अभिनेता राहुल रॉय यांना 'एल.ए.सी - लाइव्ह द बॅटल' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ब्रेन स्ट्रोक झाला. या चित्रपटाचं चित्रीकरण कारगिलमध्ये सुरु होतं. आता सध्या त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
राहुल रॉय यांनी 'आशिकी' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.
अगदी वयाच्या 22 व्या वर्षी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या चित्रपटात राहुल यांना मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. कर्णमधूर गीतं आणि त्याला प्रेम कहानीचा तडका हा चित्रपट तुफान गाजला होता.
'आशिकी'ने राहुल रॉयचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं होतं.
पहिल्याच चित्रपटात मिळालेल्या यशानंतर त्यांनी तब्बल 47 चित्रपट साइन केले होते.
मात्र ही जादू फार काळ टिकली नाही. काही काळानंतर त्यांचे चित्रपट फ्लॉप होण्यास सुरुवात झाली.
तो काळ त्यांच्यासाठी एक वाईट स्वप्न ठरला. मात्र त्यानंतर राहुल यांनी एक मोठं पाऊल उचलत 2000 साली मॉडल राजलक्ष्मी यांच्यासोबत लग्न केलं.
लग्नानंतर ते चित्रपटसृष्टीपासून लांब गेले आणि ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले. कालांतराने प्रेक्षक त्यांना विसरलेही होते.
मात्र काही काळानंतर त्यांना इन्डस्ट्रीमध्ये पुनरागमनाची इच्छा झाली आणि त्यांनी 'बिग बॉस'मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
'बिग बॉस 1'मध्ये त्यांच्या दमदार प्रदर्शनानं सगळ्यांची मनं जिंकली आणि ते 'बिग बॉस 1'चे विजेते ठरले.
मोठ्या गॅपनंतर आता ते 'एल.ए.सी - लाइव्ह द बॅटल' या चित्रपटात झळकणार होते. मात्र चित्रीकरणादरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोक आला.