मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रवास एका कुटुंबाच्या आयुष्यात अखेरचा प्रवास ठरला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास वर एक विचित्र अपघात घडला. या अपघातात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले. यापैकी दोघांची परिस्थिती गंभीर आहे. तर मृतांमध्ये 5 वर्षीय चिमुकलीचाही समावेश आहे.
पुण्याहून मुबंईकडे जाताना बोरघाट उतरताना फुडमॉल जवळ हा झाला अपघात. टेम्पो, ट्रेलर, कार सह अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला.
मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने मागून टेम्पोला धडक दिली. टेम्पो पलटी झाल्यावर मागून येणाऱ्या दोन कार टेम्पोला धडकल्या. या चारही गाड्यांवर पाठीमागून येणारा टेम्पो धडकल्याने अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघाताचे दोन्ही कारचा चक्काचुर झाला आहे.
या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमावरुन परतताना हा अपघात झाला. तर अन्य दोन कार सोबत होत्या. परंतु, घाटात मुबंईकडे जाताना दोन कार पुढे निघुन गेल्या आणि या दोन कारचा अपघात झाला.
या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डॉ. वैभव वसंत झुझांरे (41, नेरुळ) याच्यांसह त्यांची पत्नी वैशाली झुंझारे (38), आई उषा झुंझारे (63), पाच वर्षांची मुलगी श्रिया झुंझारे (5) या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा 11 वर्षांचा मुलगा अर्णव झुंझारे हा गंभीर जखमी झाला आहे. त्यासह मंजू प्रकाश नाहर (58, गोरेगाव) यांचाही मृत्यू झाला आहे.
स्वप्नील सोनाजी कांबळे (30), प्रकाश हेमराज नाहर (65), किशन चौधरी, काळूराम जमनाजी जाट हे या अपघातात जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.