Aurangzeb: कुणी जीव दिला, कुणी निर्वासीत मेलं, औरंगजेबाच्या ‘खऱ्या’ औलादींचं नेमकं काय झालं? वाचा सविस्तर
विशेष म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूच्या काही दिवस आधी, एक नाही, दोन नाही तर तीन नातवांनाही मृत्यूनं गाठलं. आणि त्याच मृत्यूच्या धक्क्यावरील धक्क्यात औरंगजेबही गेला. ज्या सम्राटानं आयुष्यभर इतरांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात धन्यता मानली, कत्तली केल्या, त्याला उतारवयात त्याच मृत्यूनं आरसा दाखवला.
औरंगजेबाच्या 90 वर्षाच्या (Aurangzeb) आयुष्यावर एक नजर टाकली तर त्याच्याएवढे मृत्यू क्वचितच एखाद्या सम्राटानं बघितले असावेत. खुद्द त्याचं आयुष्य खडतर गेलं. ते त्यानंच निवडलं. महालाऐवजी त्यानं रणांगणात आयुष्य घालणं जास्त पसंत केलं. त्याला कारण सत्ता हेच होतं. त्यासाठी त्यानं बापाला कैद्येत टाकून छळ केला. भावंडांच्या कत्तली केल्या. कदाचित त्यामुळेच नियतीनं औरंगजेबाची अखेर एकाकी केली. जो बादशहा (Mughal Emperor ) दुसऱ्यांना मृत्यूदंड देण्यात आनंद मानायचा, त्याला डोळ्यासमोर त्याच्या मुलाबाळावर मृत्यूच्या वीजा पडताना पहाव्या लागल्या.
औरंगजेबाचा गोतावळा
औरंगजेबाला तीन बायका होत्या. त्यांची एकूण 10 मुलं होती. त्यापैकी पाच मुलं आणि पाच मुली असा कुटुंबकबिला होता. खुद्द औरंगजेब हा 90 वर्षे जगला त्यामुळे त्याच्या मुलाचं म्हातारपण पहाणेही त्याच्या नशिबी होतं. पण औरंगजेबाची जशी वारशाची लढाई त्याच्या भावंडांसोबत होती तसाच वाद औरंगजेबाच्या मुलांमध्येही होता. त्यातल्या मुलांचं काय झालं ते पहावू.
1. बहादूर शहा पहिला किंवा मुहम्मद मुअज्जम
औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झाला. त्यानंतर मुघल साम्राज्याची सत्ता मुअज्जमवर आली. पण तो फार काळ जगला नाही. 1712 साली त्याचा लाहौरमध्ये मृत्यू झाला. बहादूर शहा हा औरंगजेबाचा तिसरा मुलगा. विशेष म्हणजे मुअज्जमनं औरंगजेबाला सत्तेवरुन दूर करण्यासाठी अनेक वेळा षडयंत्र रचलं आणि त्यासाठी औरंगजेबानं त्याला अनेक वेळा कैदही केली. बहादूर शहाचा मृत्यू जरी लाहौरमध्ये झाला असला तरीसुद्धा त्याचं दफन मात्र दिल्लीत केलं गेलं.
2. मुहम्मद अकबर
अकबर हा औरंगजेबाचा चौथा मुलगा. त्याचा जन्म औरंगाबादचा पण तो मेला पर्शियात (इराण). अकबरानेही औरंगजेबाच्या विरोधात बंड केलेलं होतं पण ते फसलं. शेवटी निर्वासीताचं आयुष्य जगला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. साल होतं 1706. म्हणजेच औरंगजेबाच्या आधी त्याचा मुलगा गेला. वर्षभर आधी.
3. मुहम्मद आझम शहा
औरंगजेबाचा हा मुलगा बुऱ्हानपूरला जन्मला आणि आग्र्यात वारला. विशेष म्हणजे 3 मार्च 1707 ला औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर तीनच महिन्यात आझम शहाही गेला. तारीख होती 8 जून 1707. आझम शहाच्या नशिबी पण काही काळासाठी का होईना मुघल बादशहा हे पद होतं.
4.मुहम्मद काम बक्ष
हा औरंगजेबाचा सर्वात धाकटा लेक. त्याचा जन्म दिल्लीचा. तो खुशामतखोर, आत्मप्रौढी, स्वत:च्याच मस्तीत जगणारा असा होता असं इतिहासकार सांगतात. शेवटच्या दिवसात औरंगजेबानं जी तीन महत्वाची पत्रं लिहिलीत, त्यापैकी दोन पत्रं त्यानं आझम आणि काम बक्षसाठी लिहिलेली आहेत. काम बक्षसाठी लिहिलेल्या पत्रात औरंगजेबानं शेतकरी, प्रजा आणि मुसलमानांची नीट काळजी घ्यायला सांगितलेलं आहे. नाही तर त्याची शिक्षा मलाच भोगावी लागेल अशी भीतीही औरंगजेबानं पत्रात व्यक्त केलीय. काम बक्षही बापानंतर फार जगू शकला नाही. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अवघ्या दोनच वर्षात तोही हैदराबादमध्ये मरण पावला.
5. मुहम्मद सुलतान
सुलतान हा औरंगजेबाचा सर्वात मोठा मुलगा. त्याच्या आईचं नाव नवाबबाई. त्याचा जन्म मथुरेचा. शेवट मात्र दिल्लीत झाला. विशेष म्हणजे मुहम्मद सुलतान हा अल्पायुषी ठरला. कारण तो चाळीशीच्या आत गेला. त्याचा जन्म 1639 चा तर मृत्यू हा 1676 सालचा.
औरंगजेबाच्या पाचही मुलांच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखांबद्दल मतभेद आहेत पण एखाद वर्षाच्याच तारखेचा घोळ आहे. पण एक गोष्ट निश्चित. औरंगजेबाच्या पाचही मुलांपैकी एकाच्याही वाट्याला फार मोठा राजयोग आला नाही. काही जण औरंगजेबाच्या डोळ्यासमोर गेली तर काही त्याच्या मृ्त्यूनंतर अवघ्या काही वर्षात गेली.
मृत्यूची गडद सावली
औरंगजेबाचं अखेरचं आयुष्य एकाकी गेलं त्याला त्याच्या घरातले मृत्यू ही एक प्रमुख घटना दिसते. एक तर शेवटच्या काळात त्याच्या साम्राज्याची मराठ्यांनी धुळधान करुन टाकली. ती रोखण्याचं सामर्थ्य औरंगजेबाच्या एकाही मुलात नव्हतं. म्हणजे एकीकडे त्याच्या साम्राज्याची शकलं पडत होती, तर दुसरीकडे त्याच्या आयुष्यात मृत्यू थैमान घालत होता. त्याची आवडती सून जहानझेबबानूचा 1705 मध्ये गुजरातमध्ये मृत्यू झाला. त्याच काळात एक मुलगा इराणमध्ये निर्वासीत म्हणून मेला. त्याची एक मुलगी होती झेबुन्निसा. ती प्रतिभावंत कवयित्री होती. तिनं दिल्लीत नजरकैदेत असताना आत्महत्या केली. ती घटनाही औरंगजेब 85 वर्षाचा असतानाचीच. औरंगजेबानं त्याच्या बहुतांश भावंडांचा सत्तेसाठी खात्मा केला. त्यातून उरलेली होती एकमेव बहीण गौहर आरा बेगम. ती सुद्धा 1706 मध्ये गेली म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूच्या वर्षभर आधी. हे कमी होतं की काय म्हणून त्याच वर्षी त्याची मुलगी मेहरुनिसा आणि तिचा नवरा हे दोघेही मेले. तेही अचानक दिल्लीतच. विशेष म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूच्या काही दिवस आधी, एक नाही, दोन नाही तर तीन नातवांनाही मृत्यूनं गाठलं. आणि त्याच मृत्यूच्या धक्क्यावरील धक्क्यात औरंगजेबही गेला. ज्या सम्राटानं आयुष्यभर इतरांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात धन्यता मानली, कत्तली केल्या, त्याला उतारवयात त्याच मृत्यूनं आरसा दाखवला.