बगाड कसे बनवले जाते? बगाडाचे वजन जवळपास ३ ते ४ टन इतके असते. बागडाला दगडाची चाके, दगडी चाकावर कणा, कण्यावरती बूट, बुट्यावरती साठी, साठी वरती वाघ, वाघावरती खांब, खांबावरती शीड, शिडाला टांगलेला नवसाचा बगाड्या असतो. बगाडाच्या आदल्या दिवशी छबीना असतो, त्या दिवशी बगाडाचा रथ तयार केला जातो. बावधन गावामधील सर्व बलुतेदार सुतार समाज मिळून बगाड बनवत असतात. गावातील सर्व सुतार आणि प्रमुख मंडळी एकत्र येऊन हे काम पूर्ण करतात. अंदाजे २० ते २५ जण हा बगाडाचा गाडा तयार करतात. बागडाची चाके ही दगडी असतात. त्यानंतर कणा, कणा हा साडे नऊ फुटाचा असतो. कण्यावरती बूट बसवलेले असते. दरवर्षी बागडाला लागणारा कणा हा देशी बाभळीच्या लाकडापासून नवीन केला जातो. त्यानंतर दांड्या या बुटामध्ये बसलेल्या असतात. त्यानंतर साठा बसवला जातो. साट्या बसवल्यानंतर त्यावर वाघ बसवला जातो. वाघाचे वजन अंदाजे १ ते दीड टन एवढे असते. कण्यामध्ये दोन्ही बाजूला दगडी चाके बसवली जातात. तसेच ४५ ते ५० फूट लांबीचे गुंफलेले शीड देखील बागडाच्या खांबावर बसवलेले असते. जु, खांब ,जुंपण्या, पिळकावण्या हे सुतार मंडळी करत असतात. बगाडाचा गाडा तयार करायला ८ ते १० दिवस अगोदर काम चालू केले जाते आणि रात्रंदिवस हे काम करून गाडा पूर्ण केला जातो. बगाडाचा गाडा हा संपूर्ण पणे बाभळीच्या लाकडापासून तयार केला जातो. लोखंडाचा कोणताच भाग वापरला जात नाही. आळदांडी तेव्हडी फक्त चंदनाची असते. बागडाला वापरले जाणारे लाकूड हे ओले असल्या कारणाने ते जास्त वजनदार असते. बगाड झाल्यानंतर सर्व साहित्य हे गावातील थोरल्या विहिरीमध्ये ठेवले जाते. कि जेणेकरून ते पुढील २-३ वर्ष वापरले जाते.