चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे 'गुढीपाडवा'. हिंदू आणि मराठी कॅलेंडर प्रमाणे ही नववर्षांची सुरूवात असते. म्हणूनच हिंदू सणांपैकी गुढीपाडवा (Gudi Padwa) या सणाला विशेष महत्व आहे.
या सणादिवशी आपल्या घराबाहेर कलश, बत्ताशे, कडुलिंबाची पाने लावून गुढी उभारली जाते आणि पारंपारिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले जाते.
नववर्षाची सुरुवात नागरिक नेहमीच, चांगल्या कामाने करतात मग त्यात देव दर्शन होत असेल तर फारच चांगलं. यामुळे नववर्षाच्या पहाटेला अनेकजण देवदर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात करतात.
याच निमित्ताने आज मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्या निमित्ताने विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगावात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
संस्थानच्या वतीने इ- पास या माध्यमाने 9 हजार भाविकांना दर्शन होत आहे, याव्यतिरिक्त ई - पास न मिळालेल्या भाविकांनी श्रींच्या प्रवेशद्वारावरच माथा टेकून कलश दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात केल्याचे दिसून आले.