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. यापेक्षा वेगळा विधायक कार्यक्रम राज आपल्या कार्यकर्त्यांना देऊ शकतील, अशी अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे. यामुळे समाजात विद्वेष, कटुता अधिकच वाढेल यात शंका नाही.
याच भाषणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करतानाच अनवधानाने त्यांनी तेथील उग्र जातीभेदाचं लाजिरवाणं उदाहरण दिलं. आपल्या क्षणिक राजकीय फायद्यासाठी राज ठाकरे महाराष्ट्राला अशाच प्रकारच्या टोकाच्या धर्मांधतेत ढकलत आहेत. ज्या बेहरामपाड्यात राज ठाकरेंना केवळ दहशतवादीच दिसतात, तिथल्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांनी दिवसरात्र चालणाऱ्या मशीनचे आवाजही ऐकावेत. राज यांना अध्येमध्येच ऐकू येतं आणि जे ऐकायचं तेच ऐकू येतं, त्यामुळे त्यांना ते आवाज कधीही ऐकू येणार नाहीत.
एक वक्ता… लक्ष लक्ष श्रोते!#गुढीपाडवा_मेळावा #चला_शिवतीर्थावर #MNSAdhikrut pic.twitter.com/IndQp7vNsV
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 30, 2022
‘सोळावं वरीस धोक्याचं’
राज यांच्या मनसेला सोळा वर्षं झाली आहेत. “सोळावं वरीस धोक्याचं” असं म्हणतात. कारण सोळावं वर्षं हे तरुण होण्याचं वय असतं. मनसे आता तरूण झालीय. तेव्हा, दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी प्यायचं सोडून राज यांनी स्वतःचं राजकारण करावं. स्वतःचं काय ते सांगावं आणि त्यावर ठाम रहावं. अन्यथा 13 आमदारांवरून एकवर घसरलेल्या मनसेला भविष्यात भोपळाही फोडता येणार नाही. “तुमच्या राजाला साथ द्या” असं आर्जव राज ठाकरे सध्या करताना दिसतात. गुढीपाडव्याच्या सभेत नाशिकच्या पराभवासाठी त्यांनी मतदारांनाच जबाबदार धरलं. पण राजाच बेभरवशी असेल, तर जनता साथ कशी देणार, याचा विचार राज ठाकरे करणार आहेत का?
राज यांना प्रबोधनकारांचा वारसा आहे. आपल्या विचारांसाठी त्यांनी सनातन्यांकडून दगड अंगावर झेलले आहेत. तेव्हा, हा आदर्श राज यांनी नक्कीच घ्यायला हवा. राजकारणातील क्षणिक यशापयशाची फिकीर न करता, स्वतःचं काय ते बोललं पाहिजे. राजकारणात यश मिळवायचंच असेल तर मेहनत घेतली पाहिजे. वयाने धाकट्या जगनमोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल आणि तेजस्वी यादवकडून खूप शिकलं पाहिजे. एखाद्या भाषणात पाच सात वेळा शेतकरी आत्महत्येचा विषय काढल्याने तुमचं गांभीर्य दिसत नाही. तुम्हाला पाच सात वर्षं तो विषय लावून धरावा लागतो.
राज्यात सध्या सत्ताधारी – विरोधक यांच्यात गलिच्छ आरोपांच्या फैरी झडताहेत. सामान्य माणूस, गरीब, शेतकरी, कामगार बातम्यामधून हद्दपार झाला आहे. लोकांचे प्रश्न पटलावरून गायब झाले आहेत. स्वतःच्या विधायक राजकारणासाठी राज यांच्याकडे ही चालून आलेली सुवर्णसंधी आहे. राज यांनी कुणाची बी टीम बनण्यापेक्षा गांभीर्याने स्वतःचं राजकारण केलं पाहिजे. विद्वेषाचं अल्पजीवी राजकारण करण्यापेक्षा दीर्घकालीन राजकारणासाठी स्वतःची ओंजळ मोठी केली पाहिजे.
(लेखकाविषयी: लेखक वेगवेगळ्या विषयांवर ब्लॉगद्वारे सातत्यानं लिखाण करत असून वरील लेखात व्यक्त करण्यात आलेली मतं ही लेखकाची व्यक्तिगत मतं आहेत.)
हेही वाचा :
नामांतर चळवळीतील एक ठळक नाव म्हणजे प्रा. जोगेंद्र कवाडे; ऐतिहासिक लाँग मार्चचे प्रणेते