कोरोना संकटाच्या काळात मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीचं संकट कोसळलं. अनेक डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ आली. काहींनी हाताला काम नसल्यामुळे गाव गाठलं, तर काहींना वॉटमन आणि हमालीचं कामही पत्करलं.
अशावेळी अभिनेता सुनील शेट्टी याने डबेवाल्यांना मदतीचा हात दिला. सुनील शेट्टी यांने Save the children India या संस्थेच्या माध्यमातून डबेवाल्यांना मोलाची मदत केली.
सुनील शेट्टी याने पुणे जिल्ह्यातील डबेवाल्यांच्या गावी जाऊन रेशन वाटप केलं. त्याच्या या कामाची दखल मुंबईतील डबेवाल्यांच्या संघटनेनं घेतली आणि त्याचे आभार मानले. तसंच त्याला डबेवाला पुरस्कारानं सन्मानितही केलं.
डबेवाला संघटनेचे पदाधिकारी उल्हास मुके, रामदास करवंदे, विनोद शेटे, रितेश आंद्रे उपस्थित होते. त्यांनी सुनील शेट्टी याला डबेवाला पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला.
यावेळी कारगारांच्या रोजगारासंदर्भातही चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर सुनील शेट्टी याने यावेळी डबेवाल्यांना पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी स्वत: पुढाकार घेण्याचं आश्वासनही दिलं आहे.