कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढल्यानंतर देशात ऑक्सिजनचा तुटवडा सुरु झालाय. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्यानं ऑक्सिजन अभावी 22 जणांना जीव गमवावा लागला होता. महाराष्ट्रासह देशभर वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. महाराष्ट्रामध्ये विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन ट्रेनद्वारे आणला जाणार आहे.
भारतात आता औद्योगिक क्षेत्रामध्ये ऑक्सिजन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. सध्या केवळ 9 अत्यावश्यक सेवांमधील कंपन्यांना ऑक्सिजनच्या वापरास परवानगी आहे. रिलयान्स, टाटा स्टील, जिंदल स्टील, सेल, इफको या कंपन्यांनी ऑक्सिजन निर्मिती सुरु केली आहे. 50 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
कोरोना विषाणू संसर्गापूर्वी भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रिक टन प्रतिदिन इतकी होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ऑक्सिजनची मागणी 2800 मेट्रिक टनावर पोहोचली होती. तर दुसऱ्या लाटेमध्ये ही मागणी 5 हजार मेट्रिक टनावर पोहोचली आहे.
भारतामध्ये सध्याच्या 5 हजार मेट्रिक टन मागणीपेक्षा ऑक्सिजन निर्मिती जास्त होते. भारतात लिक्वीड ऑक्सिजनची निर्मिती क्षमता 7287 मेट्रिक टनची आहे.
भारतात मेडिकल आणि औद्योगिक ऑक्सिजनचा सध्याचा स्टॉक 50 हजार मेट्रिकटन आहे. औद्योगिक वापरासाठीच्या ऑक्सिजनचं वैद्यकीय ऑक्सिजनमध्ये रुपांतर करण्यासाठी 93 टक्के शुद्धीकरण करावं लागतं.