बॉलिवूड चित्रपटात अनेक अॅक्शन स्टंट असतात. एखादी फाईट, एखादा पंच बघून आपण त्या कलाकारावर फिदाही होतो. त्यांचे कौतुक करुन आपण थकत नाही. पण हे सर्व अॅक्शन सीन तुमचे बॉलिवूडचे कलाकार नाही, तर त्यांचे बॉडी डबल करतात.
बॉडी डबल हा व्यक्ती एखादा अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या तत्सम उंची, रंग, रुपाशी मिळते जुळते असतो. या कामासाठी बॉडी डबलला चांगले पैसे आणि लोकप्रियता देखील मिळते.
बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेल्या अभिनेता सलमान खान याचे बहुतांश चित्रपट हे अॅक्शनने खचाखच भरलेले असतात. नुकतंच सलमानचा 'राधे: तुम्हारा मोस्ट वॉन्टेड भाई' रिलीज झाला आहे. या चित्रपटातही अॅक्शनचा धमाका आहे. पण हे अॅक्शन सीन हे सलमान खानने नाही तर त्याचा बॉडी डबल असलेल्या परवेझ काझी याने केले होते.
काही दिवसांपूर्वी परवेझने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. यात त्याने सलमान खान सारखा सेम टू सेम पोशाख घातला होता. त्याचा हा फोटो प्रचंड व्हायल झाला. त्यानंतर परवेझ नक्की कोण आहे? तो काय करतो? याची माहिती जाणून घेण्यासाठी नेटकरी प्रयत्न करु लागले.
परवेझ काझीचे चालणे-बोलणे, भाषा आणि शैली हुबेहुब सलमान खानसारखीच आहे. परवेझने 'प्रेम रतन धन पायो', 'सुलतान', 'दबंग 3', 'भारत', 'रेस 3', 'टायगर जिंदा है' सारख्या चित्रपटात सलमानचा बॉडी डबल म्हणून काम केले आहे.
परवेझ हा पूर्वी नोकरी करायचा. त्यात त्याला दर महिन्याला 15 ते 20 हजार रुपये मिळायचे. यानंतर त्याने सलमानचा बॉडी डबल म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
यामुळे त्याची कमाई आठ पटीने वाढली आहे. मुंबईत राहणाऱ्या परवेझच्या कुटुंबात आईवडील, पत्नी आणि एक मुलगी आणि दोन बहिणी आहेत.
परवेझ हा सलमानसोबत साधारण 7 ते 8 वर्ष काम करत आहे. सलमान हा त्याच्यासोबत अगदी फ्रेंडली असतो. एखादा सलमानने परवेझला विचारले की मला सांग मी तुझ्यासारखा दिसतो की तु माझ्यासारखा... यानंतर एकच हशा पिकला होता.
परवेझ हा सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. तसेच त्याचे फॉलोवर्सही प्रचंड आहे.
परवेझ तरुण वयापासूनच सलमानप्रमाणे दिसायला लागला. त्यावेळी त्याला त्याचे मित्र हे सल्लू भाई या नावाने हाक मारायचे.