तन्श्रुवा आनन शिशिर असं या टीव्ही अँकरचं नाव आहे. त्यांनी बातमीपत्र वाचल्यानंतर उपस्थित सर्व सहकाऱ्यांनी टाळांच्या कडकडाट केला.
Follow us
बांग्लादेशमध्ये सोमवारी जागतिक महिला दिनी एका ट्रान्सजेंडर न्यूज अँकरने बातमीपत्र वाचलं. तन्श्रुवा आनन शिशिर असं या टीव्ही अँकरचं नाव आहे. त्यांनी बातमीपत्र वाचल्यानंतर उपस्थित सर्व सहकाऱ्यांनी टाळांच्या कडकडाट केला. त्यावेळी तन्श्रुवा यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले.
बांग्लादेशात जवळपास 15 लाख ट्रान्सजेंडर राहतात. तिथे त्यांच्यासोबत सातत्याने भेदभाव केला जातो. इतकच नाही ट्रान्सजेंडर लोकांसोबत होणारी हिंसाही तिथे गांभीर्यानं घेतली जात नाही. त्यामुळे ट्रान्सजेंडर्संना तिथे भीक मागून, देह व्यापार किंवा गुन्हे करण्यासाठी भाग पडावं लागतं. या सगळ्यांवर मात करत तन्श्रुवा यांनी बोइशाखी टीव्हीवर 3 मिनिटांचे बातमीपत्र सादर केलं.
तन्श्रुवा यांचा जन्म कमाल हुसैन शिशिरच्या रुपात झाला होता. तरुणपणी त्यांना आपल्यातील काही बदल जाणवू लागले. त्यानंतर त्यांनी ट्रान्सजेंडर बनण्याचा निर्णय घेतला. तन्श्रुवा यांनी सांगितलं की त्यांच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार झाले. इतकच नाही तर आपण 4 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचंही सांगितलं. आपले वडिलही आपल्याशी अनेक वर्षे आपल्याशी बोलत नव्हते असं तन्श्रुवा यांनी सांगितलं.
शेवटी तन्श्रुवा यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. घरातून पळून जात त्या राजधानी ढाका इथं पोहोचल्या. पुढे त्या नारायणगंज इथे राहण्यास गेल्या. तिथे त्यांनी हार्मोन्स थेरेपी केली. पुढे चॅरिटी आणि थिएटरमध्ये काम करण्यास त्यांनी सुरवात केली. सोबतच आपलं शिक्षणही त्यांनी सुरु ठेवलं.
जानेवारी महिन्यात तन्श्रुवा यांनी ढाका जेम्स पी ग्रँट स्कुल ऑफ पब्लिक हेल्थमधून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थचं शिक्षण घेतलं. सोमवारी जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी वृत्तवाहिनीवर बातमीपत्र सादर केलं. बांग्लादेशातील सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांमध्ये ट्रान्सजेंडर बद्दलचे पूर्वग्रह दूर करण्याचं काम तन्श्रुवा करत आहेत.