एका बाजूला कोरानाची परिस्थीती आणि दुसऱ्या बाजुला दिवाळीचा सण या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना देतानाच दिवाळीच्या सुट्टीमध्ये मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होता कामा नये असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, ही दिवाळी नागरिकांनी फटाके न फोडता पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करावी असे आवाहनही त्यांनी केले असताना आता लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी फटाका चॉकलेट बाजारात आले आहेत.
ठाण्यात फटक्यांचे विविध प्रकार चॉकलेटमध्ये बनविण्यात आले असून त्यांची मागणी भरपूर आहे. गिफ्ट म्हणून देण्यासाठी फटाका चॉकलेटला पसंती दिली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने सण उत्सव साजरे करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी फटाके फोडले जातात त्यानिमित्ताने फटाक्यांची दुकानेही सजलेली असतात. यंदा महापालिकेने ठाणेकरांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले असताना दुसरीकडे लहान मुलांना फटाके आणि चॉकलेट दोन्ही आवडीचे असल्याने त्यांच्यासाठी फटाका चॉकलेट ही संकल्पना बाजारात आली आहे.
तन्वी पांगारे यांची ही संकल्पना असून त्यांनी फटाक्यांच्या विविध प्रकारचे चॉकलेट बनविले आहे. लहान मुलांबरोबर या फटाका चॉकलेटला कार्यालयात गिफ्ट्स म्हणून देण्यासाठीही पसंती दिली जात असल्याचे पांगारे यांनी सांगितले.
या फटाका चॉकलेटमध्ये ड्रायफ्रूटचा देखील वापर करण्यात आला आहे. यात डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट, ड्रायफ्रूट डार्क चॉकलेट हे तीन फ्लेवर्स आहेत. रॉकेट, भुईचक्र, पाऊस, लक्ष्मी बॉम्ब, रश्शी बॉम्ब, लवंगी बार, हे फटाक्यांचे विविध प्रकार तर कंदीलही फटाका चॉकलेटमध्ये पाहायला मिळत आहे.
यात 150 रुपयांचा बॉक्स असून त्यात डार्क आणि मिल्क चॉकलेट, 250 रुपयांच्या बॉक्समध्ये ड्रायफ्रूट, डार्क आणि मिल्क चॉकलेट तर 350 रुपयांच्या बॉक्समध्ये ड्रायफ्रूट, डार्क आणि मिल्क चॉकलेटसह कंदील चॉकलेट तर हॅपी दिवाळीचा टॅगगिंग लावलेले चॉकलेट यात पाहायला मिळत आहे.
मिठाईला पर्याय म्हणून हे चॉकलेट बनविले असून कार्यालयाच्या ऑर्डर्स येत आहे. आपल्या नातेवाईकांना,मित्र मैत्रिणींना दिवाळी गिफ्ट देण्यासाठी फटाका चॉकलेट उत्तम पर्याय आहे.