बिहार विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM ने जोरदार प्रदर्शन करत 5 जागांवर विजय मिळवला आहे. सीमांचलमधील कोचाधामन, किशनगंज, अमोर, बहादुरजंग, बैसी, ठाकुरगंज आणि जोकीहाट या विधानसभा मतदारसंघात MIM चे उमेदवार विजयी झाले आहेत.
दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसची दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळालं. केवळ 19 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीत प्रचारात म्हणावा असा जोर लावलेला नव्हता.
बिहार निवडणूक प्रचारादरम्यान असदुद्दीन ओवेसी यांनी सातत्यानं काँग्रेस आणि RJD वर टीकास्त्र डागलं. तसंच भाजपवरही त्यांनी अनेकवेळा हल्लाबोल केला. ‘ओवेसींमुळे महाआघाडीच्या उमेदवारांना बऱ्याच जागांवर फटका बसला. सीमांचलमधील मतांची टक्केवारी पाहिली तर अशी एकही जागा नाही जिथे NDAचा उमेदवार आहे आणि त्या ठिकाणी MIM च्या उमेदवाराला जास्त मतं पडली आहेत’, असा आरोप राजदचे प्रवक्ते चित्तरंजन गगन यांनी केला.
एकूणच ‘ओवेसी फॅक्टर’ने बिहार विधानसभेची इथून पुढची राजकीय गणित बदलली आहेत. बिहारच्या राजकारणात ओवेसींनी यशस्वीरित्या शिरकाव केला आहे. बिहारनंतर आता ओवेसी यांचे पुढचे लक्ष आहे ते तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीकडे…!
‘आम्ही बंगालमध्ये ताकदीने निवडणूक लढवणार आहोत’, अशी घोषणा बिहार निवडणूक निकालानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. भाजपची बी टीम या विरोधकांच्या टीकेवर फारसं लक्ष देण्याची गरज वाटत नसल्याचं सांगत राजकीय पक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा मला संविधानाने अधिकार दिला आहे, असं ओवेसी म्हणाले. दरम्यान इथून पुढची राष्ट्रीय राजकारणातली ओवेसी यांची वाटचाल कशी असेल, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.