BLOG: साईभक्तांना कोण डिवचतंय, शिर्डीत असंतोष का आहे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील या सरकारने घेतलेल्या निर्णयाने शिर्डीत असंतोष वाढवला आहे. त्यातून अगदी शिर्डी बंदची हाकही देण्यात आली. हे सरकार आपल्या श्रद्धांना डिवचत आहे असं साईभक्तांना वाटू लागलंय.
देवेंद्र फडणवीस सरकारवर रोष व्यक्त करणाऱ्या समाज घटकांची दिवसेंदिवस वाढ होत होती ही तेव्हाची गोष्ट आहे. आधीच शेतकरी, अंगणवाडी कर्मचारी रागात होते. मुंबईत लोकल प्रवासी 23 जणांच्या चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूने संतप्त होते. पेट्रोलच्या भाववाढीने मध्यमवर्गात अस्वस्थता होती. जीएसटीने छोटे व्यापारी चिडले होते. त्यात वारकरी आणि शिर्डीच्या साईबाबांचे भक्तही त्या सरकारवर संताप व्यक्त करते झाले (Birthplace issue of Saibaba Shirdi). वारकऱ्यांनी मुंबईत आझाद मैदानात जमून सरकारचा टाळ-मृदंग वाजवून हरिनामाचा गजर करत निषेध केला होता. तिकडे शिर्डीत साईभक्तांनी पत्रकं काढून निषेध नोंदवला. सरकार साईबाबांच्या स्मृतिशताब्दी वर्षात बाबांच्या विचाराला मारक कृती करत आमच्या श्रद्धा-भावनांना डिवचतंय, असा साईभक्तांचा आरोप होता (Birthplace issue of Saibaba Shirdi).
फडणवीस सरकार गेलं. आत्ता नवं महाविकास आघाडीचं सरकार आलं. मात्र, धोरणात्मकदृष्ट्या नव्या ठाकरे सरकारनं फडणवीस सरकारच्याच चूकीची पुनरावृत्ती केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील या सरकारने घेतलेल्या निर्णयाने शिर्डीत असंतोष वाढवला आहे. त्यातून अगदी शिर्डी बंदची हाकही देण्यात आली. हे सरकार आपल्या श्रद्धांना डिवचत आहे असं साईभक्तांना वाटू लागलंय. सरकारने घेतलेला हा निर्णय जाणूनबुजून घेतल्याचीही भावना शिर्डीतील साईभक्त व्यक्त करत आहे. याला ते आपल्या श्रद्धास्थानावरील हल्लाच मानत आहेत.
साईभक्तांना असं का वाटतंय?
साईभक्तांची स्मृतिशताब्दी 2018 मध्ये झाली. 1857 रोजी साई शिर्डीत 16 व्या वर्षी प्रकटले आणि 15 ऑक्टोबर 1918 रोजी साईंनी समाधी घेतली. स्मृतिशताब्दीच्या निमित्तानं तेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात उल्लेख केला की, साईबाबांची जन्मभूमी पाथरी जि. परभणी हे गाव असून त्या गावाचा विकास सरकार करेन. राष्ट्रपतींचा शब्द हा खूप महत्त्वाचा असतो. त्या भाषणाचं सरकारी रेकॉर्ड होतं. पाथरीच्या उल्लेखानं शिर्डीकर दुखावले गेले. पाथरीचा जावई शोध कुणी लावला? असा प्रश्न तेव्हाच साईभक्तांनी जाहीरपणे विचारला होता. पण तेव्हा फडणवीस सरकारने तो प्रश्नः दाबून टाकला.
खरं म्हणजे स्वतः साईबाबांनी त्यांचं कूळ आणि मूळ गुढ ठेवलं. त्यांची जात, त्यांचा धर्म याबद्दलची माहिती संदिग्ध आहे. त्यामुळे साई सर्व धर्मियांना आपले वाटतात. हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, जैन, लिंगायत असे वेगवेगळ्या धर्माचे लोक म्हणूनच ‘शिर्डीस पाय लागो’ची भावना मनी धरतात. लांबहून येतात. साईंचा ‘श्रद्धा आणि सबुरी’चा, ‘सबका मलिक एक है’ हा विचार घेऊन जातात. एका अर्थानं शिर्डी हे ‘सेक्युलर’ देवस्थान बनलंय. पण राष्ट्रपतींच्या दौऱ्यात पाथरीचा उल्लेख झाल्यानं पाथरीत सरकारचा प्रति शिर्डी उभी करायचा तर मानस नाही ना? अशी शंका शिर्डीकरांकडून व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही साईभक्तांनी प्रति शिर्डी, प्रति साई मंदिर उभारायला संघटित विरोध केला होता, हा इतिहास आहे.
पाथरीच्या उल्लेखाविषयी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की, साईंच्या कुठल्याही अधिकृत चरित्रात पाथरीचा उल्लेख नाही. मग बाबांचा पाथरीचा जन्म ही माहिती राष्ट्रपतींना कुणी दिली? ही माहिती खोटी आहे, असं साईभक्त मानतात. उद्या राष्ट्रपतींना माहितीच्या अधिकारात कुणी साई भक्तानं विचारलं की, ही खोटी माहिती तुम्हाला कुणी पुरवली? तर राष्ट्रपतींना माफी मागावी लागेल. या प्रकरणात राष्ट्रपतींची केवढी विश्वासार्हता पणाला लागेल. खोटी माहिती एक विशिष्ट अजेंडा ठेवून पुरवण्यात येतेय, असा साईभक्तांचा आरोप आहे.
आत्ता ठाकरे सरकारने पाथरीच्या विकासाला 100 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शिर्डीतले साईभक्त संतापले आहेत. शिर्डी परिसरात जवळपास चाळीस गावात असंतोष धुमसतोय. लोक बंद, आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या वादाला शिर्डी विरूद्ध पाथरी असं स्वरूप मीडियाकडून दिलं जातंय. सरकार खोट्या गोष्टीला पाठीशी का घालते आहे असा प्रश्न शिर्डीकर विचारत आहेत. शिर्डीचे महत्व कमी करायचे, साई बाबाना हिंदू ठरवायचं. पाथरीला नवं साई मंदिर बांधायचं, शिर्डीचं महत्व कमी करायचं आणि तेही खोट्या इतिहासाच्या आधारे. हा विकृत दावा आहे, असंही मत साईभक्तांकडून व्यक्त केलं जात आहे.
साईबाबांचा इतिहास विकृत करणारा संशय बळावणाऱ्या इतरही काही घटना राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळी शिर्डीत घडल्या होत्या. सगळीकडे भगवे झेंडे लावले गेले. यापूर्वी असे झेंडे शिर्डीत कधी दिसले नव्हते. मंदिर परिसरात ध्वजस्तंभ उभारला. हा ध्वजस्तंभ कुंभ मेळ्यातला आहे. ध्वजस्तंभावर त्रिशूळ आहे. या त्रिशुळाचं शिर्डीत काय काम? असा प्रश्न साईभक्तांनी त्यावेळी जोरकसपणे उपस्थित केला. साईबाबांनी सबुरीचं सुफी तत्त्वज्ञान सांगितलं. तिथं एका धर्माशी संबंधित आणि परत ते हिंस्त्रतेचं प्रतीक, कुणाला तरी मारण्यासाठीचं शस्त्र शिर्डीत का आणलं जातंय? याची चर्चा आता हळूहळू सर्वदूर साई भक्तांत पोहोचत चाललीय. ध्वजस्तंभ हे वैदिकांच्या विजयाचं प्रतीक चिन्ह मानलं जातं. साईभक्तांमध्ये वैदिक-अवैदिक, हिंदू, मुस्लीम असे सर्व जात-धर्मीय आहेत. त्यांना साईबाबांच्या शिर्डीत ध्वजस्तंभ उभारणं खटकल्याशिवाय राहणार नाही. उद्या हा ध्वजस्तंभ हटवा, अशी चळवळ उभी राहिली तर आश्चर्य वाटायला नको. त्याचा जर भाजपविरोधी राजकीय पक्षांनी फायदा घेतला तर शांत शिर्डीत अशांतता पसरायला वेळ लागणार नाही.
यापूर्वी एका शंकराचार्यांनी साई हे देव नव्हते, तिथं हिंदूंनी जाऊ नये, अशी साईबाबांची निंदानालस्ती केली होती. त्याला उत्तर म्हणून शंकराचार्यांचा शिर्डीत निषेध झाला होता. साईभक्तांनी तीव्र आंदोलनं केली होती. राज्यात फडणवीस सरकार असताना नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे यांची साई संस्थानचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. हावरे यांच्यावर बांधकाम व्यवसायात आर्थिक गुन्ह्यांच्या केसेस दाखल झाल्या होत्या. त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधीलकी सर्वज्ञात होती. त्यावेळी हावरे यांच्या नियुक्तीलाही साईभक्तांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर तेव्हा राष्ट्रपतींच्या दौऱ्यानंतर साईभक्तांची अस्वस्थता आणखी वाढली होती.
पंढरपूर, शिर्डी ही ठिकाणं महाराष्ट्राच्या समन्वयी सांस्कृतिक, अध्यात्मिक परंपरेचा वैभवशाली वारसा असलेली केंद्र आहेत. पंढरपूरच्या देवस्थानात राजकारण करणं किंवा साईबाबांच्या शिर्डीत त्रिशुळ आणून सबुरी आणि सर्वसमावेशक तत्त्वज्ञानाला नख लावणं. भक्तांच्या श्रद्धा दुखावणं. या फंदात शहाण्या राज्यकर्त्यांनी पडू नये हेच सोयीस्कर असतं. धर्म, अध्यात्म, श्रद्धा या नाजूक गोष्टींशी खेळणारे राज्यकर्ते बदनाम होतात. पुढे धुळीस मिळतात, हा इतिहास सर्वच राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवलेला बरा. अन्यथा सिंहासन संकटात आहे, हे खुशाल समजावं. उद्धव ठाकरे सरकारने फडणवीस सरकारचीच चूक केली आहे. ती दुरुस्त करण्याचा शहाणपणा या सरकारला लवकर येवो. त्यातच देशभरातील साईबाबांच्या भक्तांचं आणि शिर्डीतील सामाजिक एकोप्याचं भलं आहे.
(लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)