छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं आहे. बॉक्स ऑफिसवर त्याला दमदार प्रतिसाद मिळतोय. मात्र 'छावा'मधली एक गोष्ट अजूनही प्रेक्षकांना खटकतेय.
'छावा'मधली खटकणारी ती गोष्ट आहे.. महाराणी येसुबाई भोसले यांची भूमिका साकारलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना. एखादी दाक्षिणात्य अभिनेत्री मराठ्यांच्या महाराणीची भूमिका साकारेल असा कदाचित कोणी विचार केला नसेल. मात्र दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर तिच्या निवडीबद्दल ठाम होते.
रश्मिकाने येसुबाईंच्या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतली असती, पडद्यावरील तिची देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव जरी उत्तम असले तरी संवादफेक करताना तिच्यात तो मराठीपणा जाणवत नाही. दाक्षिणात्य स्वरातच तिने चित्रपटातील संवाद म्हटले आहेत, त्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे.
दिग्दर्शक उतेकरांनी महाराणी येसुबाईंच्या भूमिकेसाठी जेव्हा रश्मिकाची निवड केली, तेव्हा निर्माते दिनेश विजन यांनासुद्धा आश्चर्य वाटलं होतं. मात्र रश्मिकाच्या डोळ्यांमधील निरागसता, पवित्रता पाहून तिची निवड केल्याचं उतेकरांनी स्पष्ट केलं.
सिनेमेटोग्राफरने रश्मिकाचे डोळे जरी अत्यंत कौशल्याने कॅमेरात टिपले असले तरी तिच्या संवादांकडे अधिक लक्ष देण्याची गरज होती, असं चित्रपट पाहून अनेकांच्या लक्षात आलं. 'छावा'मधील शुद्ध हिंदीतील जड संवाद रश्मिकाच्या दाक्षिणात्य स्वरातून ऐकताना पूर्णपणे निराशा होते. म्हणूनच हा एक बदल केला असता तर येसुबाईंची भूमिका आणखी ताकदीने रंगवता आली असती, असं अनेकांना वाटतंय.