आयपीएलच्या 14 व्या मोसमात आज 29 एप्रिलला डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. या डबल हेडरमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. मुंबईने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थान प्रथम फलंदाजी करत आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघ एकूण 22 वेळा आमनेसामने भिडले आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ ठरले आहेत. या 22 सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 11 सामने जिंकले आहेत.
आयपीएलच्या 13 व्या मोसमात दोन्ही संघ 2 वेळा एकमेकांसोबत लढले होते. यावेळेस दोन्ही संघांनी 1 सामना जिंकला आहे.
दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मात्र उभयसंघातील मागील 6 सामन्यांची आकडेवारी पाहिली तर राजस्थान वरचढ आहे. राजस्थानने मागील 6 सामन्यांपैकी 5 सामन्यात मुंबईचा पराभव केला आहे. तर मुंबईने राजस्थानवर 1 मॅचमध्ये मात केली आहे.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने भिडणार आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण वरचढ ठरणार, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.