
रिफायनरी प्रकल्प करण्यास नाणारवासियांनी विरोध केला होता. प्रकल्पाच्या विरोधात नाणारवासियांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यानंतर हा प्रकल्प कोकणातच इतर ठिकाणी करण्यासाठी जागेची शोधाशोध सुरू झाली होती. त्यानुसार बारसू आणि सोलगाव या दोन गावातील जागांचा पर्याय सांगण्यात आला.

बारसूत रिफायनरी प्रकल्प होत असल्याने त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. आज स्थानिक नागरिकांनी जोरदार निदर्शने करत बारसूत होणाऱ्या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांनी बारसूत प्रकल्प व्हावा म्हणून पंतप्रधानांना 12 जानेवारीला पत्रं दिलं आहे.

स्थानिक भूमिपुत्रांच्या मुळावर आला तर आम्ही शिवसेनेच्या मुळावर उठून बसू. या निर्णयाचे महापालिका निवडणुकीतही परिणाम भोगावे लागेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. तसेच आजपासून आमचं आंदोलन सुरू झालं आहे. कामधंदा सोडून आम्ही आंदोलन सुरू केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

बारसू आणि सोलगांव या दोन गावांपैकी सोलगाव या ग्रामपंचायतीनं एमआयडीसी आणि रिफायनरीला विरोध असल्याचा ठराव केला आहे. 28 जून 2021 रोजी याबाबतचा ठराव करण्यात आला आहे. तर, शिवणे खुर्द या गावानं देखील रिफायनरी आणि एमआयडीसी प्रकल्पाला विरोध दर्शवणारा ठराव केला आहे.

या नव्या जागेमध्ये राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे, गोवळ, शिवणे खुर्द आणि धाऊलवल्ली या गावांमधील सडा अर्थात जमीन जाणार आहे. त्यामुळे सध्या आता याबाबत देखील विरोध होत असल्याचं दिसून येत आहे. याविरोधात 30 जून 2021 रोजी बारसु – सोलगांव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेची देखील स्थापना करण्यात आली आहे.