सध्या राज्यभरात कांदयाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कांद्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे आता यावर चोरांची नजर पडली आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
देवळा तालुक्यातील वाजगाव येथील कांदा चोरीची घटना ताजी असतानाच तालुक्यात वाखारवाडी येथे पुन्हा कांदा चोरीची घटना समोर आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वाखारवाडीच्या देवळा येथील शेतकरी बाजीराव देवबा निकम यांनी मोठ्या मेहनतीने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले होते. बाजारात कांद्याचे दर चढ-उतार होत असल्याने व निश्चित भाव मिळत नसल्याने शेतकरी चाळीतच कांदा साठवण्यावर भर देतात. त्याप्रमाणे निकम यांनी मालेगांव / देवळा रस्त्यावर कर्ल्या नाल्यालगत असलेल्या शेतातील ( गट नं. ६३१ ) चाळीत कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने साठवून ठेवला होता.
मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चाळीचे कुलूप व जाळी तोडून शिल्लक असलेल्या कांद्यापैकी 10 ते 15 क्विंटल कांदा लंपास केला. बुधवारी सकाळी बाजीराव निकम यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी देवळा पोलिस स्टेशनला कांदा चोरीला गेल्याची तक्रार दिली.
तालुक्यात कांदा चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ऐन सणासुदीच्या दिवसांत गेल्या दोन दिवसांपासून कांदा मार्केट लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून चाळीत आहे तो कांदा सडून जात असल्याने त्यात कांदा चोरीच्या घटना समोर येत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे .
सध्या बाजारात भाजीपाल्याबरोबरच इतर पिकांनाही चांगला बाजार भाव मिळत असल्याने शेतमालाच्या चोऱ्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.