"असली मसाले सच सच...." म्हणत एमडीएच मसाला ब्रॅण्डला घराघरात पोहोचवणारे एमडीएच ग्रूपचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे. माता चन्नत देवी रुग्णालयात पहाटे 5 वाजून 25 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 98 वर्षीय महाशय धर्मपाल हे गेल्या अनेक दिवसांपासून चन्नत देवी रुग्णालयात उपचार घेतल होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. मात्र, आज अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली.
महाशय यांच्या मृत्यूवर नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सरक्षण मंत्री राजनाथ सिंहसह अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहली आहे.
महाशय धर्मपाल यांना मार्च 2019 मध्ये 'पद्मभूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जीवन प्रवास - महाशय धर्मपाल यांचा जन्म 27 मार्च 1923 ला सियालकोटमध्ये (जे आता पाकिस्तानात आहे) झाला. 1933 मध्ये त्यांनी पाचव्या वर्गात असताना शाळा सोडली.
1937 मध्ये त्यांनी वडिलांच्या मदतीने व्यवसाय सुरु केला. त्यानंतर त्यांनी साबन, कपडा, हार्डवेअर, तांदुळ याचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. मात्र, काही काळाने त्यांनी हा व्यवसाय बंद करत वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांनी वडिलांच्या 'महेशियां दी हट्टी' या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. याला 'देगी मिर्च' नावाने ओळखलं जायचं.
भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर महाशय धर्मपाल दिल्लीला आले. 27 सप्टेंबर 1947 या दिवशी त्यांच्याजवळ फक्त 1500 रुपये होते. या पैशांमधून त्यांनी 650 रुपयांमध्ये एक टांगा खरेदी केला. नवी दिल्ली रेल्वे स्टेशन ते कुतूब रोड या दरम्यान ते टांगा चालवत असत.
काही दिवसांनी त्यांनी टांगा त्यांच्या भावाला दिला आणि करोलबाग येथील अजमल खां रोडवर एक दुकान उघडून मसाले विकू लागले. त्यांना मसाल्याचा व्यवसायात चांगलंच यश आलं आणि त्यातूनच एमडीएच ब्रॅण्डचा पाया रचला गेला.
व्यवसायासोबतच त्यांनी समाजासाठी फायद्याचे ठरतील अशीही अनेक कामं केली. त्यांनी शाळा, कॉलेज उघडले. त्यांनी आतापर्यंत 20 पेक्षा जास्त शाळा उघडल्या आहेत.