विधानपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी, कोल्हापूर ते नागपूर नेत्यांचा प्रचाराचा धडाका
विधान परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रमुख राजकीय नेत्यांच्या सभांमुळे प्रचारात रंगत आलीय. MLC Election 2020
Follow us
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथे सभेला संबोधित केले. पांडुरंगाचा प्रसाद घेऊन मी संतांच्या भूमी असलेल्या मराठवाड्यात आलोय. सतिश चव्हाण यांचा विजय नेतृत्वाच्या उंचीला साजेसा असेल असा करा, असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले.
विधानपरिषद निवडणूक आपण जिंकलो तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस दिल्लीत जातील. फडवणीस केंद्रात गेले तर राज्याला जीएसटीचे पैसे मिळतील, धनगर- मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले.
बदनापूर जि. जालना येथे भाजपचे औरंगाबाद विभाग(मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष भास्करराव बोराळकर यांच्या प्रचारार्थ पदवीधर मतदारांच्या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मार्गदर्शन केले. भाजप उमेदवाराला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
अमरावती शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अकोला येथे घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठक घेतली. शिक्षकांच्या भावना जाणून, त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याची सर्वोत्तम कामगिरी श्रीकांत देशपांडे यांनी केली असल्यामुळे श्रीकांत देशपांडेंना विजयी करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
भाजप आमदार नितेश राणे यांनी औरंगाबाद विभाग(मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष भास्करराव बोराळकर यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेतल्या.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्यातील हांडेवाडी येथे महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड,शिक्षक मतदारसंघ उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ बैठक घेतली.यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार संजय जगताप, आमदार चेतन तुपे, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.