जगातली दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी भिंत आपल्या भारतात…!
चीनच्या भिंतीनंतर जगातली सर्वात मोठी भिंत उभी आहे ती राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातल्या कुंभलगडाच्या अंगाखांद्यावर, उदयपूरपासून ८० किलोमीटरवर.
तुम्हाच्या डोळ्यावर पट्टी बांधली नि त्या आडव्या-तिडव्या भिंतीवर तुम्हाला नेऊन उभं केलं आणि डोळ्यावरची पट्टी काढली तर तुमच्या तोंडून शब्द बाहेर पडतील…चीनची भिंत…?? (Great Wall of China) राजस्थानच्या क्रूर, निर्दयी वातावरणाला गेली सहाशे वर्ष टक्कर देत वाळवंटी आणि रखरखीत डोंगररांगांना एका भिंतीनं विळखा घातलाय, आणि तो ही तब्बल ३६ किलोमीटरचा. (World second largest wall in Rajasthan, India after china wall blog by Prashant Kuber )
चीनच्या भिंतीनंतर जगातली सर्वात मोठी भिंत उभी आहे ती राजस्थानच्या (Rajasthan ) राजसमंद जिल्ह्यातल्या कुंभलगडाच्या अंगाखांद्यावर, उदयपूरपासून ८० किलोमीटरवर. मेवाडचे राजे महाराणा कुंम्भा यांनी अनेक सुंदर वास्तूंच्यासह अवाक् करणार्या चिलखता तटाची निर्मिती केली. याआधी याठिकाणी सम्राट अशोकाचा मुलगा सम्र्पित यानं इ.स. पूर्वी २०० वर्षे आधी एक किल्ला बांधला होता. आता यावेळी वास्तूकार होते महाराणा कुंम्भा.
गुजरात आणि मालवा यांच्याविरोधातल्या संघर्षासाठी अरवलीच्या या डोंगररांगांवर महाराणा कुम्भानं हे ‘कवच कुंडलं’ बांधायला घेतलं.
भिंत आकार घेत होती पण काय कुणाला माहित थोडी भिंत बांधून झाली की कोसळत असे. महाराणा कुंभा चिंतेत पडले, काम सुरु असताना योगा योगानं एक साधू तिथून निघाले होते, महाराणाकडे जाऊन भिंत पूर्णत्वास न्यायची असेल तर देवीला नर बळी द्यावा लागेल असं सांगितलं आणि तेही स्वेच्छेनं. शोधा शोध झाली पण कोणी तयार होईना. शेवटी तेच महात्मा तयार झाले, बळी दिला गेला. तिथेच साधूची समाधी उभी राहिली आणि तिथूनच भिंतीनं पहिलं पाऊल टाकलं.
३६ किलोमीटर ओबढ-धोबड डोंगररांगांतून, सखल भागातून, जंगलातून- काटेरी जाळीतून आणि वन्य श्वापदांच्या साक्षीनं भिंत वाट काढत होती. मुख्य गडाच्या म्हणजे सर्वात उंच डोंगरावर इतरही वास्तू आकार घेत होत्या. यात होती अप्रतिम नक्षीकाम होत असलेली सुंदर मंदीरं, महाल, इमारती, स्तंभ, छत्रिया, छोट्या कोठ्या आणी कारखाने.
कुंम्भल गडामध्ये आणखी एक किल्ला आहे, नाव ‘कटार’ गड. विश्वामित्राच्या काळजात घुसलेली मेनकेच्या नजरेची ‘कटार’च जणू, अगदी भक्कम. कुंम्भल गडाला सात दरवाजे आहेत. काही मोठे तर काही लहान. काही सहज दिसतील तर काही स्वत:ला भिंतीत लपवणारे. महाराणा कुंम्भा जातीनं लक्ष घालत होते. काही मंदिरांच्या बांधणीत हिंदू आण् जैन दोन्ही धर्माचा पडगा आहे. किल्ल्यात त्यावेळी तब्बल ३५० मंदिरं होती, जणू स्वर्गातल्या देवांची पृथ्वीवर राहायची सोयच करत होते महाराणा कुंम्भा.
मंदिरांच्या गाभार्यात, मांडवात आणि भिंतींवर विष्णू, लक्ष्मी, सरस्वती, गणेश, इंद्र, यम यांसह यक्ष, गंधर्व, अप्सरा, अग्नी, वरुण यांच्या असलेल्या मूर्ती जणू बनविणार्यानं प्रत्येक देवतेला समोर उभं करुन घडविलेल्या वाटाव्या. गडात एक ५२ शिखरं असणारं मंदिर आहे, एक एक शिखर एकमेकाला खेटून उभं आहे. गडावरच्या शिवमंदिराची शिवपिंड आणि गाभार्यालं वातावरण असं की आत गेलेल्याला या कर्कश्य व्यावहारिक जगातून संन्यासच घ्यावा वाटेल.
किल्ला आकार घेत होता, गडा भोवती बांधत असेलेल्या भिंतीच्या आत सुरक्षित असलेल्या प्रचंड परिसरात तलाव आणि शेतीसाठी भरपूर समतल जागा होती. किल्ल्याला वेढा घातला तरी वेढा घालणारा वेडा होईल एवढी सुव्यवस्था किल्लात होती. त्यातून किल्ला परास्त झालाच तर पळून जाण्यासाठी तब्बल ५-६ किलोमीटरचा भुयारी मार्ग केलेला होता. १४४३ ते १४५८ पर्यंत काम चाललं. महाराणा कुंम्भा यांनी आपली राजधानी आणि सिंहासन इंद्राच्या सिंहासना इतकं सुरक्षित केलं होतं.
पण घात झाला महाराणा कुंम्भा यांच्याच पुत्रानं ऊदा सिंह यानं बापालाच घात करुन मारलं सिंहासनासाठी. भविष्यात येणार्या औरंगजेबाच्या वरताण कृती केली ऊदा सिंहानं. एवढं ऐश्वर्य, साम्राज्य उभं करणार्या पित्याचाच ऊदानं खून पाडला, हाय…!!
मंदीरं ऊदा सिंहाची का झाली नाहीत प्रभु रामाचीच का उभी राहीली…?? वडिलांनी दिलेल्या एका वचनासाठी १४ वर्ष वन वन भडकलेला रामाचा वनवास आदर्श का ठरला…??
महाराणा कुंम्भा गेले आणि कुंम्भाल गडासह संस्कृती पोरकी झाली. महाराणा कुंम्भांनी साहित्यात मोठं योगदान दिलं, साहित्यकारांचे आश्रयदाते होते महाराणा कुंम्भा. संगीतातले अनेक नवीन ‘राग’ महाराणा कुंम्भांनी शोधले. महाराणा कुंम्भांचा खून झाला आणि कुंम्भाल गडावरुन सरस्वती उठून गेली. दुर्दैव…!!
१४६८ ला महाराणा कुंम्भाच्या मृत्यूनंतर आणखी एक दैदिप्यमान योध्याची जन्मभूमी राहिला कुंम्भाल गड. ९ मे १५४० ला कुंम्भाल गडावर पुन्हा सुर्याेदय झाला…महाराणा राणा प्रताप…!!
मुघलांच्या बलाढ्य साम्राज्याला याच कुंम्भाल गडावरुन राणा प्रतापानं आपल्या राज्याचा, राज्याचा नव्हे “स्वराज्याचा” आवाज बुलंद केला. अकबराच्या, दिल्लीच्या सिंहासनाला न जुमानता आपलं राज्य उभं केलं आणि हिंदूस्थानाच्या ‘स्वराज्य’ इतिहासाची रिकामी पानं भरली. हीच भरलेली पानं नंतर महाराष्ट्राच्या राजानंही वाचली आणि पुन्हा लिहिलीही.
कुंम्भाल गडाच्या मातीत जन्मलेल्या महाराणा प्रतापानं हल्दी घाटीच्या प्रसिध्द लढाईत अकबराच्या सैन्याला कुंम्भाल गडाचं पाणी आपल्या तलवारीनं पाजलं. कुंम्भाल गडावर कित्येक हल्ले झाले पण गडाच्या भक्कम भिंतीनं शत्रूच्या कबरी बांधल्या, चित पेटवल्या.
वीर्याचं, शौर्यांचं, संस्कृतींचं, वीर योध्दांच्या जन्माचं प्रतिक असलेला कुंम्भाल गड आजही इतिहासातल्या गौरवशाली, स्मृतींची आठवण आठवणींच्या भिंतींमध्ये सुरक्षित करुन उभा आहे…!! स्वराज्याची जाज्वल्य मशाल पेटवतो आहे…!!
(सदरचा लेख इंटरनेटवरील माहिती, न्यूज रिपोर्टस् आणि यूट्यूबवरील टी.व्ही. शो पाहून लिहिलेला आहे.)
प्रशांत कुबेर यांचे यापूर्वीचे ब्लॉग
भारताचा स्पाय, जो पाकिस्तानच्या आर्मीत मेजर बनला – एक था ब्लॅक टायगर….!
आणि ते विमान टेक ऑफ नंतर तब्बल 35 वर्षांनी लॅन्ड झालं?