राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदार बृजभूषणचा बोलिवता धनी कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र शोधतोय. काहींचा संशय होता की, ही सगळी भाजपचीच खेळी आहे, राज ठाकरेंना कायमची अडकवण्याची. काहींना यामागे शरद पवारांचाही (Sharad Pawar) हात दिसला. कारण खुद्द बृजभूषण म्हणाले, पवार बडे दिलवाला. ह्या सगळ्या घडामोडींमुळे घटना एक पण हात अनेक असं चित्रं उभं राहिलं. संशयाचा धूर रोज राजकीय कोपरे बदलत होता. यावर आता राज ठाकरे काय बोलणार याचीही उत्सुकता होती आणि अपेक्षेप्रमाणे राज ठाकरेंनी तो धूर दूर करत, काही स्पष्ट संकेत, काही घटना सांगत भाजपालाच (BJP) कटघऱ्यात उभं केल्याचं दिसतंय. एवढच नाही तर बृजभूषणचा बोलविता धनी हा भाजपाच असल्याचं त्यांनी स्पष्ट इशारा केलाय.
पुण्यातल्या सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी थेट महाराष्ट्रातूनच रसद पुरवली गेली पण ती नेमकी कोणत्या नेत्यानं पुरवली त्यांची नावं त्यांनी जाहीर नाही केली. खरं तर राज ठाकरे स्पष्ट आणि थेट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत पण याबाबतीत मात्र त्यांनी चित्रं स्पष्ट करण्याऐवजी फक्त इशारा करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले- त्यानंतर पुण्यात मी अयोध्येला जाणार याची तारीख जाहीर केली. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. अयोध्येला येऊ देणार नाही. मी पाहत होतो. काय चाललं नेमकं. मला मुंबईतून माहीत मिळत होती. दिल्लीतून माहिती मिळत होती. उत्तर प्रदेशातून माहिती
मिळत होती. नेमकं काय चाललंय. एक वेळ चाललं की हा ट्रॅप आहे. या सापळ्यात आपण अडकलं नाही पाहिजेत. या सर्व गोष्टीची सुरुवात झाली. त्याची रसद पुरवली गेली. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली, हा विषय पुन्हा बाहेर काढा. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सर्वांनी मिळून आराखडा आखला.
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा जेव्हापासून जाहीर झालाय तेव्हापासून दोनच नेते बृजभूषण यांच्याकडूनही चर्चेत आहेत- एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे शरद पवार. त्यामुळे ह्या दोघांनी किंवा दोघांपैकी एकानं ही रसद पुरवल्याचं तरी राज ठाकरेंना म्हणायचं नाहीय? कारण काहीही असो- राज ठाकरेंच्या निशाण्यावर आज भाजप होता हे सांगायला राजकीय पंडितांचीही गरज नाही.
राज ठाकरेंनी फक्त महाराष्ट्रातून पुरवल्या जाणाऱ्या रसदीवरच बोट ठेवलं असं नाही तर त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही घेरण्याचा प्रयत्न केला. अयोध्येला का गेलो नाही हे सांगताना राज ठाकरेंनी आपल्या मुलांवर हकनाक केसेस पडल्या असत्या अशी भीती व्यक्त केलीय. याचाच अर्थ असा की राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं की, बृजभूषणसोबत अयोध्येत काही तरी कमी जास्त झालं असतं, त्यावरुन कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या गेल्या असत्या आणि त्यातून मग महाराष्ट्रात ऐन निवडणुकीत मनसे कार्यकर्तेच राहिले नसते. हा ट्रॅप आहे, हा सापळा आहे हे सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत. ते म्हणाले- मी हट्टाने गेलो असतो. महाराष्ट्रातील सैनिक हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं. आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला तुरुंगात सडवलं गेलं असतं. हकनाक कारण नसताना केसेसचा ससेमिरा लावला असता. मी बाळा नांदगावकर आणि सरदेसाईंना सांगितलं आपल्या पोरांना हकनाक घालवणार नाही सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर केसेस टाकल्या असत्या. ऐन निवडणुकीच्यावेळी हे झालं असंत. तेव्हा इथे कोणीच नसतं हा सर्व ट्रॅप होता. एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का. या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. काही तर तुम्हाला सांगता येणार नाही.
राज ठाकरेंच्या या वक्तव्यात एक वक्तव्य आवर्जून नमुद करण्यासारखं आहे आणि ते म्हणजे एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो हे शक्य आहे का? याचाच अर्थ राज ठाकरेंना बृजभूषणच्या मागे खुद्द योगी आदित्यनाथ आहेत असं तर म्हणायचं नाही? राज ठाकरेंच्या म्हणण्यात दमही आहे. कारण भाजपच्या पाठबळाशिवाय खरंच एखादा खासदार न ऐकता राज ठाकरेंना असा विरोध करु शकतो जे भाजपचाच अजेंडा सध्या तरी चालवतायत. पचणी न पडणारी ही गोष्ट आहे.
महाराष्ट्राची रसद ते योगी आदित्यनाथ ते थेट गुजरात. राज ठाकरेंनी आजच्या सभेत भाजपवर निशाणा साधन्याची संधी सोडली नाही. कदाचित त्यांच्यावर जो दबाव वाढतोय आणि ते घेरले जातायत अशी जी चर्चा सुरुय, ते भेदण्याचा प्रयत्न त्यांनी आज केला असावा. राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी भूमिका उत्तर प्रदेशातल्या खासदारानं घेतलीय. त्याला उत्तर देताना राज ठाकरेंनी भाजपला गुजरातचं उदाहरण देत सवाल विचारला तोही अल्पेश ठाकूरचा. ते म्हणाले- 12 वर्षानंतर जाग आली. तेव्हा कुठे होती ही माणसं. एक सांगतो. यातून चुकीचे पायंडे पडतात हे लक्षात ठेवा. विषय माफी मागण्याचा आहे ना. गुजरातला अल्पेश ठाकूर आहे. एका मुलीवर बलात्कार झाला. उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांना मारलं,. 10 ते 15 हजार लोकांना गुजरातमधून हाकलून दिलं. ते मुंबईत आले. ते पुन्हा गुजरातला गेले. तिथून कोण माफी मागणार आहे. तिथून कुणाला माफी मागायला लावणार?
हे इथं मुद्दाम नमुद करावं लागेल की, अल्पेश ठाकूर कधी काळी काँग्रेसमध्ये होते आणि आता ते भाजपसोबत आहेत. याचाच अर्थ मला माफी मागायला सांगता तर मग तुमच्या नेत्यालाही का सांगत नाहीत असं तर राज ठाकरेंना भाजपला म्हणायचं नसेल? तेही गुजरातच्या भाजपच्या नेत्याला हे विशेष.
राज ठाकरेंनी आतापर्यंत मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या शहरात सभा घेतल्या. कुठल्या सभेत त्यांच्या टार्गेटवर भोंगे होते तर कुठल्या सभेत शरद पवार तर कुठल्या सभेत हिंदुत्वाचा अजेंडा. पण पुण्यातली राज ठाकरेंची आजची सभा जर कुठल्या एका गोष्टीमुळे लक्षात राहिल तर ती आहे-त्यांनी भाजपचा चक्रव्युह भेदण्याचा केलेला प्रयत्न. फक्त तो आता भेदण्यात यशस्वी ठरतात की, त्यांचा अभिमन्यू होईल हे आगामी काळात महाभारताचे अंक जसजसे उलगडत जातील तसं स्पष्ट होईल.