Photos : नववर्षाच्या स्वागतला बाहेर जायचंय, मग तळकोकणातील ‘हे’ निसर्ग सौदर्य पाहिलंय का?
नववर्षात जर तुम्ही कुटुंबासह कुठे फिरायला जायचा बेत आखत असाल आणि एकाच ठिकाणी सर्वच पर्यटन अनुभवायचं असेल, तर तळ कोकणातील आंबोलीचा नक्कीच विचार करायला हवा.
Follow us
नववर्षात जर तुम्ही कुटुंबासह कुठे फिरायला जायचा बेत आखत असाल आणि एकाच ठिकाणी सर्वच पर्यटन अनुभवायचं असेल, तर तळ कोकणातील आंबोलीचा नक्कीच विचार करायला हवा.
जगभरातील पर्यटकांचे आवडते ‘डेस्टीनेशन’ असलेल्या आंबोलीत दरवर्षी सर्वात जास्त पाऊस पडतो. तसेच थंड हवेचे ठिकाण म्हणूनही आंबोलीची ओळख आहे.
राज्यातील निसर्गसंपन्न जैवविविधतेचे ठिकाण म्हणूनही आंबोलीकडे पाहिले जाते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूत आंबोली पर्यटकांनी बहरलेली असते.
पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याला एकत्रित जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट. वर्षा पर्यटनावेळी पर्यटकांना मुसळधार पावसात घनदाट धुक्यात सतत आव्हान देणारे एकमेव ठिकाण म्हणून आंबोली पर्यटनस्थळाची वेगळी ओळख आहे.
आंबोली घाटातून प्रवास करताना गर्द हिरवागार शालू पांघरलेल्या निसर्गाचा आस्वाद घेत, घाटातील नागमोडी वळणे पार करणे म्हणजे एक अविस्मरणीय ठेवाच ठरतो.
आकाशाशी स्पर्धा करणार्या टेकड्या, बाराही महिने हिरव्यागार असणार्या दर्या, पावसाळ्याच्या दिवसात तर दाट धुक्यामुळे हा परिसर मोहीत करतो.
येथील विविध नयनरम्य कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी नदी उगम, ऐतिहासिक महादेवगड पॉईंट, सनसेट पॉईंट, आंबोली मुख्य धबधबा, नांगरतास धबधबा, परिक्षित पॉईंट, शिरगावकर पॉईंट हे येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे.
‘आंबोली टुरिझम ‘व्हॅली पॉईंट्स आणि येथील चौकुळ व गेळे गावातील निसर्गसौंदर्य नजर जाईल तेवढी मोठी पठारे, ऐतिहासिक गुहा, नेने कूडो-पायली पॉईंट, कुंभवडे येथील भीमाचे पाऊल, बाबा धबधबा आदी पर्यटनस्थळे देखील पर्यटकांना भुरळ घालतात.
या ठिकाणची जैवविविधता असलेल्या जंगलातील दुर्मिळ आणि अति दुर्मिळ वनस्पती, विविध प्रजातींचे पक्षी-प्राणी आणि जीव-जंतु यामुळे निसर्गप्रेमींचेही देशातील ‘फेव्हरेट डेस्टिनेशन’ आहे.
येथील परिसरातील जंगलात वाघ, बिबटे, अस्वल, गवे, नीलगाय, हरिण, भेकरे, सांबर, ससे, रान मांजरे, कधीतरी दिसनारा ब्लॅक पँथर आदी वन्यप्राणी हे जंगल सफारीवेळी सहज नजरेस पडतात.
जगातील 12 जैवविविधता ‘हॉटस्पॉट’मधील पश्चिम घाटातील सर्वात समृद्ध असा आंबोली जंगल परिसर असल्याने दुर्मिळ व अतिदुर्मिळ साप, बेडुक सारखे जलचर व आदी प्राणी, पक्षी, आयुर्वेदीक वनस्पती, रानफुले अशा विविध नैसर्गिक गोष्टींची अमूल्य देणगी लाभली आहे.
या ठिकाणी बाराही महिने अगदी साहसी पर्यटनासह विविध प्रकारचे पर्यटनाची व्यवस्था ‘आंबोली टुरिझम’ मार्फत करण्यात आलीय.
‘आंबोली टुरिझम’मार्फत येथे आंबोली पर्यटनासोबतच येथील अस्सल कोकणी मेवा, मालवणी पद्धतीचं चमचमीत चुलीवरचं जेवण अशा गोष्टींचाही आस्वाद घेता येणार आहे.
आंबोलीत राहण्यासाठी टेंटपासून हॉटेल्स रूम्स उपलब्ध आहेत. त्यांचे दर प्रतिदिवस 1000 रूपये ते 4000 रूपयांपर्यंत आहे.
जेवणातही तुम्हाला अस्सल मालवणी थाळी, सोलकढी, माशांचे, कुर्लीचे विविध चमचमीत पदार्थ, कोंबडी वडे (वडे सागोती) तळलेले पापलेट, भात आणि तांदळाच्या अनेक पदार्थांसह नाचनी भाकऱ्या, घावन, आंबोळी, पातोळे, मोदक, शिरोळे याचीही चव चाखता येते.
आंबोली पर्यटनकरिता ‘आंबोली टुरिझम’ची निःशुल्क सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी +917030418700 आणि 7709939192 या क्रमांकावर संपर्क करता येईल.
आंबोली सावंतवाडी रेल्वे स्टेशपासून 40 किमी, कुडाळ रेल्वे स्टेशनपासून 50 किमी, गोवा विमानतळापासून 60 किमी आणि बेळगाव विमानतळापासून 70 किमी आहे.
कोल्हापूरपासून आंबोली 110 किमी आहे. मुंबई-गोवा महामार्ग सावंतवाडीमार्गे आंबोली 540 किमी आहे.
पुणे-बेंगलोर हायवे – निपाणी – आजरा मार्गे आंबोली 340 किमी आहे. अशा विविध मार्गांनी आंबोलीत जाता येतं.