लॉर्ड्सवर शर्ट काढून भिडणाऱ्या गांगुलीवर भाजपची मदार, बंगालमध्ये दादा विरुद्ध दीदी?
विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पश्चिम बंगालचं (West Bengal Election) रण पेटलं आहे. भाजपला गांगुलीसारख्या लोकप्रिय चेहऱ्याची गरज आहे.
कोलकाता : लॉर्ड्सच्या मैदानात टी शर्ट काढून इंग्लंडच्या खेळाडूशी भिडणारा, टीम इंडियाला लढायला आणि भिडायला शिकवणाऱ्या दादावर म्हणजेच सौरव गांगुलीवर (Sourav Ganguly) सध्या भाजपची भिस्त असल्याचं दिसतंय. कारण पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला गांगुलीसारख्या चेहऱ्याची गरज आहे. जर गांगुलीने भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला, तर तो मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतो. जर असं झालं तर बंगालमध्ये दादा विरुद्ध दीदी असा सामना होणार हे निश्चित आहे. (Will it be Dada Vs Didi in West Bengal election?)
विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पश्चिम बंगालचं (West Bengal Election) रण पेटलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूलची सत्ता (Trinamool Congress) उलथवून टाकण्याचा चंग केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ‘चाणक्य’ अमित शाह (Amit Shah) यांनी बांधला आहे. 294 सदस्य असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत यावेळी 200 जागांचं टार्गेट घेऊन, अमित शाह मैदानात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीत म्हणजे 2016 मध्ये भाजपने अवघ्या 16 जागा जिंकल्या होत्या. मात्र या 16 जागांच्या 200 जागा कशा करणार हा मोठा प्रश्न आहे. बंगालमध्ये भाजपकडे तसा मोठा चेहरा नाही. त्यामुळेच भाजपची मदार बंगालच्या टायगरवर अर्थात सौरव गांगुलीवर असल्याचं चित्र सध्या तरी राजकीय वर्तुळात दिसतं.
सौरव गांगुलीला थेट मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे करुन, भाजप बंगालच्या रणांगणात उतरु शकते. किंबहुना त्यादृष्टीनेच बंगालमध्ये हालचाली घडत आहेत. नुकतंच गांगुलीने राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच सौरव गांगुली दिल्लीत अमित शाह यांनाही भेटला. तेव्हापासून तर राजकारणात आणखी एक ‘दादा’ एण्ट्री करणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.
भाजपचं प्लॅनिंग, अमित शाह-सौरव गांगुलीची जवळीक
राजधानी दिल्लीत झालेली अमित शाह-सौरव गांगुलीची भेट ही काही पहिलीच भेट नव्हती. बंगालच्या निवडणुकीबाबत अमित शाह कधीपासून प्लॅनिंग करत असतील, याचा अंदाज, BCCI अध्यक्ष निवडीपासून येऊ शकतो. 2019 मध्ये झालेल्या बीसीसीआय अध्यक्षपदी सौरव गांगुलीची नियुक्ती झाली. गांगुलीच्याच टीममध्ये अमित शाहांचे सुपुत्र जय शाह यांचीही निवड झाली. गांगुली अध्यक्ष तर बीसीआयमधील महत्त्वाचं मानलं जाणारं सचिवपद जय शाह यांना मिळालं. बीसीसीआयच्या या निवडींदरम्यान, अमित शाह आणि सौरव गांगुलीची जवळीक वाढली.
भाजप प्रवेशासाठी जोर
बंगालमध्ये निवडणूक लढवण्यासाठी भाजपला मोठ्या आणि लोकप्रिय चेहऱ्याची गरज आहे. त्यामुळे भाजपला गांगुलीसारखा चेहरा मोठी ताकद मिळवून देऊ शकतो. गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश करावा, यासाठी पक्षाकडून जोर लावला जात आहे. जर गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केलाच, तर बंगालमध्ये ‘दादा विरुद्ध दीदी’ अशी थेट लढाई होऊ शकते.
दादाचा दीदीसोबतही सलोखा
खरंतर सौरव गांगुलीचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतही सलोख्याचे संबंध आहेत. सौरव गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष करण्यात ममतांचा मोठा वाटा होता. याशिवाय गांगुलीने पश्चिम बंगालचं नाव मोठं केल्याचं, ममता बॅनर्जी नेहमीच म्हणत आल्या आहेत. एकीकडे हा सलोखा तर दुसरीकडे अमित शाह यांच्याशी वाढलेली जवळीक त्यामुळे दादा येत्या काळात नेमकी काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लक्ष्मीरतन शुक्लाची तृणमूलला सोडचिठ्ठी
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मीरतन शुक्लाने काही दिवसापूर्वीच ममतांच्या तृणमूलला सोडचिठ्ठी दिली होती. लक्ष्मी रतन शुक्ला आणि सौरव गांगुली हे बंगालकडून एकत्र खेळले आहेत. क्रिकेट करिअरनंतर लक्ष्मीरतन शुक्ला राजकीय मैदानावर उतरला. इतकंच नाही तर लक्ष्मीरतन शुक्लाने ममतांच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्रीपद भूषवलं. आता लक्ष्मीरतन शुक्लाही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. जर लक्ष्मीरतन शुक्ला आणि सौरव गांगुली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला,तर क्रिकेटचे मैदान गाजवणारे दोन्ही खेळाडू, राजकीय मैदानावर भागीदारी करताना दिसतील.
दादा मॅच जिंकणार?
मैदानात उतरल्यानंतर जो खेळाडू सामना शेवटपर्यंत घेऊन जातो, तोच मॅचविनर ठरतो. हल्ली महेंद्रसिंह धोनीने अनेक सामन्यात ते करुन दाखवलं होतं. मात्र त्यापूर्वी सौरव गांगुलीनेही टीम इंडियाला लढायला शिकवलं होतं. ‘मौके पे चौका’ मारणं हे गांगुलीने क्रिकेटमध्ये दाखवून दिलं आहे. आता गांगुली राजकीय निर्णय घेऊन चौका मारतो का हे पाहावं लागेल.
लढणं आणि भिडणं
सौरव गांगुली हा असा खेळाडू आहे, जो आपल्या मर्जीने आला, आपल्या मर्जीने खेळला आणि निघून गेला. टीम इंडियाला लढायला तर शिकवलंच पण लॉर्ड्सच्या मैदानात टी शर्ट काढून अँड्र्यू फ्लिंटॉपला उत्तर देऊन, त्याने भारतीयांना भिडायलाही शिकवलं.
खरंतर गांगुलीच्या क्रिकेट करिअरला 1992 मध्ये सुरुवात झाली. मात्र केवळ एक वन डे मॅच खेळल्यानंतर त्याला संधीच मिळाली नाही. तब्बल 4 वर्षे तो आंतरराष्ट्रीय सामना खेळूच शकला नाही. मात्र गांगुलीची बॅट देशांतर्गत सामन्यात तळपत होती. त्यामुळेच 1996 मध्ये गांगुलीने लॉर्ड्समध्ये कसोटी पदार्पण करुन, पहिल्याच सामन्यात शतक ठोकून, आपलं नाणं वाजवून दाखवलं.
दबाव झेलण्याची, दबावात खेळण्याची सवय
दबावात क्रिकेट खेळणं हे गांगुलीसाठी नवं नाही. जेव्हा मॅच फिक्सिंगमुळे क्रिकेटवरुन भारतीयांचा विश्वास उडत होता, त्याच काळात टीम इंडियाचं नेतृत्त्व सौरव गांगुलीच्या हाती आलं. क्रिकेटची प्रतिष्ठा परत आणण्याचं मोठं चॅलेंज गांगुलीसमोर होतं. गांगुलीची लीडरशीप, टीम मॅनेजमेंट यामुळे भारतीय संघाला नवी झळाळी मिळाली. गांगुलीच्या नेतृत्त्वात 2003 मध्ये भारतीय संघाने विश्वचषकाचा फायनलमध्ये धडक मारली. त्यावेळी भारताला उपविजेतेपद मिळालं.
गांगुलीचं नेतृत्त्व असो की संघबांधणी हेच गुण राजकीय करिअरमध्येही आवश्यक आहेत. त्याची झलक गांगुलीच्या राजकीय एण्ट्रीनंतर पाहायला मिळू शकते.
भाजपवरील दबाव गांगुली हटवणार?
सध्या भाजपवर बंगालमधील विजयासाठीचा मोठा दबाव आहे. देशातील सत्ता, इतर राज्यांमधील वर्चस्व, सत्ता आणि पैसा असो की मोदी-शाहांसारखे बडे नेते, सर्वस्व असताना, बंगालमध्ये सत्ता कशी आणायची हा मोठा प्रश्न भाजपसमोर आहे. हा दबाव झुगारण्यासाठी सध्या गांगुली हा एकमेव चेहरा भाजपसमोर आहे. जसं गांगुलीने टीम इंडियासाठी केलं, तसंच त्याने बंगालमध्ये भाजपसाठी करावं अशी धारणा भाजपची आहे. भाजपवरील हा दबाव गांगुली हटवणार का हे येत्या काळात दिसेल.
बंगालमधील राजकीय गणित काय?
पश्चिम बंगालमध्ये 294 सदस्यांची विधानसभा आहे. 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने तब्बल 219 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलं होतं. या विजयासाठी ममता बॅनर्जींनी सलग दुसऱ्यांदा बंगालमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी काँग्रेसला केवळ 23, डाव्यांना 19 आणि भाजपला 16 जागाच मिळाल्या होत्या. आता भाजप आपल्या 16 जागांवरुन किती जागांवर विजय मिळवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)
-
- तृणमूल काँग्रेस -219
- काँग्रेस -23
- डावे – 19
- भाजप – 16
- एकूण – 294
संबंधित बातम्या
ममतांच्या आमदारांची फोडाफोडी, मराठी नेत्यांवर विशेष जबाबदारी, भाजपचं ‘मिशन बंगाल’ नेमकं काय?
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी भाजपचा खास प्लॅन; ‘हे’ पाच नेते गेमचेंजर ठरणार?