मुंबईमध्ये शनिवारपासून इंडियन प्रीमियर लीगची स्पर्धा (IPL 2022) सुरु होत आहे. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्टेडियमच्या एकूण क्षमतेपैकी 25 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विद्यमान चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (CSK vs KKR) पहिला सामना होणार आहे.
ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे. कोरोनामुळे एका मोठ्या अंतरानंतर आयपीएल चाहत्यांचे स्टेडियममध्ये स्वागत करेल. IPL 2022 चे सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियममध्ये होणार आहेत. कोविड-19 प्रोटोकॉलनुसार स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बसून सामने पाहता येतील.
आयपीएलमध्ये यंदा लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ असणार आहेत. एकूण 74 सामने खेळवले जातील. लीग स्टेजच्या सामन्यांची तिकिट विक्री सुरु झाली आहे. आयपीएल तिकिट लीगची ऑफिशियल वेबसाइट आणि बुक माय शो वर जाऊन तुम्ही तिकिट खरेदी करु शकता.
IPL 2022 च्या तिकिटांची किंमत 800 रुपयांपासून सुरु होत आहे. सर्वात महागडं तिकिट 8 हजार रुपयांचं आहे. सर्वात स्वस्त तिकिटं डी.वाय. पाटील स्टेडियमवर उपलब्ध आहेत. तिथे तिकिटांची किंमत 800 ते 2500 रुपये आहे.
वानखेडेवर तिकिटांची किंमत 2500 ते 4000 हजार रुपये आहे. सीसीआयमध्ये आयपीएल तिकिटांची किंमत 2500 ते 3000 रुपये आहे. पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये तिकिटांचे दर 1 हजार ते 8 हजार रुपये आहेत.