भारतीय हवाई दलाचा आज 88 वा स्थापना दिन आहे. त्यानिमित्ताने आज उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर वायुसेनेची ताकद अवघ्या जगाला पाहायला मिळणार आहे.
स्थापना दिनाच्या कार्यक्रमात यंदा एकूण 56 विमानांचा सहभाग आहे. यामध्ये राफेल, सुखोई, मिग-29, मिराज, जॅग्वार, तेजस विमानांचा समावेश आहे. राफेल लढाऊ विमान हे यंदाचं प्रमुख आकर्षण आहे.
आज हिंडन एअरबेसवर फ्लाय पास्टची सुरुवात 'आकाशगंगा' म्हणजेच आकाशातून पॅरा-जम्पने होईल. या पॅरा-जम्पमध्ये हवाई दलाचे जवान ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टमधून पॅराशूटच्या मदतीने उडी मारतील.
निशान-टोलीसह सैनिक मार्च पास्ट करतील. मग हवाई दलाचे हेवी-लिफ्ट मी-17 हेलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर हिंडन एअरबेसवर फ्लाय पास्टची सुरुवात होईल.
भारताने नुकतेच अमेरिकेकडून खरेदी केलेले चिनूक हे हेवीलिफ्ट हेलिकॉप्टरदेखील पाहायला मिळणार आहे. चिनूक हेलिकॉप्टर्स फील्ड-गन्स म्हणजे तोफ आणि इतर अवजड वस्तू वाहून नेण्याचे काम करतात.