जळगाव शहरातील कावडीया कुटुंबातील शिवानी अशोक कावडीया हिचा विवाह सोहळा परळी वैजनाथ येथील प्रथितयश जैन परिवारातील डॉ. कुणाल यांच्यासोबत नुकताच संपन्न झाला.
लाडकी बहिण लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या पतीसोबत माहेरी येणार म्हणून तिचा भाऊ विराज याने हटके स्वागत करायचे ठरवले होते. त्यासाठी तो परळी येथे चक्क हेलिकॉप्टर घेऊन गेला आणि त्याने बहिणीला आश्चर्याचा धक्का दिला.
हे हेलिकॉप्टर जळगाव येथील कै. बॅरिस्टर निकम चौक मैदानावर (सागर पार्क) उतरविण्यात आले. शिवानीचे माहेरी झालेले भव्य स्वागत पाहून ती भारावून गेली. तिच्या स्वागतासाठी आप्तेष्ट आणि नातेवाईक हजर होते.
सदर कार्यक्रम सुरुवातीला जळगाव विमानतळावर नियोजित करण्यात आला होता, परंतु विमानतळावरील धावपट्टीवर कारपेंटिंगचे काम सुरु असल्याने विमानतळ प्रशासनाकडून नकार देण्यात आला. यावर मार्ग काढत सर्व शासकीय परवानग्या घेऊन सागर पार्कवर हेलिपॅड तयार करून हेलिकॉप्टर तिथे उतरविण्यात आले.