मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजाराच्या घरात पोहोचला आहे. आझाद मैदानावर (Azad Maidan) मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन (ST Workers Strike) सुरु आहे. मात्र, राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या नियमावलीनुसार या कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेसाठी आझाद मैदान सोडावं लागणार आहे.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा दुखवटा सुरुच राहणार असल्याचं या कर्मचाऱ्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. सरकारच्या नियमावलीनुसार आम्ही संध्याकाळी 5 ते पहाटे 5 पर्यंत आझाद मैदानातू बाहेर पडणार आहोत. मात्र, पाहाटे 5 वाजता आम्ही पुन्हा एकदा आझाद मैदानावर दुखवटा पाळणार असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतल्याचं या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. तसंच आमची बाहेर राहण्याची आणि खाण्याची सोय झाल्याचंही कर्मचारी म्हणाले. दुसरीकडे राज्यात विविध आगारात पाळला जाणारा दुखवटा सुरुच राहील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
आझाद मैदानातील आंदोलनाचं नेतृत्वं वकील गुणरत्न सदावर्ते करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या बाजूनं सदावर्तेचं कोर्टात लढत आहेत. त्यामुळं अधूनमधून ते आझाद मैदानातही येत असतात आणि कर्मचाऱ्यांना विलीनीकरणाचा विश्वास देतात.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन, भाजपच्या मुनगंटीवारांनी, राष्ट्रवादी आणि परिवहन मंत्री अनिल परबांवर टीकास्त्र सोडलंय. हर्बल वनस्पतींचं सेवन करुन राष्ट्रवादीनं जाहीरनामा तयार केला का ? असा सवाल मुनगंटीवारांनी केलाय. मुनगंटीवार म्हणाले, “एसटी कामगारांनी ज्या मागण्या केल्या त्या तुम्ही आपल्या शपथनाम्यात हे निश्चित देऊ असं सांगितलं. एसटी कामगारांच्या संमेलनात जाऊन तुम्ही मोठी मोठी भाषणं केली. शरद पवार स्वतः आणि अनिल परब यांनीही एसटी कामगारांना राज्य व केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊ असं सांगितलं. मग तुम्ही शपथनाम्यात जे लिहिता ते कोणती हर्बल वनस्पती घेऊन लिहिलं जात नाही. कोणत्या क्रुझ पार्टीत ड्रग्जचं सेवन करून लिहिलं जात नाही. मग अशा प्रसंगात जे तुम्ही सांगितलं त्यावर कृती करणं महत्त्वाचं आहे.”
गेल्या 51 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात, एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सुरु आहे. मात्र कोरोनामुळं सध्या वेळेचं बंधन आलं असलं, तरी वेळेच्या बंधनात आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांचा आहे.
इतर बातम्या :