राज्यात कोरोनाचं संकट अद्याप कायम आहे. त्यामुळे 6 जून रोजी रायगडावरील शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा मागील वर्षीप्रमाणे साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. तशी माहिती राज्य सरकार आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या संभाजीराजे यांनी मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करा असं आवाहन केलं होतं. पण त्यानंतर संभाजीराजे यांनी सर्व शिवभक्तांना आपल्या घरीच शिवराज्याभिषेक दिन साजरा करा असं आवाहन केलं आहे.
दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला रायगडाच्या पायथ्याशी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्यामुळे रायगडाला सध्या पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालंय.
रायगडावर फक्त 20 ते 25 मावळ्यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा साजरा करण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे. असं असलं तरी उद्या राज्यातील अनेक भागातून शिवभक्त रायगडावर येण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. त्यामुळे रायगडावर गर्दी करु नये असं आवाहन प्रशासनानं केलंय.
पोलिसांकडून सध्या रायगडाच्या पायथ्याशी प्रत्येक गाडीची तपासणी करण्यात येत आहे. राज्यातील विविध भागातून शिवभक्त येण्याची शक्यता असल्यानं पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जात आहे.
रायगडाच्या पायथ्याशी असलेलं पाचाड गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं आहे. गावातील अत्यावश्यक सेवा वगळता हॉटेल, लॉजिंग व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. शिवाय कोविडचे नियम पाळत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा व्हावा अशी भूमिका ग्रामस्थानी घेतलीय.