Special Report : कांदिवलीत वाजली ‘मलेशियन’ अजान! पोलिसांचा दावा काय आणि मनसेच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
कांदिवलीतील मशिदीत अजान वाजली आणि त्यासमोर मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावली असा दावा या व्हिडीओतून करण्यात आला. मात्र, या व्हिडीओवरुन आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम (Ultimatum) दिला. राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. पोलिसांनी समन्वय घडवून आणत 4 मे रोजी सकाळी अनेक मशिदींमधील भोंग्यावरील अजान होऊ दिली नाही. तर ज्या मशिदींवर अजान झाली त्यासमोर मनसे कार्यकर्त्यांना हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावल्याचे व्हिडीओ समोर आले. असाच एक व्हिडीओ मनसे कार्यकर्त्यांकडून व्हायरल करण्यात आला. कांदिवलीतील मशिदीत अजान वाजली आणि त्यासमोर मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावली असा दावा या व्हिडीओतून करण्यात आला. मात्र, या व्हिडीओवरुन आता चांगलीच चर्चा रंगली आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत अनेक गमतीशीर गोष्टी दडल्याचा आरोप होत आहे. कांदिवलीतील गणेशनगरमध्ये पहाटे चार वाजता तिथे मनसे कार्यकर्त्यांची गडबड सुरु होती. पहाटे 5 वाजता मशिदीमध्ये अजान सुरु होईल. तेव्हा हनुमान चालिसा लावण्याची तयारी मनसे कार्यकर्ते करत होते. काही मनसे कार्यकर्ते एका इमारतीच्या गच्चीवर चढले. त्या इमारतीच्या समोर एक मशीद होती. पहाटेचे 5 वाजले आणि अजानचा आवाज सुरु झाला. त्याला उत्तर म्हणून इकडून मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावली.
मनसे कार्यकर्त्यांनी रेकॉर्डेड अजान लावली?
या व्हिडीओमागचा खरा ट्विस्ट पोलिसांच्या एन्ट्रीनंतर समोर आला. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण पोलिसांच्या दाव्यानुसार या व्हिडीओत जी अजान ऐकू येते आहे, तो आवाज या समोरच्या मशिदीतून आलाच नाही. कारण, मुंबई पोलिसांनी एक दिवस आधीच या परिसरातल्या मौलानांना पहाटेची अजान बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं. मग प्रश्न पडतो की जर मशिदींवरची अजान बंद होती, तर मग या व्हिडीओत अजानचा आवाज कुठून आला. पोलिसांच्या दाव्यानुसार ज्या मनसे कार्यकर्त्यानं हा व्हिडीओ शूट केला त्यानंच एका दुसऱ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डेड अजान लावली. जेणेकरुन आपलं आंदोलन यशस्वी झाल्याचं सांगता यावं!



‘ती’ अजान आखाती देशातील?
पोलिसांच्या हाती हा व्हिडीओ लागल्यानंतर पहिली शंका अजानच्या पद्धतीवरुन बळावली. कारण, या व्हिडीओत ज्या पद्धतीनं अजानचा आवाज ऐकू येतोय., अश्या प्रकारची अजान आखाती देशांमध्ये दिली जाते. त्यामुळे हनुमान चालिसा लावून, दुसऱ्या बाजूला यूट्यूबवर अजान वाजवून आपण मशिदीसमोरच्या अजानविरोधात चालिसा लावली, असं भासवलं गेल्याचा आरोप आता केला जातोय. सध्या या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. जर मशिदीवरची अजान बंद होती, तर मग या व्हिडीओत रेकॉर्ड झालेला अजानचा आवाज नेमका कुठून आला? याचा तपास आता पोलीस करत आहेत.