बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या पर्यावरणाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी पद्धतीची 'मियावाकी' वने विकसित करण्याचा अभिनव प्रकल्प गेल्या वर्षीपासून राबविण्यात येत आहे.
गेल्यावर्षी प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून 'मियावाकी' वनांच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता.
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने साकारलेल्या या प्रकल्पांतर्गत गेल्या वर्षभरात महापालिका क्षेत्रातील विविध 64 ठिकाणी टप्प्याटप्प्याने 'मियावाकी' वनांची रुजवात करण्यात आली.
या 24 ठिकाणी तब्बल 1 लाख, 62 हज़ार 398 झाडे लावण्यात आली असून यापैकी बहुतांश झाडांनी अवघ्या वर्षभरातच चार ते पाच फुटांची उंची गाठली आहे. केवळ वर्षभरात या वनांमधील झाडांनी एवढी उंची गाठणे, हे वनांची वाढ योग्य प्रकारे होत असल्याचे लक्षण आहे, अशी माहिती महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे देण्यात आली आहे.
सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणा-या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 24 ठिकाणी वाढत असलेल्या मियावाकी वनांमध्ये विविध 47 प्रकारची झाडे लावण्यात आली असून यामध्ये फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणारी झाडे अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.
यात प्रामुख्याने चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सिताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजीवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरु, बदाम, काजू, रिठा, शिसम, बकुळ, अर्जुन, फणस, आवळा, कदंब यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.